अशी नणंद सुरेख बाई
अशी नणंद सुरेख बाई


शुभांगी आज खूप टेन्शनमध्ये होती.. कारण दोन वर्षांनी आज तिची नणंद सीमा पंधरा दिवसासाठी माहेरी येणार होती.. सीमा अमेरिकेत राहायची.. त्यामुळे शुभांगीच्या लग्नानंतर पहिल्यांदाच ती येत होती.. शुभांगीने आपली आत्या आईशी कसं हिडीसफिडीस करत वागायची हे बघितलेलं होतं त्यामुळे नणंद येणार या गोष्टीचं तिने खूप टेन्शन घेतलं होतं.. तिच्या मनात नणंद म्हणजे जागेवर सगळं नेवून देणे, दिवसभर स्वयंपाकघरात तिला वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालणे, सासू आणि नणंद मिळून टोमणे मारणे अशीच व्याख्या तयार झाली होती..
शेवटी तो दिवस उगवला.. सकाळी सात वाजता समीर म्हणजे शुभांगीचा नवरा सीमाला एअरपोर्टवरून घेऊन आला... सीमाने येताच शुभांगीची गळाभेट घेतली..
"शुभांगी कशी आहेस? किती बारीक झाली आहेस गं.. बाळ खूप त्रास देतं का ग?"
सीमाचं असं प्रेमाने विचारपूस ऐकून शुभांगीला काय बोलावं कळेनासं झालं..
शुभांगी : "नाही दीदी.. थोडीफार दमछाक होते बाळामुळे..”
सीमा : "अशी काय उभारली आहे.. ये इकडे.. बस गप्पा मारत.."
शुभांगी : "नको दीदी.. मी चहा आणि नाश्त्याचं बघते.. तुम्ही सगळे गप्पा मारत बसा.. मी आलेच.. "
सीमा : "थांब मग मीपण येते.. मिळून नाश्ता बनवूया.."
आई : "अगं आता तरी आली आहेस.. दमली असशील.. शुभांगी करेल सगळं.. बस तू आरामात.."
सीमा : "काही दमले नाहीय आई मी.. हे घे तू बाळाला.. बस खेळवत.. आम्ही नाश्ता बनवून आणतो.."
सीमा आणि शुभांगी दोघीही नाश्ता बनवायला स्वयंपाकघरात जातात.. तिथे दोघाींच्याही गप्पा चालू होतात.. सीमा शुभांगीच्या आवडी निवडी सगळं विचारत असते.. तिला अमेरिकेतल्या गोष्टी सांगत असते.. शुभांगीला गप्पांमधून सीमाच्या प्रेमळ स्वभावाची जाणीव होते..
नाश्ता तयार होतो.. सगळे हसत खेळत गप्पा मारत नाश्ता करतात..
नाश्त्यानंतर सीमा बाळासोबत खेळायला लागते.. तिने बाळासाठी खूप साऱ्या खेळण्या आणि ड्रेस आणलेले असतात.. शुभांगीसाठीही मेकअप किट घेऊन आलेली असते..
सीमा : "शुभांगी मी थोडा वेळ झोपते हं.. खूप झोप येत आहे प्रवासामुळे.. दुपारच्या जेवणाचं बघशील ना प्लीज.."
शुभांगी : "हो दीदी.. तुम्ही आराम करा.. मी करेन.. " शुभांगीला सीमाचा हा स्पष्ट बोलण्याचा स्वभाव खूप आवडतो..
रात्रीच्या जेवणाला सगळे बाहेर जातात.. तेव्हाही सीमा कधीही जीन्स न घालणाऱ्या शुभांगीला जबरदस्तीने जीन्स टॉप घालायला लावते..
शुभांगी : "दीदी नाही जमणार हो जीन्स यमध्ये मला.. बाळाला घेऊन तर बिलकुल comfortable वाटणार नाही.. "
सीमा : "अगं बाळाचं मी बघते.. तू राहा बिनधास्त.. कसली गोड दिसते" म्हणत सीमाने समीर आणि शुभांगीचे फोटो काढले..
दुसऱ्या दिवशी शुभांगीला उठायला उशीर झाला.. बघते तर सीमा किचन मध्ये नाश्ता बनवत असते.. शुभांगीला खूप लाजल्यासारखं वाटतं..
आई : "अगं नणंद आलीय तुझी.. लवकर उठायचं ना थोडं.."
शुभांगी : "हो आई.. रात्रभर बाळामुळे थोडे जागरण झाले.. सकाळी डोळा लागला.. किती वाजले कळलंच नाही.. "
सीमा : "राहू दे ना आई.. होतं असं बाळामुळे कधी कधी.. फ्रेश होऊन ये पटकन तू"
शुभांगी : "सॉरी दीदी.. माझ्यामुळे तुम्हाला आज नाश्ता बनवावा लागला.. तुम्हाला लवकर नाश्ता करायची सवय असेल ना.. "
सीमा : "असं काही नाही गं.. आज माझ्या हातची चव बघ.. दररोज कंटाळा नाही येत का स्वतःच्या हाताचा खाऊन.. "
हे सगळं बघून शुभांगीच्या डोळ्यात पाणी आलं.. डोळे पुसतच ती आवरायला निघून गेली..
पंधरा दिवसात अशाच छोट्या छोट्या क्षणाने सीमा आणि शुभांगीची मैत्री खूप घट्ट झाली.. आता तर ते दोघी मिळून शॉपिंग, मूवी बघायलाही जाऊ लागल्या.. हे पंधरा दिवस कसे उडून गेले कळालंच नाही..
सीमा जायला निघाली तशी शुभांगी थोडी भावुक झाली.. हळद-कुंकू लावून पाया पडत होती तेव्हा सीमाने तिला थांबवलं..
"मैत्रिणीच्या पाया पडायच्या नसतात वेडे.."
शुभांगी : "दीदी तुम्ही येण्याआधी मला खूप टेन्शन होतं.. तुमचं पाहुणचार नीट जमेल मला कि नाही म्हणून.. पण या पंधरा दिवसात तुम्ही कधी नणंद म्हणून राहिलाच नाहीत.. समीरची नाही तर तुम्ही मला माझीच बहीण वाटत होतात.. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही याल तेव्हा मला टेन्शन नाही तर तुम्ही कधी एकदा याल याची ओढ लागली असेल.. थँक यु दीदी मला समजून घेतल्याबद्दल..”
सीमा : "जाता जाता रडवते की काय.. माझ्यासारखीच तू ही ना गं.. आणि थँक यु नको म्हणू.. फक्त शेवटपर्यंत माझं माहेर माझ्या आई वडिलांनंतरही तुझ्या रूपात सुरक्षित असू दे म्हणजे झालं.. आणि तुही इतकं सगळं माझ्यासाठी प्रेमाने करतच होती की.. "
सीमा आणि शुभांगी दोघींचेही डोळे पाणावले होते.. शुभांगी निरोप देऊन आत जाताच आईला कॉल करून आनंदाने नणंदेच्या गोष्टी सांगत ते क्षण परत जगू लागली..