Rutuja Thakur

Drama Tragedy Inspirational

4.6  

Rutuja Thakur

Drama Tragedy Inspirational

अनघा...

अनघा...

17 mins
24.1K


काय करावं काहीच सुचत नाहीये, एकतर MSC च शेवटचं वर्ष त्यात परीक्षा, आणि घरच्यांचं हे असं... विचार करत असतानाच आई आली.


आई- अग अनघा, काय विचार केला मग तू????


अनघा- आई, कसला विचार???


आई- अगं, कसला काय लग्नाचा!!!


अनघा- आई तुम्हाला माझं सांगून झालंय जोपर्यंत माझं MSC पूर्ण होत नाही तोपर्यंत मी लग्नाचा विचार नाही करणार.


आई- अहो इकडे येताय का जरा....!!!


बाबा- आलो, आलो... बोल काय झालं???


आई- अहो बघा ना, अनघा हट्ट करून बसलीय ऐकतच नाही, मी समजावून थकली. आता तुम्हीच सांगा तिला, आणि हो... ते जोशींचा फोन आलेला ते परवा यायचं म्हणताय अनघाला बघायला, सांगा जरा हिला समजावून मग त्यांना फोन करून कळवावं लागेल...


बाबा- मी बोलतो तिच्याशी, तू जरा शांत हो.... अनघा, हे बघ बाळा सगळ्यांनाच कधी ना कधी लग्न करून सासरी जावxच लागतं बाळा... ही रीतच आहे, दुनियेची.


अनघा- बाबा, मग मी कुठे नाही म्हणतेय, फक्त एवढंच म्हणते आहे की इतकी घाई का??? मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे... नंतर स्वतःच्या पायावर उभं रहायचं आहे. मग करेल की लग्न!!!!


बाबा- अगं बाळा, ते तर तू लग्न झाल्यावरही करू शकते त्यात काय एवढं, पण हे स्थळ खूप चांगलं आहे, परत असं स्थळ येईल की नाही माहीत नाही.... मला असं वाटत आहे तू लग्नाचा विचार करावा बाकी तू समजदार आहेस.


आई- अनघा बाळा, आता सोड हा हट्ट मी जोशींना फोन करून कळवते की या म्हणून तू तयारीला लाग.....!!


अनघा- काय करू काहीच कळत नाहीये, एकतर शेवटच्या वर्षाचं टेन्शन, त्यात हे लग्नाचं!!! मी तर अजून लग्नाचा विचारदेखील केला नाहीये. बघायला आल्यावर काय विचारू हेही मला कळत नाहीये आणि खूप घाई होतेय अस पण मला वाटतं आहे. (निराश होऊन)


आई- अनघा, अगं जोशी कुटुंब परवा येताय तुला बघायला. मुलगा खूप चांगला आहे म्हणे, नोकरी करतो. एकुलता एक आहे आई-वडिलांना. सुखात राहील माझी लेक तिकडे... अनघाला म्हणत. आणि अनघा, तुला जे विचारायचं ते विचारून घे बाळा त्यांना. काही टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही आहोत ना..!!!


असं म्हणत अनघाच्या आई-वडिलांनी अतिशय घाईने अनघाला समजावून स्थळ बोलवलं खरे... त्यात अनघा आतून घाबरलेली, अस्वस्थ, कारण लग्नाचा विचार अजून केलाच नसताना हे स्थळ येत असल्यामुळे तिला काही सुचेनासे झाले......!!

घरात तयारी सुरू झाली पाहुणे येणार म्हणून, मी आपली विचारातच की आता काय होईल माझं पुढे... काय करू काही कळेनाच, तेवढ्यात आई आली माझ्या खोलीत.


आई- अगं अनघा, हे बघ ही साडी मी खास तुझ्यासाठी ठेवलेली, की तुला बघायला येतील तेव्हा तू ही साडी घालशील. कशी आहे साडी??? आवडली का तुला???


अनघा- हो, छान आहे.


आई- चल मग तू पटापट तयारी कर, ते लोक निघालेत म्हणे, येतीलच थोड्या वेळात. तुला काही मदत लागली तर मला हाक मार हं.......


बिचारी अनघा अस्वस्थ होती, तशीच लागली तयारी करायला. तयारी करून विचार करत बसली होती आपल्या खोलीत तेवढ्यात पाहुणे मंडळी आले. अनघा गाडीचा आवाज ऐकून अजूनच घाबरली तिला काही सुचेनासे झाले. आतून पार तिचा थरकाप होत होता. पाहुणे घरात आले, चहा पाणी झालं, बराच वेळ सगळ्यांच्या गप्पा झाल्या.


आता ती वेळ आली होती, अनघाला बाहेर जाण्याची. अनघाची आई अनघाला घ्यायला आली. अनघा खूपच घाबरलेली. कारण तिच्यासाठी हे सगळं नवीनच होतं. आईसोबत अनघा बाहेर गेली आणि समोर असलेल्या खुर्चीवर बसली. तेवढ्यात अनघाच्या वडिलांनी पाहुणे मंडळींना अनघाला काय विचारायचे ते विचारा म्हणून सांगितले.


अनघा आपली खाली मान घालून थरथर करतच होती. तेवढ्यात एक एक करून सगळ्यांनी प्रश्न विचारले, मुलानेही एक-दोन प्रश्न विचारले. अनघाने योग्य पद्धतीने सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. बोलून झाल्यावर अनघा आत गेली. तितक्यात पाहुणे मंडळींनी आम्हाला अनघा पसंत आहे म्हणून सांगितले. अनघाच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला, कारण त्यांना आधीच मुलगा बघताक्षणीच आवडला होता. आता प्रश्न होता तो अनघाचा होकार देण्याचा. आई-वडिलांनी आत जाऊन अनघाशी बोलणे केले, आणि समजावलेही, मुलगा चांगला आहे आणि घरचेही सुसंस्कृत आहेत. तुला काय वाटतं????


अनघा बोलली, तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते करा मी तुमच्या मताशी सहमत असेल. कारण आता अनघालाही कळून चुकलं होतं की घरच्यांना स्थळ आवडलंय म्हणून.... ती उत्तर देण्याच्या मनःस्थितीत नव्हतीच कारण आतून ती पूर्ण गोंधळलेली होती. पण तिने आई-वडिलांवर विश्वास ठेवत निर्णय त्यांच्यावर सोपवला.


अनघाच्या बाबांनी बाहेर येऊन आमचाही होकार आहे म्हणून सांगितलं... मग सगळं बोलणं झालं, देण्या-घेण्याच्या गोष्टी झाल्या, आणि शेवटी लग्नाची तारीख ठरवली गेली.


आता मात्र अनघाने स्वतःच्या मनाची तयारी करून घेतली होती लग्नासाठी. घरात आनंदाचे वातावरण पसरले होते. लग्नाची तयारी जोराने सुरू झाली. आणि बघता बघता तो दिवस उजाडला.... अनघाचा लग्नाचा दिवस.


लग्नाच्या दिवसापर्यंत अनघा मुलाशी बोललीदेखील नव्हती. मग अनघाच्या आई-वडिलांनी अगदी जोरात अनघाचं लग्न लावून दिलं. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन, अनघा तिच्या सासरी गेली.........


सासरी तर गेली, पण अनघाच्या मनात अजूनही खूप द्वंद्व होते. कारण अजून ती मुलाशी बोलली नव्हती, मुळात त्याचा स्वभाव कसा असेल, सासरचे लोक कसे असतील, तिथे मी माहेरी वावरत होती तशी वावरू शकेल का????? असे खूप प्रश्न तिला पडत होते....


अशाप्रकारे अनघा तिच्या सासरी आली. तिच्या सासूने थाटामाटात तिचे स्वागत केले. घरात पूजा झाली. अनघा तोपर्यंतही तिच्या नवऱ्याशी बोलली नव्हती. शेवटी रात्री जेवणं वगैरे आटोपल्यावर अनघा तिच्या रूममध्ये बसून नवऱ्याची वाट बघत होती. की आता तरी मोकळा वेळ आहे त्याच्याशी बोलत येईल. अनघा आपली विचार करत बसलेली की बोलायला सुरुवात कुठून करायची, तेवढ्यात प्रशांत म्हणजेच अनघाचा नवरा रूममध्ये आला. अनघा थोडी घाबरलेलीच होती. तिला वाटलं की प्रशांत आधी बोलेल म्हणून ती गप्प होती. तिने विचार केलेला की प्रशांतला शिक्षणाबद्दल बोलावं म्हणून. पण तो काही बोलेनाच...


तो बाथरूममधून निघाला आणि काही न बोलता अंथरूण घेऊन बाहेर झोपायला निघून गेला. अनघाला थोडं वेगळं वाटलं, तिला प्रश्न पडला की प्रशांतने असं का केलं असेल???


पण ती त्या दिवशी इतकी दमली होती की, तिला गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा उठली ती पटकन आवरून तयार झाली आणि किचनमध्ये गेली, तिने सगळ्यांसाठी चहा बनवला. सगळ्यांना चहा देऊन ती प्रशांतसाठी चहा घेऊन त्याच्या रूममध्ये गेली. चहाचा कप पुढे करत तिने प्रशांतला आवाज दिला, प्रशांतने तो कप जोरात हात मारत फेकून दिला, आणि बाहेर निघून गेला. अनघा मात्र आता जाम घाबरली की कालही प्रशांत न बोलता निघून गेला आणि आज हे असं... तिला नेमके काहीच कळत नव्हते ती रडायला लागली. तिने आईला फोन करून सर्व काही सांगितले. आईने अनघाची समजूत काढली की, प्रशांतले कसले तरी टेन्शन असेल म्हणून त्याने तसे केले असावे, तू काही काळजी करू नको होईल सगळं ठीक, म्हणून आईने अनघाला धीर दिला. अनघाला जरा बरं वाटलं. आणि ती तिच्या कामाला लागली. तिने तिच्या सासूलाही घडलेल्या प्रकरणाबद्दल सांगितले, पण सासूने तू काही काळजी करू नकोस म्हणून ती गोष्ट टाळून दिली.


