STORYMIRROR

Krishna Shuchi

Drama Horror Thriller

3  

Krishna Shuchi

Drama Horror Thriller

अकल्पित! भाग १०

अकल्पित! भाग १०

5 mins
14

गडद होत चाललेल्या अंधारात भीतीने गारठलेले हे तिघे एकमेकांना खेटून उभे होते. भीतीने त्यांची ततपप होत होती.


"आता कुठं जाता पोरांनो ?!" चारी बाजूंना घेराव घालून उभ्या त्या अंधाराच्या सैन्याने आता त्यांचा वेढा आणखी आवळायला सुरुवात केली. एक एक पाऊल पुढे टाकत हळूहळू ते सारे जण या तिघांभोवतीचा वेढा आणखी घट्ट करू लागले. खसखस आवाज करीत दातावर दात घासत, विकृत हसत ती सारी पिशाच्चे एक एक पाऊल वाढवत या तिघांभोवती जमा होऊ लागली.


बाळू, नाम्या अन् सखा, तिघांनाही आपला मृत्यू समोर दिसत होता!


"ब ब बाळ्या, आरं काय त कर, म म मला मराचं नाहीयेss",नाम्या जवळ उभ्या बाळ्याच्या शर्टाची कॉलर आणखी जोरात खेचत बडबडत होता. बाळ्या अन् सखाचीही काही वेगळी अवस्था नव्हती. पायाला जणू मणामणाचं ओझं बांधल्यासारखे तिघांचे पाय जमिनीला जगाच्या जागी खिळून होते. हालचाल करून स्वतःचा जीव वाचवायची त्यांची हिम्मतच होत नव्हती. बघता बघता आजूबाजूला उभे ते सैतान दात विचकत, माणसाच्या वासाचा मागोवा घेत या तिघांच्या अगदी जवळ जमा झाले होते. फूट दोन फूट अंतरावर उभी ती काळसैनिकांची सेना साक्षात मृत्यूचंच आमंत्रण घेऊन आली होती. या तिघांना आपला अंत जवळ आल्याचा दिसत होता. सुटकेचा मार्ग दिसायचा बंद झाला होता. चारी दिशा त्या पिशाच्चांनी कुंठित केल्या होत्या. आत्यंतिक भीतीने तिघांनी आपले डोळे मिटून घेतले. काहीच क्षणात अंगावर झडप घालू पाहणारी ती पिशाच्चे, आपल्या शरीराचे किती अन् कसे लचके तोडतील या विचारांनी त्या तिघांचा भितीने थरकाप होऊ लागला.


आता कुठल्याही क्षणी काळोखाचं ते सैन्य आपल्या भक्ष्यावर झडप घालणार होतं की तोच, कांठळ्या बसवणारा एक प्रचंड आवाज सबंध आसमंतात घुमला.!. त्याच तिव्रतेचे आणखी काही आवाज एका मागोमाग येऊ लागले. भितीने डोळे गच्च बंद करून उभ्या या तिघांच्याही कानावर ते आवाज आदळले, तसे तिघांनी गपकन डोळे उघडले. भीतीने गपगार झालेल्या मेंदूच्या संवेदना क्षणभरात जागृत झाल्या आणि मुलांनी तो आवाज तत्काळ ओळखला. तो आवाज बंदुकीचा होता. एक नाही तर एकामागून अनेक असे बंदुकीचे बार सलग उडवले जात होते. मुलांनी आवाजाच्या दिशेनं पहिलं आणि नजरेच्या टप्प्यात येणारं दृश्यं बघून त्यांना आत्तपर्यंतच्या आयुष्यात झाला नसेल त्याहून कैक पटीने मोठा आनंद त्याक्षणी झाला.!


समोरून काही अंतरावर, बाळ्याचे वडील, अर्थात विनायकराव पाटील अन् त्यांच्यासोबत गावातली आणखी बरीच दणकट मंडळी असा भरगच्च जमाव त्वेषाने पुढे सरकत होता. पुढे चालणाऱ्या तिघा-चौघांच्या हाती वाट दाखवायला टोण्या मशाली धगधगत होत्या. अंधारचं कवच भेदून प्रकाशाची सेना निर्धाराने जंगलाची वाट सर करत इथपर्यंत आली होती. पाटलांच्या हातातील बंदुकीने बघता बघता आकाशाच्या दिशेने दोन बार झाडले होते. कदाचित ते या मुलांसाठीच होते..!


इथे मात्र या तिकडीला वेढा घालून उभे असलेले ते सैतान, मशालीचा तीव्र पीत प्रकाश अन् मानवांचा जमाव पाहताच सावध झाले. आयत्या वेळी हातातली 'शिकार' सुटून जाणार म्हणून त्यांचा संताप अनावर झाला. गावकऱ्यांच्या हातातल्या मशालींचा प्रकाश जसजसा जवळ येऊ लागला तसतसं हे काळोखाचं सैन्य भेदरून मागे मागे सरकू लागलं, अंधाराच्या वलयात गडप होऊन लागलं. बघता बघता त्यांची संख्या कमी होऊ लागली. जाता जाता त्यांच्यातल्याच एका संतापाने लाल झालेल्या अभद्राने भेदरून उभ्या बाळाच्या दंडावर अनुकूचीदार नख्यांचा खसकन वार केला अन् क्षणार्धात ते पिशाच्च काळोखाच्या उदरात गडप होत नाहीसं झालं..! अत्यंत तीव्र, आम्लयुक्त असा तो स्पर्श होताच अतीव वेदनेने बाळा किंचाळला. त्याच्या दंडाची भयंकर आगआग होऊ लागली. बघता बघता तिथे मोठी रक्ताळलेली काळपट जखम झाली. त्यातनं भळभळ रक्त वाहू लागलं. दुसऱ्या हाताने जखमेची बाजू पकडत वेदनेने बाळ्या खाली कोसळला...


गावकऱ्यांची फौज या तिघांपर्यंत पोहोचलीच होती. पुढे उभ्या दोघा-तिघांच्या डोळे फाडून बघणाऱ्या नजरा समोर अंधारात रोखल्या होत्या. कदाचित त्यांनाही त्या अभद्र सैतानी अस्तित्वाचं पुसटसं दर्शन झालं होतं. तेवढ्यात, लोकांना बाजूला सारत विनायकराव लगबगीनं पुढं आले. त्याच्या मागून नाम्या अन् सखाचे वडील गर्दीला मागे रेटत पुढे आले. समोर पाहतात तर ही पोरं अर्धमेल्या अवस्थेत जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेली होती. नाम्या, बाल्या अन् सखा, तिघंच्या तिघं भीतीने घामेघूम होऊन घामेघुम होऊन बेशुद्ध पडलेले होते. विनायकरावांची नजर बाळ्याच्या दंडावर गेली. ती भयानक जखम बघताच कितीही कठोर म्हंटलं तरी त्यांचं बापाचं काळीज हेलावून गेलं. लगोलग पुढे होतं त्यांनी बाळ्याला आपल्या मांडीवर घेतलं. अर्धशुद्धीत असलेल्या बाळ्याच्या अंधूक नजरेला विनायकरावांची धूसर प्रतिमा दिसत होती.


"बाळू, ए बाळू.. लेका काय झालं तुला ? बोल की !! हे कसं काय लागलं??", त्याच्या चेहेऱ्यावर चापट्या मारत विनायकराव त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागले. सखा अन् नाम्याच्या वडिलांची अवस्थाही काही वेगळी नव्हती.


आजूबाजूची मंडळी समोरचं दृश्य भयप्रद नजरेने बघत होती. एकंदर प्रकार पाहताच, काहीतरी भलतंच अभद्र घडलंय याची जाणीव तिथे उभ्या प्रत्येकाला होत होती. ज्या दोघा-तिघांनी अगदी पुसटश्या नजरेनं अंधारात गडप होणाऱ्या सावल्या बघितल्या होत्या ती लोकं तर भलतीच गर्भगळीत होऊन झाल्या घटनेचा आपापल्या परीने अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होती. त्यात विनायकरावांचे दोन मुलगे देखील होते.

जमावात उभ्या लोकांची कुजबूज अन् चर्चा यांना हळूहळू पेव फुटू लागलं...


"पाटील, अंधार चांगलाच पडलाय, आता हितं ही चर्चा नकू, आदी बिगिनं वाडा गाठू, अन् तिथं बातचीत करू.. पोरांची हालत पार बिघडलीय.., ये उचला रं पोरांना.. त्यांना वाड्यावर घेऊन चला .. चला लवकर.. अंधार पडलाय, चला चला..!", कुणीतरी गर्दीतून म्हणालं अन् विनायकरावांना त्यांचं म्हणणं पटलं. थरथरत्या हातांनी बाळ्याला त्यांनी आपल्या हातावर उचललं, बाकीच्या दोघा-तिघांनी नाम्या आणि सखाची मुटकूळी पाठीवर टाकली आणि लगोलग सगळी मंडळी आल्या पाऊली गावच्या दिशेने परत निघाली....

...


आठ वाजायला काही मिनिटं कमी होती. विनायकराव पाटलांच्या वाड्यात आज बरीच गर्दी जमलेली दिसत होती. अर्ध्या तासापूर्वी ही सगळी मंडळी मणीच्या जंगलातून परतली तेव्हा तिथे सापडलेल्या तिन्ही पोरांची हालत भलतीच खराब झाली होती. त्यात पाटलांचा मुलगा बाळ्या देखील होता. वाड्याच्या ओसरीवर, चिमणीच्या अन् दिव्यांच्या अंधूक पिवळसर प्रकाशात सगळा जमाव चिंताक्रांत चेहऱ्याने बसला होता. त्यात खुद्द विनायकराव पाटील, शेजारी त्यांची दोन तरुण मुलगे, गावातले मोरे सरपंच, नाम्या, सखाचे, दोघांचे वडील अन् गावातली इतर काही मंडळी होती.


वाड्याच्या आतल्या भागात, स्वयंपाकघरात बायका बसल्या होत्या. वासंतीबाई- विनायकरावांच्या पत्नी, डोळ्यांना पदर लाऊन बसल्या होत्या. त्यांच्या बाजूला त्यांची मुलगी सुलभा- बाळूची मोठी बहीण, ती आईला आधार देत होती. नाम्या, सखाची आई, शेजार-पाजारच्या बायका अश्या सगळ्याच जणी काळजीचे अन् भितीचे भाव घेऊन झाल्या घटनेची कुजबूज करत बसल्या होत्या.


बेशुद्धवस्थेत वाड्यावर आणलेली तिन्ही पोरं आतल्या खोल्यांत निजली होती. तिघांनाही सडकून ताप भरला होता. बाळ्याच्या हाताला झालेली जखम बऱ्यापैकी भीषण होती. वैद्य बुवांनी कशीबशी ती जखम कडूलिंबाच्या पाण्यात साफ करून त्यावर हळदीचा जाडसर लेप लावला अन् फडक्याने ती जखम घट्ट बांधून टाकली होती. तिन्ही पोरांची ही अशी अर्धमेली अवस्था बघून पोरांनी न जाणे त्या रानात काय बघितलं होतं या विचारानेच सर्वांचा थरकाप उडाला होता. नशीब बलवत्तर म्हणून निदान जीवंत तरी परत आली होती, अन्यथा... विनायकरावांना तो विचारही करवत नव्हता.


गावात आत्तापर्यंत ज्या काही अभद्र घटना घडल्या होत्या त्यात सापडलेली काही दुर्दैवी लोकं मात्र खरोखरीच जीवंत परत येऊ शकली नव्हती. काही बेपत्ता झाली होती अन् काही सुदैवाने सहीसलामत परत आलेली लोकं, काहीतरी भयंकर अभद्र नजरेस पडल्याचा धसका घेऊन ठार वेडी व्हायच्या मार्गावर होती. पोरांच्या जिवाची डोर मजबूत म्हणून त्या अमानवी भयाण संकटातून कशी का होईना पण तिघांची सुखरूप सुटका झाली होती...


*********************************************************************

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama