अकल्पित! भाग ८
अकल्पित! भाग ८
परेशची हकीकत ऐकून समिधा घाबरली होती पण पुढे काय झालं हे ऐकायची उत्कंठा तिलाही लागून राहिली होती.
"पुढे बोल ना परेश.. काय झालं त्यावेळी ?", समिधाने विचारलं.
"असं बघ समिधा, त्यावेळी गावात ही अशी भयंकर परिस्थिती होती आणि त्यामुळे गावातले सगळेच जण खूप घाबरले होते. बरं जंगलात वावर पूर्णपणे बंदही करता येत नव्हता कारण लोकांची गुरं-ढोरं, शेतमळे त्याच बाजूला होते. अन् याच विचाराने जो तो हतबल झाला होता. माझा काका, बाळा काका त्यावेळी फक्त दहा-बारा वर्षांचा होता. तो आणि त्याचे मित्र असेच एक दिवस खोडी म्हणून घरच्यांची नजर चुकवून रानच्या दिशेने गेले. बर गले तर गेले, ऐन संध्याकाळच्या वेळी कुणाला न सांगता गेले. तो अन् त्याचे दोन मित्र असे तिघे मिळून कधी घरच्यांचा डोळा चुकवून रानात गडप झाले कुणाला पत्ताच लागला नाही. संध्याकाळी पाच नंतर जंगलात पाऊलही ठेवायचं नाही असा गावचा नियम त्यावेळच्या त्या लहान मुलांच्या डोक्यात काय शिरणार म्हणा! मोठ्या माणसांना ज्या गोष्टीची भीती वाटते आणि गांभीर्य असतं नेमकं त्याच गोष्टींबद्दल लहान मुलांना मात्र जबरदस्त आकर्षण असतं. नको जाऊ म्हटलं की तर एखाद्या ठिकाणी मुद्दामून हटकून जातात हे करू नको, ते करू नको, असं म्हटलं की ते ती गोष्ट मुद्दामून करतात. त्या दिवाशीही असंच काहीसं झालं..."
परेशच्या अन् समिधाच्या डोळ्यांसमोर ती दृश्ये उभी राहत होती...
...
बाळा अन् त्याचे दोन मित्र जंगलात गेले तेव्हा कातारवेळ जोर धरू पाहत होती. अवघी दहा-बारा वर्षांची पोरं ती, गावात घडत असलेल्या घटना आणि कानांवर पडणाऱ्या गोष्टी या दोन्हीमुळे त्यांची जिज्ञासा आणखीनच फोफावली होती. शाळेत, गावच्या पारावार, माळरानावर विटीदांडू खेळतांना, सगळीकडे हाच विषय चघळला जात होता. बाळा अन् त्याचे दोन मित्र नाम्या आणि सखा, यांना कधी एकदा जंगलात जातोय आणि तिथं असं एवढं काय लपून बसलंय याचा शोध घेतोय याचीच घाई झाली होती. अर्थात चूक त्यांची होती असं म्हणण्यात अर्थ नाही कारण त्यांच्या उत्सुकतेला खतपाणी घालण्याचं काम हे गावतलीच मोठी मंडळी करत होती. पोरं लहान लहान म्हणून त्यांच्यापासून खऱ्या गोष्टी लपवल्या जात होत्या. त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतील, पोरं घाबरून घरातच दडून बसतील या त्यांच्या भबड्या विचारांनी सत्य काय आहे हे मुलांपासून दडवलं गेलं होतं.
दूपारची शाळा सुटली तशी ही तिकडी भैरोबाच्या मंदिरात नेहमी प्रमाणे जमली आणि तिथेच सखाने हा विषय काढला. हो नाही करता करता सगळ्यांचा विचार पक्का झाला की आज कसंही करून मणीच्या रानात एक फेरफटका मारून यायचा म्हणजे यायचाच! घरचे म्हणतात तसं खरंच तिथं काही भूतबीत असलं तर तेवढच त्याचं दर्शन आपल्याला होईल! हा विचार!.
संध्याकाळचे साडेपाच झाले आणि या तिघांनी आपले खेळ थांबवले. शाळेची दप्तरं तिथेच मंदिराच्या आडोशाला दडवून ठेवली. आणि हाफ चड्डीतली ही वानरसेना मणीच्या रानाच्या दिशेने कूच करू लागली.
संध्याकाळची उन्हं उतरली तसा हवेत गारवा वाढायला सुरुवात झाली होती. जंगलाची पायवाट जसजशी सर होत होती तसतसा हवेत झपाट्याने होणारा बदल नाही म्हटलं तरी या तिघांच्याही मनाला जाणवत होता. फांदी-पानांच्या गर्द वेढयातून जमिनीवर सांडणारी लख्ख उन्हं, तिन्ही सांजेच्या गारठ्यात क्षीण होत चालली होती. जसजसे हे तिघे आणखी आणखी आत जात होते तस तसं आजूबाजूच्या झाडावेलींचं आच्छादन आणखी आणखी गडद होत चाललं होतं. गप्पामस्ती करत जाणारी तिकडी आता मात्र शांतपणे आजूबाजूच्या वेलीवृक्षांनी वेढलेल्या जंगलाच्या राज्याची सत्ता निरखून बघत होते.
बाळ्या पुढे, त्याच्या मागे नाम्या आणि सर्वांत शेवटी सखा असे तिघे जण त्या अरुंद पाऊल वाटेवर चालत होते. चालून चालून त्या तिघांना आता बऱ्याच वेळ झाला होता. पाच-दहा पावले चालून गेले असतील.. पुढंच पाऊल टाकलं त्यक्षणी तिघांच्या अंगावर एक अतीशीत वाऱ्याची झालर दौडत गेली. जसं काही या तिघांनीही आता एका वेगळ्याच विश्वात प्रवेश केला होता. अगम्य अन् गुढतेचं वलय पांघरून बसलेला हा प्रदेश आगंतुकाच्या आगमनाने विचलित झाला होता. निद्रावस्थेमधून जागा झाला होता. त्याच्या खूप आत, खोलवर दडून बसलेल्या 'त्याला' आपल्या प्रदेशात झालेली घुसगोरी तत्काळ जाणवली असावी.
अंगावरून गेलेल्या त्या थंड वाऱ्याने तिघांच्याही अंगावर काटा आला. झपाझप चालणारी त्यांची पावलं जागच्या जागी थबकली.
"बाळ्या, मला भ्या वाटतंय लेका, ज् जाऊया का परत ?", मागून सखाचा भीतभीत आवाज आला. या तिघांमध्ये त्यातल्या त्यात भित्रा असा सखाच होता. त्याच्या आवाजासरशी बाळूने आणि नाम्याने मागे वळून पहिलं.
"हा की, मला बी हितं काय खरं वाटत न्हाई, ए चला रं, जाऊ वापस घरला.. नसतं लचांड नकू", नाम्याच्या थरथरत्या स्वरांनी सखाच्या हो त हो मिळवली.
बाळ्या मात्र मागे हटायला तयार नव्हता.
"आरं असं काय करताय ?!, आता आलोच हाऊत इतक्या आत त बघू की आजून आत.. असं काय भिताय लेकांनो, आपुन तिघं तिघं हाऊत !! एवढं भ्याचं काय कारण?", बाळ्या म्हटला खरं पण त्याच्या शब्दांत मुळीच जोर नव्हता. नाम्या आणि सखाचा विरोधच होता पण बाळ्याची पुसट इच्छा होती की एकदा तरी अजून आत जाऊन बघावंच नक्की आहे तरी काय?
त्या तिघांची वादावादी चालू होतीच की, तोच, ते तिघ उभे असलेल्या झाडीची पाने जोरजोरात सळसळ करू लागली. वरच्या बाजूची एक मोठाली फांदी खसकन हलली. अचानकपणे झालेल्या त्या आवाजाने तिन्ही पोरं दचकून वर बघू लागली. वरची ती फांदी काही क्षण स्थिर झाली आणि पुढच्याच क्षणी पुन्हा खाली वर झुलू लागली.
ते दृश्य बघून या तिघांचीही चांगलीच तंतरली. हे प्रकरण दिसतं तितकं साधसुधं नाही, याची तिघांनाही जाणीव झाली.
"ए ए नाम्या, आरं ते बघ, ती फांदी, आपुआप हलती रे!", बाळ्याचे थरथरते शब्द गपकन बाहेर पडले आणि ते ऐकून सखा आणि नाम्या आणखीनच थरथरून उठले. वरची ती फांदी आता एका लयीत खाली वर खाली वर होत होती. या तिघांची नजर त्या संथ लयीने जणू बांधून टाकली होती.
"अन् हलतीय बघ कशी ! जसं की, जसं की..", सखाचे शब्द तोंडातच अडखळले..
"जसं की, क् कूनतर त्यावर बसून झोके खातंय...", नाम्याने भीतभीत त्याचं वाक्य पुरं केलं अन् त्यासरशी त्या तिघांच्याही मानेवरून भितीची शीत लहर जोरात सरसरत गेली! एकाएकी फांदीचं झुलणं थांबलं अन् पुढच्याक्षणी या तिघांच्या पुढ्यात धप्प करून जमिनीवर काहीतरी पडल्याचा आवाज आला. डोळ्यांना जरी काही दिसत नसलं तरी ते काय असेल त्याच्या कल्पनेनेच तिघांची काळीज भीतीने अक्षरशः त्यांच्या घशात आली. आता मात्र तिथे एक क्षणही थांबून उपयोग नव्हता अन्यथा जिवाशीच गाठ होती. समोर उभ 'ते' काही सामान्य नक्कीच नव्हतं.. ना ते जनावर होतं ना पक्षी.. समोर उभं ते काळाच्या वेगळ्याच मितीतून अवतरलेलं होतं. ना जाणो अंधाराच्या कुठल्या पोकळीतून त्याचा या जगात प्रवेश झाला होता. तिघंही पोरं भीतीने पार थिजून गेली होती. समोर आलेल्या आवाजासारखाच आवाज आता त्यांच्या मागूनही आला. जसं की कुणीतरी आणखी तिथे अवतरलं आहे, बघता बघता चारी बाजूंनी तसे आवाज यायला लागले. झाडांच्या शेंडयांवरून, फांद्यांवरून धापाधाप उड्या घेत काहीतरी जमिनीवर पडत होते. ते जे काही होते, जे कोण होते त्यांची सेना तिथे अवतरली होती. आपल्या आजूबाजूला काय घडतय हे बघून बालळ्या, सखा अन् नाम्याच्या तोंडी भीतीने फेस आला होता. इथून सुसाट पळून जायची तिघांचीही इच्छा होत होती पण पावलं मात्र जमिनीला घट्ट चिकटून बसली होती. भीतीने तिघे एकमेकांच्या जवळ सरकून एकमेकांचे सदरे घट्ट पकडून थिजून अवतीभोवती घडणारं भयनाट्य असहाय्य डोळ्यांनी बघत होते.
आता मात्र चांगलाच अंधार पडायला सुरुवात झाली होती. जंगलाच्या इतक्या आतल्या भागात, चारही बाजूंनी दाट काळोख साकाळून येत होता. दिवसाच्या उजेडात हिरव्या रंगाच्या असंख्य छटा लेऊन उभं ते रान आता मात्र काळ्या-करड्या शाईचा कुंचला फिरवल्यासारखं काळपट पडत चाललं होतं. साऱ्या रंगांचं वैविध्य नाहीसं होऊन तिथे आता एकच रंग पसरत होता. काळा! काही क्षण गेले आणि चारी दिशांनी अवतरलेले ते अगम्य आकार, आता नजरेला दिसू शकणाऱ्या घनरुपात येऊ लागले. बघता बघता पाच,दहा, पंचवीस, असे ते आकार काळ्या हिरव्या रंगात आकार धरू लागले. काळीकुट्ट त्वचा, हाडांच्या जागी काटक्यासारखं अंग, नऊ-दहा फुट उंची, तोंडाच्या जागी वासलेल्या जबड्यातून वळवळणारी लालभडक जीभ, बटबटीत पिवळ्याजर्द डोळ्यांतून फाकलेली हिरवीकंच बुबूळं अन् हातापायाच्या पंजांवर वाढलेली लांबसडक नखं.. चारी बाजूंनी पसरलेलं काळोखाचं ते सैन्य बघून या तिघांना आपल्या समोर उभा साक्षात मृत्यू दिसू लागला. खसखस घशातून आवाज काढीत, दांत विचकून हसत ते काळे सैतान चारी बाजूंनी या तिघांना वेढा घालून उभे होते. एकेकाच्या तोंडून चिकट लाळ गळत होती. जणू या तिघांच्या कच्च्या मांसाचा सुगंध त्यांची भूक आणखी आणखी चाळवत होता. बाळ्या, नाम्या, सखा, तिघांचे भीतीने दात वाजत होते. आता आपलं काही खरं नाही हे त्यांना उमगलं होतं तरी जीव वाचवण्यासाठी अखेरचा एक निष्फळ प्रयत्न करावाच लागणार होता!
"आता कुठं जाताल पोरांनो ?!!", दातावर दात वाजवत किनरी आवाजात त्यातलं एक अभद्र खदखदलं.
वखवखलेल्या नजरांनी, वासलेल्या जाबड्यांनी या तिघांच्या नरडीचा घोट घ्यायला ते अंधारचं सैन्य पुढे सरसावत होतं....
*********************************************************************
(क्रमशः)