दुसऱ्या दिवशी अनघाचे बाबा तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी आले, अनघा खुश होती कारण माहेरी जाणार होती. अनघाने बाबांसाठी चहा टाकला. सगळ्यांनी चहा घेत गप्पा केल्या, मग अनघाने सासू-सासऱ्यांच्या पाया पडून नमस्कार केला, आणि तिच्या रूममध्ये जाऊन प्रशांतला सांगितलं की मी माहेरी जातेय, त्यावर प्रशांत काहीही बोलला नाही, फक्त बघत होता तिच्याकडे. अनघाच्या डोळ्यांत पाणी आलं, कारण प्रशांतचं हे असं वागणं तिला आतून काट्यासारखं टूचत होतं. पण बाबांना नको कळायला म्हणून तिने अश्रूंना आवर दिला. आणि बाहेर आली. घरातून बाहेर निघताना तिचं लक्ष सारखे तिच्या रूमकडे जात होते. जणू तिची नजर प्रशांतला शोधत होती. बाबांसोबत ती माहेरी आली. आईला घट्ट मिठी मारून तिला रडायला आलं. आईशी गप्पा मारून जरा कुठे तिला बरं वाटलं. ती प्रशांतच्या फोनची वाट बघत होती की कधी त्याचा फोन येईल आणि ती बोलेल. २, ३ दिवस झाले आता तिला माहेरी राहून, तिला उद्या उजाडल्यावर सासरी निघायचे होते.

ती वाटच बघत होती की प्रशांत तिला घ्यायला येईल आणि ती जाईल म्हणून......!!!!


अनघाला लग्नानंतर एक छान नवीन आयुष्याला सुरुवात करायची होती, पण त्यात तिला प्रशांतची साथ हवी होती,

आलाच तो दिवस, आज अनघा तिच्या सासरी जाणार होती. थोडी खुश होती कारण तिला माहिती होतं की घ्यायला प्रशांतच येणार म्हणून....


अनघा मस्त तयार झाली आणि वाट बघू लागली तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला, तिला आनंद झाला की आले प्रशांत म्हणून... बाहेर जाऊन बघते तर प्रशांत नसून अनघाचे सासू-सासरे आलेले तिला न्यायला. अनघा हिरमुसली. अनघाच्या आई-वडिलांनी विचारले देखील की जावई बापू नाही आले अनघाला घ्यायला. तर अनघाची सासू म्हणाली की, प्रशांतला जरा ताप आलाय तो आराम करतोय घरी, तो येत होता आम्हीच नाही म्हणालो. अनघाचे आई-वडील म्हणाले बरं केलंत, जावईबापू नाही आले त्यांचा आराम तरी होईल. अनाघा बाहेर आली आणि सासू-सासऱ्यांच्या पाया पडली. थोड्या वेळात ते जाण्यास निघाले. अनघाला परत रडू फुटले, कितीही झालं तरी माहेरच ना ते....


गाडीत अनघा अगदी गप्प होती. तिला हा प्रश्न सतावत होता की प्रशांत का नाही आले. काय झालंय त्यांना असं का वागताय???? तिला काही कळेनाच.... विचार करता करता घर कुठे आले तिला कळालेही नाही.घरी येऊन अनघा तिच्या रूममध्ये गेली, प्रशांत नव्हता तिथे. ती फ्रेश होऊन जरावेळ आराम करत होती की बाहेर जोरात कसला तरी आवाज आला... अनघा दचकून जागी झाली आणि बाहेर धावत सुटली. बाहेर हॉलमध्ये जो Fish tank होता तो प्रशांतने तोडला होता. अनघा हे सर्व बघून आश्चर्यचकित झाली. ती प्रशांतला आवरायला गेली असता प्रशांतने तिलादेखील दूर धक्का मारला. अनघा भिंतीवर जाऊन आपटली, थोडा डोक्यावर मार लागला. अनघाची सासू पळतच आली आणि अनघाला उठवून तिच्या रूममध्ये घेऊन गेली. अनघा खूप रडत होती, तिने सासूला परत विचारले की, प्रशांत असे का वागता आहेत. काय झालंय??? मी या घरात आली तर त्यांना आवडलं नाहीये का??? का ते असे वागता आहेत.....


सासू अनघाला बोलली तू आधी शांत हो बघू आणि त्याचं इतकं मनावर नको घेऊस थोडा चिडक्या स्वभावाचा आहे तो.... आणि हे आताचं नाहीये तो नेहमी असं करतो. तू काळजी नको करुस. तू आराम कर मी बघते त्याला जाऊन. सासू दार बंद करून बाहेर गेली. प्रशांतला सोफ्यावर बसवून त्याला एक गोळी दिली आणि पाणी दिलं. अनघाने दाराजवळ येऊन सर्व काही बघितले की, आईंनी प्रशांतला कसली गोळी दिली असेल???? काय झालंय प्रशांतला.... अनघा परत तिच्या रूममध्ये जाऊन बसली. आता तर तिच्या मनात खूप वेगवेगळे प्रश्न येत होते... ती खूप घाबरली होती. प्रशांत अजून माझ्याशी काही बोलला का नाहीये??? तो असा राग राग का करतोय???? शेवटी तिने विचार केला की आज रात्री सगळे झोपले की मी याचा शोध घेणार, काही ना काही तरी नक्कीच कळेल. तिला ते गोळ्यांचं पॅकेट बघायचं होतं.... कसल्या होत्या त्या गोळ्या??????


अनघा खूप बेचैन झाली होती. रात्री सगळे झोपण्याची वाट बघत होती. सगळे झोपल्यावर अनघा हळूच आवाज न करता हॉलमध्ये आली. तिला ते गोळ्यांचं पॅकेट शोधायचे होते. तिने हॉलमध्ये सगळीकडे शोधले पण तिला मात्र ते सापडले नाही. ती शोधत असतानाच तिचा धक्का हॉलमध्ये असलेल्या फ्लॉवरपॉटला लागला आणि तो खाली पडला, प्रशांत हॉलमध्येच झोपला होता. तो आवाज ऐकून जागा झाला तोच अनघा रूममध्ये पळाली. आणि दार बंद करून झोपली. थोड्या वेळाने प्रशांतदेखील झोपी गेला. दुसऱ्या दिवशी अनघा उठली आवरून कामाला लागली. तिला काहीच सुचत नव्हते काय करावे ते. प्रशांत आपला गप्प टीव्ही बघत बसला होता. सासू तिला मदत करत होती स्वयंपाकात. सासरे पेपर वाचत बसले होते. दुपारी जेवण झाल्यावर अनघा रूममध्ये जाऊन आराम करत होती. आणि रडत बसलेली. की नवीनच लग्न झालं आहे पण काहीच सुख नाहीये. वाटतच नाहीये की लग्न झालं आहे असं, नवरा असून नसल्यासारखा वागतोय. त्यात सासू-सासरे काही सांगत नाहिये. तिला खूप त्रास होत होता. पण तिने मनाशी निर्धार केलेला, की जोपर्यंत मला सगळं काही कळत नाही तोपर्यंत आई-वडिलांना काही सांगायचं नाही. पण आतून मात्र ती पूर्णपणे तुटत चालली होती. तिची सगळी स्वप्ने तिला मातीमोल होताना दिसत होती. त्यात शेवटच्या वर्षाची परीक्षा कशी द्यायची हेही तिला कळत नव्हते.


तेवढ्यात अनघाला केतकीचा फोन आला (केतकी म्हणजे अनघाची जिवलग मैत्रीण). अनघाला तिचा राग आलेला कारण केतकी लग्नाला नव्हती. केतकीने फोनवर अनघाची माफी मागितली. अनघाच्या लग्नाच्या दिवशी केतकीच्या बाबांची बायपास सर्जरी झालेली म्हणून केतकी इच्छा असूनही लग्नाला जाऊ शकली नाही. हे ऐकून अनघाला वाईट वाटले, अनघाने केतकीला बाबांची विचारपूस केली. दोघांच्या छान गप्पा रमल्या. तसं तर केतकी ही डॉक्टर होती. तिचा स्वतंत्र दवाखाना होता. केतकीने अनघाला लग्नानंतर कसं चाललंय असं मजेत विचारलं... तोच, अनघा रडू लागली आणि घडलेलं सर्व काही तिने केतकीला सांगितलं. तिने जे काही सांगितलं ते ऐकून केतकी अक्षरशः अवाक् झाली.... किती वेळ तर फोनवर बोललीच नाही. अनघा तिला सारखी आवाज देत होती, केतकी काय झालं म्हणून... पण केतकी मात्र ते सर्वकाही ऐकून निःशब्द झालेली.... जणू काही अनघापेक्षाही मोठा धक्का केतकीला बसला.


आणि केतकीने एकाएकी फोन ठेवला... केतकीने फोन ठेवताच अनघाला वाटलं, केतकीला काही काम आले असेल म्हणून तिने कट केला असेल फोन. पण तिकडे केतकी मात्र वेगळ्याच विचारात होती. तिच्या पायाखालची जमीनच जणू सरकली होती. इकडे अनघा आवरून बाहेर आली. सगळ्यांसाठी चहा टाकला, रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली. अनघा शांत होती, तिचे तिचे काम करत होती. सगळ्यांची जेवणं आटोपली अनघा तिच्या रूममध्ये जाऊन झोपायच्या तयारीत होती. तिने दार लोटून दिवे बंद केले आणि तिच्या पलंगावर झोपली तोच दार उघडण्याचा आवाज आला, अनघा दाराकडे बघू लागली.... बघते तर काय, प्रशांत आत आला होता आणि आत येऊन तो तिच्या बाजूला येऊन झोपला ती जरा घाबरलीच, पण प्रशांत तिकडे तोंड करून झोपला होता. अनघाने हळूच पांघरूण प्रशांतच्या अंगावर टाकले, प्रशांत झोपी गेला. आज अनघाला मात्र थोडा आनंद झाला. कारण काही का असेना पण प्रशांत मात्र आज तिच्यासोबत होता. तिला खूप बरं वाटलं. आणि थोड्या वेळानं तीही झोपी गेली.


सकाळी उठून बघते तर प्रशांत रूममध्ये नव्हता. अनघा आवरतच होती की तिला केतकीचा फोन आला. अनघाने फोन उचलताच केतकी म्हणाली, अनघा मला तुला भेटायचं आहे, तुला जमेल का माझ्या घरी आज दुपारी यायला. प्लीज नाही म्हणू नको. अनघाने होकार दिला. आणि केतकीने फोन ठेवला. अनघा खूप दिवसांनी केतकीला भेटणार होती म्हणून जरा आनंदी होती. तिने पटकन आवरून नाश्ता बनवला, जेवणाची तयारी केली. आणि सासूला विचारले की माझ्या मैत्रिणीने आज घरी बोलावले आहे जाऊ का??? सासू म्हणाली, ठीक आहे तू जा स्वयंपाकाचं मी बघून घेईल. अनघा केतकीकडे जाण्यास निघाली.... वाटेत थांबून तिने केतकीसाठी मिठाईचा बॉक्स घेतला आणि मग निघाली. केतकी तिची वाटच पाहत होती. अनघा केतकीकडे पोहोचली, केतकीने दार उघडताच अनघाने आणलेली मिठाई केतकीला देऊ केली आणि बोलली की तू लग्नाला आली नाही म्हणून ही लग्नाची मिठाई. केतकीने मिठाई घेऊन ठेवली आणि अनघाला भेटून रडू लागली.


अनघा केतकीला बोलली आज तू दवाखान्यात नाही गेली का??? केतकी म्हणाली, दुपारी जेवणासाठी घरी येते. जाईल थोड्या वेळात, पण तुला मला महत्वाचे काहीतरी बोलायचे आहे. तू चल माझ्या रूममध्ये. अनघा म्हणाली, हो जाऊ पण आधी मला बाबांना भेटू दे म्हणत ती बाबांना भेटली, त्यांच्याशी गप्पा केल्या. केतकीचा जीव वर-खाली होत होता, कारण जे केतकी अनघाला सांगणार होती ते अनघा पचवू शकेल की नाही याची तिला भीती वाटत होती. तितक्यात बाबांनी अनघाच्या हातात लग्नाचं पाकीट दिलं आणि अखंड सौभाग्यवती भव हा आशीर्वाद दिला. अनघाच्या डोळ्यांत चटकन पाणी आले. बाबांनी विचारले, अनघा बाळा, काय झालं सर्व काही ठीक आहे ना????


अनघा उत्तरली, हो बाबा तुम्हाला भेटून मला माझ्या बाबांची आठवण आली, म्हणून हे अश्रू आले. केतकीच्या बाबांनी अनघाच्या डोक्यावरून मायेने हात कुरवाळला.... केतकी म्हणाली, बाबा मी अनघाला आत घेऊन जातेय थोडावेळ, बाबा म्हणाले जा जा... खूप दिवसांनी भेटताय असं पण दोघी. आणि केतकी अनघाला घेऊन आत गेली. केतकीने अनघाला लग्नाचे फोटो दाखव म्हणून सांगितले. अनघाने फोटो दाखवण्यासाठी फोन काढला तर तो फोन बंद झाला होता, अनघा बोलली अगं केतकी चार्जिंगला लावते फोन चार्ज नाहीये, तोपर्यंत तू बोलणं तुला मला काहीतरी सांगायचं होतं ना????


केतकी म्हणाली, मी ते नंतर सांगेल आधी मला तुझे फोटो बघु दे. अनघा बोलली अगं चार्ज होतोय, थांब की.... मग दाखवते, तू सांग ना काय सांगणार होती. केतकी म्हणाली नाही मी जे सांगणार आहे ते तुझ्या फोटोंशी निगडित आहे म्हणून मला आधी फोटो बघणे गरजेचे आहे. अनघाला हसू आले, केतकी काय बोलत होती तिला काहीच कळत नव्हते. पण केतकी वेगळ्या विचारात होती. तिला अनघाच्या लग्नाचे फोटो बघणे अत्यंत गरजेचे झाले होते. त्याशिवाय ती निष्कर्ष काढू शकत नव्हती.. दोघांच्या छान गप्पा रंगल्या होत्या, केतकीचं संपूर्ण लक्ष मात्र अनघाच्या फोनकडे होतं, बोलता बोलता अनघाचा फोन चार्ज झाला होता. केतकीने पटकन फोटो दाखव म्हणून अनघाला सांगितले. अनघाने फोन घेतला आणि केतकीला तिच्या लग्नाचे फोटो दाखवत म्हणाली हे घे बघ, केव्हापासून तुझं फोटो पुराण सुरू आहे, असं म्हणत अनघाने तिचा फोन केतकीला दिला.


आता मात्र केतकी मनातून खूप घाबरलेली होती, तिला जी भीती होती ती खरी ठरते की काय फोटो बघून.. असे तिला वाटू लागले. जसे तिने अनघाच्या लग्नाचे फोटो बघितला, केतकीच्या पायाखालून जमीन सरकली. ती एकदम स्तब्ध झाली. अनघाने तिला विचारलं आता सांग तू काय सांगणार होती ते??? पण आता केतकीची चिंता अधिक वाढली होती, अनघाला कसं सांगू, ती पचवू शकेल का हे सर्व?? याचा विचार ती करत होती. तेवढ्यात अनघाने पुन्हा केतकीला विचारले, काय झालं केतकी तुला.. फोटो बघून असा धक्का का बसला तुला??? केतकी खंबीर झाली आणि अनघाला बोलली, अनघा जी शंका कालपासून माझ्या मनात होती ती खरी ठरली. अनघाला काहीच समजत नव्हते केतकी काय बोलते आहे, अनघा बोलली... केतकी सरळ भाषेत सांग काय म्हणायचं आहे तुला..


केतकी म्हणाली, अनघा आता तुझे मन खंबीर करून ऐक मी काय सांगते आहे ते... अनघा थोडी बिथरली, पण केतकीला म्हणाली, हा तू बोल असं काय आहे या फोटोत जो तुला इतका मोठा धक्का बसला. केतकी म्हणाली प्रशांत जोशीच ना तुझ्या नवऱ्याचं नाव??? अनघा हसून बोलली, अगं केतकी हा कुठला प्रश्न आहे... हो हेच नाव आहे माझ्या नवऱ्याचं. पण का गं काय झालं??? अगं अनघा तुझा नवरा माझा पेशंट आहे... अनघाला मात्र आता घाम फुटला होता, पुढे आणखी केतकी काय बोलेल यामुळे. अनघा बोलली पेशंट आणि माझा नवरा????


केतकी बोलली हो, साधारण मागील २ वर्षांपासून तो माझ्या दवाखान्यात येतोय. मीच बघतेय त्याला. केतकीने अनघाचा हात पकडला आणि तिला सांत्वन देत म्हणाली, अनघा प्रशांतला गंभीर मानसिक आजार आहे. आणि लहानपणापासूनच तो तसा आहेस, त्याचा त्याचा एकटा राहतो, त्याला नीट बोलतादेखील येत नाही. खूप चिडचिड करतो, म्हणजे थोडक्यात त्याला वेडा म्हटलं तरी चालेल. याआधी त्याची कुठे ट्रीटमेंट सुरू होती की नाही माहीत नाही, पण मागील २ वर्षांपासून त्याची ट्रीटमेंट माझ्याकडे सुरू आहे, त्याच्याच गोळ्या घेतो तो. हे सगळं ऐकून अनघा अक्षरशः चक्कर येऊन खाली पडली. केतकीला रडू आले, केतकीने तिच्या आई-वडिलांना देखील अनघाबद्दल जे घडलं ते सांगितलं. सगळे चिंतेत होते. त्यात अनघा बेशुद्ध होती. थोड्या वेळाने अनघा शुद्धीवर आली. कितीवेळ तर कोणाशीही बोलत नव्हती, केतकी तिला समजावत होती, की अनघाने अश्रूंचा टाहो फोडला आणि केतकीजवळ खूप रडू लागली, तिचं बघून केतकीलाही रडू आले.


केतकीची आई अनघाला समजावत होती, अनघा काही काळजी करू नकोस, यातून काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. पण अनघा एका निर्जीव पुतळ्यासारखी झाली होती, काहीच बोलेना. केतकीला अशी अवस्था बघवत नव्हती. केतकीने अनघाच्या आईला फोन केला आणि घडलेलं सगळे सांगितले. अनघाच्या आईच्या हातून फोन सुटून खाली पडला. अनघाच्या बाबांनी फोन घेतला तर केतकीने अनघाच्या बाबांनादेखील सर्वकाही सांगितले. अनघाच्या बाबांनी आम्ही तिकडे येतोय तू अनघाला तुझ्याकडेच असू दे म्हणून सांगितले. केतकीने फोन ठेवला, आणि केतकीने अनघाच्या सासरी फोन करून विचारले की, अनघा आज माझ्याकडे थांबली तर चालेल का?? अनघाची सासू म्हणाली त्यात काय विचारायचं असू दे तिला तिकडे, म्हणून अनघाच्या सासूने फोन ठेवला. अनघा काहीही ऐकण्याच्या किंवा बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हती. केतकीला अनघाबद्दल खूपच वाईट वाटत होते. की इतकी हुशार, सुशिक्षित, चपळ मुलगी, नेहमी दुसऱ्यांचा विचार करणारी.. आणि आज तिच्यावरच का असा प्रसंग ओढावला???


अनघा एकदम शांत बसली होती, थोड्यावेळात अनघाचे आई-वडील केतकीच्या घरी आले. केतकीने पुन्हा सगळं घडलेलं सांगितलं, अनघाची तशी अवस्था बघून तिचे आई-वडील अवाक् झाले होते. ते स्वतःलाच दोष देऊ लागले की, अनघाची इच्छा नसूनही आम्ही तिचं लग्न केलं, तिला तर बिचारीला तिचं शिक्षण पूर्ण करायचे होते. आम्ही स्वतः तिला या खड्ड्यात उडी मारायला सांगितली, म्हणून रडू लागले. यात जितका दोष अनघाच्या सासू-सासऱ्यांचा आहे , तितकाच दोष आमचादेखील आहे.. अनघाचे वडील पुढे म्हणाले, त्यांनी त्यांचा मुलगा वेडा आहे, हे आमच्यापासून लपवून खूप मोठी चुकी केली आहे, यासाठी आम्ही त्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर केस करू, असं अनघाची आई म्हणाली. तोच अनघा पुन्हा मोठ-मोठ्याने रडू लागली.


अनघाची अशी झालेली अवस्था पाहून सगळ्यांचे डोळे पाणावले होते. बिचारी अनघा एक सारखी रडतच होती, जणू तिचं सर्व काही संपून गेलं होतं. अनघाचे वडील उठले आणि म्हणाले, आताच्या आता चला आपण त्यांना जाब विचारू की, का ते असे वागले??? अनघाचे आई-वडील, केतकी अनघाला घेऊन निघाले तिच्या घरी जायला. ती तर बोलायच्या मनःस्थितीतदेखील नव्हती. ते तिच्या सासरी गेले, दार तिच्या सासूनेच उघडले, अनघाची सासू केतकीला बघून अवाक् झाली की, केतकी यांच्यासोबत कशी काय?? सगळेजण आत आले, अनघाची सासू म्हणाली, या ना बसा, अनघाचे आई-वडील अत्यंत रोषात होते. त्यांनी अनघाच्या सासऱ्यांना बाहेर बोलवा म्हणून सांगितले. अनघाचे सासरेही बाहेर आले.. आता मात्र अनघाचे वडील खूप चिडले होते, आणि तिच्या सासू-सासऱ्यांना म्हणाले, तुम्ही तुमचा मुलगा वेडा आहे हे आमच्यापासून का लपवून ठेवले.


अनघाच्या सासू-सासऱ्यांचा चेहरा त्यावेळेस बघण्यासारखा होता, दोघांनी खाली मान टाकलेली. अनघा आपली स्तब्ध उभी होती. त्यांच्यात खूप बाचा-बाची झाली. अनघाच्या वडिलांनी मी तुमच्यावर केस करतोय म्हणून सांगितले, तोच अनघाची सासू अनघाजवळ गेली आणि तिची माफी मागू लागली. पण ती बिचारी काहीच बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हतीच. अनघाची सासू म्हणाली, आमचं खरंच चुकलं आम्ही ही गोष्ट लपवली. पण तुम्ही केस करू नका आपण आपापसात सोडवू ना हा प्रश्न. अनघाची आई तिच्या सासूला बोलली, तुम्हीसुद्धा एक आई आहात, तुम्हाला असं करताना लाज नाही का वाटली??? एका मुलीचं जीवन तुमच्या मुलामुळे तुम्ही चक्क उद्ध्वस्त करून टाकलं?? तुम्हाला मुलगी असती ना... तर कळालं असतं तुम्हाला की किती त्रास होतो ते आणि केतकी जी प्रशांतची डॉक्टर होती, तिने ही अनघाच्या सासू-सासऱ्यांना मी अनघाची मैत्रीण आहे म्हणून ओळख दिली आणि आज अनघा माझ्याकडेच आली होती. ती तर बिचारी अज्ञान होती या गोष्टीला घेऊन, जेव्हा तिने तिचा लग्नाचा फोटो मला दाखवला तेव्हा सगळं उघडकीस आलं, असे केतकी अनघाच्या सासूला म्हणाली. आणि एक मैत्रिणीच्या नात्याने सांगते, तुम्ही खूप चुकीचं वागले आहात, याची शिक्षा ही तुम्हाला मिळायलाच हवी, असे बोलून सगळे अनघाला घेऊन तिथून निघून गेले... शेवटी व्हायचं तेच झालं... अनघाच्या सासू-सासरे यांच्यावर अनघाच्या आई-वडिलांनी केस केली, केसचा निकाल लागेपर्यंत ७/८ महिने उलटून गेले. निकाल अनघाच्या बाजूने लागला, जेवढं लग्नात यांनी दिलं होतं ते सगळं त्यांना परत मिळालं. दोघांचा घटस्फोट झाला. अनघाच्या सासू-सासऱ्यांना ६ महिन्याची कारागृहाची शिक्षा झाली, आणि प्रशांतला मानसिक वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. 


पण या सगळ्यात अनघाचं कुठे चुकलं, सांगा ना??? काय दोष होता तिचा म्हणून तिच्यासोबत हे असं घडलं???

तिची खूप स्वप्ने होती, तिला स्वतःच्या पायावर उभी राहायचं होतं. एका चांगल्या घरातून सुशिक्षित असलेली एक मुलगी, तिच्यासोबत असं काही घडणार होतं याची जरादेखील कल्पना बिचारीला नव्हती. आणि लग्नाची इच्छा नसताना आई-वडिलांमुळे तिने लग्न केले होते... हे चुकलं होतं का तिचं???


जे व्हायचं ते झालं हो.... पण अनघाच्या मागे एक घटस्फोटाचा शिक्का लागला ना... त्याचं काय??? समाज तिलाच कारणीभूत ठरवेल ना.. चुकी नसतानाही. का तर मुलींची इज्जत ही काचेच्या भांड्यासारखी असते म्हणे, भांड्याला तडा जाता कामा नये, पुरुषप्रधान असलेली ही आपली संस्कृती पुरुषांना कधीच जबाबदार ठरवत नसते, भले चूक पुरुषांची असो, त्यांची थोडी इज्जत जाते... त्यांचं काय एक लग्न मोडलं की लगेच दुसरं करता येतं... त्यांना कोणीच नाव ठेवत नाही. पण सगळ्यात आधी मात्र मुलींना ग्राह्य धरलं जातं. आणि हा शिक्का असा असतो की कधीच पुसला जात नाही, आणि ती बिचारी आतून तुटते ते वेगळं.

आजदेखील आपल्या समाजात अनेक अनघा आणि प्रशांत असतील, लग्न म्हणजे खेळ नसतो, ते एक पवित्र नातं असतं, निर्मळ नातं असतं, त्यात अशा गोष्टी लपवून कशा चालतील???


आणि हो जेवढी चूक अनघाच्या सासू-सासऱ्यांची होती, तेवढीच चूक अनघाच्या आई-वडिलांचीसुद्धा होती. त्यांनी त्यांचा निर्णय अनघावर लादला होता. तिने तर आई-वडिलांच्या इच्छेखातर स्वतःचं जीवन आगीत झोकून दिले, स्वप्नांना मागे टाकून. तिला तर यातून फक्त वेदनाच मिळाल्या. बस बाकी काही नाही.... तिचं पूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाल्यासारखे होते. जणूकाही जिवंत असूनही बिचारी निर्जीव झाली होती. तिला पुन्हा नव्याने सुरुवात करता येईल की नाही... हे ही शंकास्पद होते तिची अवस्था पाहून...!!!!


निष्कर्ष - गोष्ट जरी काल्पनिक असली तरी खऱ्या आयुष्यात या गोष्टी सहज होतात. आजही मुलांना पुढे केलं जातं आणि मुलींना मागे ठेवलं जातं. मुलींची इच्छा असूनही त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करता येत नाही. काही आई-वडील याला अपवाद असतात. पण एका हसत्या खेळत्या मुलीचं जीवन कधी उद्ध्वस्त होऊन जाते हे तिलाही कळत नाही.

कुठलीही गोष्ट करताना त्यात पारदर्शता हवी, तरच ती गोष्ट टिकून राहते. नाहीतर अनघासारख्या सुशिक्षित मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला जरा देखील वेळ लागत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे , घाईत केलेला निर्णय नेहमी चुकीचं ठरतो. मुलींना आज स्वतःचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य हे मिळायलाच पाहिजे. तरच अनघासारख्या मुली आपलं स्वप्न पूर्ण करू शकतील आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील....!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama