Sangieta Devkar

Drama Tragedy

4.0  

Sangieta Devkar

Drama Tragedy

अकल्पित

अकल्पित

5 mins
252


तनु माझा फोन दे आत आहे... निषाद ऑफिसला निघाला होता, तो फोन बेडरूममध्येच विसरून आला. तन्वी ने फोन आणून दिला.


तसा निषाद म्हणाला, तनु घाई घडबड करू नको व्यवस्थित शाळेला जा, काळजी घे स्वतःची आणि आपल्या बाळाचीसुद्धा... त्याने तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं व तिला बाय करत निघून गेला.


निषाद सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आणि तन्वी एका प्रायमरी स्कूलमध्ये टीचर होती. दोघांचा सुखी संसार होता. लग्नाला चार वर्षे झाली होती. ऑल सेट होतं, सो आता त्यांनी बाळाचा विचार केला होता. आणि तनु ला दुसरा महिना सुरु होता, दोघं खूप खुश होती. तनुला लहान मुलं खूप आवडायची म्हणूनच तिने टीचरचा जॉब स्वीकारला होता. ती स्वतःचे आवरून शाळेत गेली. दुपारनंतर ती घरी यायची मग जेवून थोडा आराम करायची, निषाद संध्याकाळी यायचा.


दुपारी पेपर वाचत असताना एका बातमीने तन्वीचे लक्ष वेधून घेतलं, "तुम्हाला सुसंस्कारी, हुशार, एक्स्ट्रा ऑर्डनरी, हुबेहूब तुमचेच गुण असलेले मुल हवे आहे का? मग आजच भेटा, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. फर्नांडिस..." अशी जाहिरात होती. त्या डॉ.चा फोन नंबर दिला होता. तन्वीच्या मनात आले की खरंच असे होत असेल का? असे झाले तर चांगलेच आहे ना, निषाद पण खूप हुशार आहे त्याचे गुण आपल्या मुलात आले तर छानच आहे मग, तिने निषादला ही बातमी दाखवायचे ठरवले.


रात्री जेवण झाल्यावर तन्वीने निषादला ती जाहिरात दाखवली. त्याने वाचली. निषाद म्हणाला, तनु असं काही होत नसते. आपले मुलं आपल्या सारखेच होणार त्याचा स्वभाव, गुण आपलेच असणार. असे कोणती ट्रीटमेंट घेऊन एक्सट्रा ऑर्डनरी मुलं जन्माला येत नसतात.


पण निषाद एकदा भेटून येऊ ना त्या डॉ.ना, काय सांगतात बघू ना प्लिज.


तो म्हणाला, तनु हा केवळ वेडेपणा आहे.


पण तनु ऐकायला तयार नव्हती. तिला भेटायचे होते डॉ.ना. तिच्या हट्टापायी दुसरे दिवशी ते दोघं डॉ. फर्नांडिसना भेटले. डॉ म्हणाले, मी बाहेर देशातून शिकून आलो आहे. आमच्या थेरपी आणि मेडीसिनमुळे अशी कित्येक मुलं जन्माला आली आहेत. त्यांनी काही जोडप्यांचे त्यांच्या बाळासोबतचे फोटो दाखवले, त्या पालकांचे अनुभव दाखवले.


ते दोघे घरी आले. डॉ.च्या बोलण्याचा तन्वीवर चांगलाच प्रभाव पडला होता. सो ती ही ट्रीटमेंट घेणारच म्हणून निषादकडे हट्ट करू लागली. शेवटी निषादला तिचे ऐकावेच लागले. डॉ. फर्नांडिस यांची ट्रीटमेंट तन्वीला सुरु झाली. जवळ जवळ सहा महिने ही ट्रीटमेंट चालू होती. सोनोग्राफीमध्ये बाळाची वाढ व्यवस्थित होत असल्याचे समजत होते. सो निषाद निश्चिंत होता.


यथावकाश तनुला नऊ महिने पूर्ण झाल्यावर छान गुटगुटीत असा मुलगा झाला. दोघं खूप खुश होते. बाळासाठी तनुने जॉब सोडला होता. ती बाळाचं सगळं आनंदाने करत होती. बाळ सेम निषादची झेरॉक्स कॉपी होतं. बाळाचे नाव पार्थ ठेवण्यात आले. पार्थ खूप अवखळ आणि हुशार होता. बडबड, मस्तीही जास्तच करायचा. हळूहळू पार्थ के. जी. स्कूलमध्ये जाऊ लागला. मग पहिली, दुसरी असे करत तो आठव्या इयत्तेत गेला. तन्वीने पुन्हा जॉब सुरू केला होता. पार्थ अभ्यासात कायम पहिला नंबर, सगळ्या खेळात, स्कुल ऍक्टिव्हिटीमध्ये पार्थच पुढे असायचा, नंबर मिळवायचा.


तन्वी निषादला म्हणालीसुद्धा, बघ पार्थ आपल्या दोघांपेक्षा जास्तच हुशार झाला, त्या डॉ.च्या ट्रीटमेंटमुळे.


दोघं खुश होते, पार्थ यंदा नवव्या इयत्तेत गेला, तसा तो कोणत्याच खेळात इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत नव्हता, खूप शांत शांत असायचा. मोजकेच बोलायचा. तन्वीला वाटले अभ्यासाचा लोड असेल सो तो इतर ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेत नसेल. एकटा एकटा जास्त राहायचा. तन्वीला वाटले हे वय त्याचं वयात येण्याचे सो तो असा गप्प शांत झाला असेल. असेल हार्मोन्स चेंजेस, म्हणून तिने जास्त लक्ष नाही दिले.


एक दिवस तन्वी शाळेतून घरी आली. तिच्या आधी पार्थ यायचा. आज तो लवकरच घरी आला होता. तन्वीने आपल्याकडच्या किल्लीने दार उघडले. तिला पार्थ कुठे दिसेना. ती चेंज करण्याकरता तिच्या रुमकडे गेली. समोर पार्थला पाहताच तिला धक्का बसला. पार्थ तिची साडी घालून लिपस्टिक लावून आरशात स्वतःला पाहण्यात मग्न होता.


ती जोरात ओरडली, पार्थ हे काय करतोस तू?


तिच्या आवाजाने तो दचकला, तिला पाहताच पटापट साडी काढून फेकून दिली आणि रूमबाहेर पळाला. तिला समजेनाच की हा काय प्रकार आहे. तिने निषादला कॉल करून घरी बोलावून घेतले आणि झाला प्रकार सांगितला. ते ऐकून तोही अस्वस्थ झाला.


त्याने पार्थला आपल्या जवळ बोलवून घेतले आणि खूप प्रेमाने विचारले. तनु म्हणाली, पार्थ तू माझी साडी घालून काय करत होता... तू काही स्कुलमध्ये नाटकात वगैरे भाग घेतला आहेस का?


यावर पार्थला समजेना की आई-बाबांना काय सांगावे, कसे सांगावे की त्याला मुलीसारखं राहायला आवडतं. मुलांमध्ये तो रमत नाही. मुलांचे खेळ त्याला आवडत नाहीत. तो इतकंच म्हणाला, मला महित नाही. आणि त्याच्या रुमकडे निघून गेला.


निषाद म्हणाला, तनु आपण आपल्या फॅमिली डॉ.कडे जायला हवे पार्थला घेऊन, मला काहीतरी घोळ वाटतो. तन्वीला पण खूप टेन्शन आले. दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या फॅमिली डॉ.कडे गेले आणि पार्थने जे केले ते सांगितले. डॉ.नी पार्थच्या काही टेस्टस करायला सांगितल्या. रिपोर्ट आल्यावर पुन्हा या म्हणाले.


निषाद तन्वी खूप टेन्स होते. आज डॉ.नी त्या दोघांना क्लिनिकला बोलावले होते. पार्थ चे रिपोर्ट आले होते. तन्वी बोलली, डॉ. काही प्रॉब्लेम तर नाही ना, काय आहे रिपोर्टमध्ये?


डॉ. म्हणाले, तुम्हाला पार्थचे रिपोर्ट ऐकून धक्का बसेल, पण ही फॅक्ट स्वीकारणे हीच आताची गरज आहे. पार्थला मानसिकरित्या खूप जपावे लागणार आहे.


निषाद घाबरला म्हणाला, असे काय आहे त्यात?

तन्वी पण खूप टेन्स होती...


डॉ. म्हणाले, पार्थच्या शरीरात मुलीचे हार्मोन्स जास्त आहेत म्हणजे इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरान याचे प्रमाण जास्त आहे, त्या मानाने पुरुष हार्मोन्स म्हणजे टेस्टोस्टेरोनचे प्रमाण खूपच नगण्य आहे.


म्हणजे काय डॉ.? तन्वीने विचारले.


डॉ. म्हणाले, पार्थ मोठा होईल, वयात येईल, पण त्याच्यात स्त्रीत्व जास्त असेल, त्याला सांभाळून घेणं, आधार देणं हे तुमचे काम आहे. अशा खूप रेअर केसेस असतात. काही जेनेटिक दोषामुळे हे असे घडते, सो पार्थला समजून घ्या.


निषाद-तन्वीच्या डोळ्यासमोर सगळं जग फिरते आहे असं त्यांचं डोकं भिरभिरु लागलं. काय करावं त्यांना समजेना. कसे तरी दोघं घरी आले. तन्वी तर रडतच आली होती. तिच्या डोळ्यातले पाणी संपत नव्हते.


तेव्हा निषादने तिला जवळ घेतले म्हणाला, त्या फॉरेन रिटर्न डॉ.च्या जाहिरातीला भुलून आपण आज हा प्रसंग ओढवून घेतला आहे. आता जे आहे ते मनापासून स्वीकारणं यातच आपलं हित आहे. पार्थ आपला आहे तनु, त्याला आपली खरी गरज आहे. सो त्याच्यासाठी आपण खंबीर असायला हवं. त्याला समाजाच्या प्रवाहात आपणच उभं राहायला मदत केली पाहिजे. तोही सामान्यच मनुष्य आहे हे आपणच पटवून द्यायला हवे. पार्थ आपलं बाळ आहे. तो कसाही असला तरी आपल्याला प्रिय आहे. त्याच्यासाठी आपणच आता भक्कम बनायला हवं.


तनु म्हणाली, हो निषाद काहीही झालं तरी आपण कायम पार्थच्या सोबत राहू... तिने डोळे पुसले.


याला नियती म्हणायचे की कोणत्या चुकीची शिक्षा काहीच समजत नव्हते... सारेच अनाकलनीय अकल्पित असे घडले होते...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama