अधूरे प्रेम (भाग २)
अधूरे प्रेम (भाग २)


कॉलेज सुरू झाले. नवनवीन मैत्रीणी मिळाल्या. सगळ्यांशी छान गट्टी जमली. एखादा मुलगा मित्र म्हणून मिळवण्याचा प्रश्न नव्हताच. कारण कोणत्याही मुलाशी बोलणं म्हणजे गंभीर अपराध मानला जात असे. मुलाशी बोलताना दिसलं की घरातून बाहेर पडणं बंद. मग घरातील लोकांचा कितीही विश्वास असू दे किंवा नसू दे.
अंजली अगदीच लवकर तयार होऊन वेळेवर कॉलेजला पोहोचायची. बसायची मात्र शेवटच्या बाकावर. का कुणास ठाऊक? तिच्या गावातून जाणारी ती एकटीच मुलगी होती. बाकीची मुले होती. त्यामध्ये एक तिचा चुलत भाऊ पण होता. नाना म्हणायची त्याला.
तो बारावीच्या वर्गात होता. अंजली आणि नाना स्टंँडपर्यंत एकत्रितपणे गप्पा मारत जायचे. पण अचानक काय झाले काय माहिती.? नेहमीच्या प्रमाणे अंजली नानाला बोलवायला त्यांच्या घरी गेली.
"नाना, चला की लवकर, किती उशीर करता आवरायला."
नाना, "तुझं तू जा, मी नाही येणार."
अंजली, ठीक आहे म्हणून निघून गेली. दोन-तीन दिवस असंच चालू होते. नंतर मात्र जेव्हा अंजली नानाला बोलवायला गेली तो खूप चिडला तिच्यावर.
"तुला एकदा सांगितले तर कळत नाही का? तुझे तू जा गं, माझ्यासाठी नको थांबत जाऊ, माझं मी जात जाईन."
अंजलीला काही कळेना... खूपच वाईट वाटलं.
असे का वागतोय नाना काही समजेना. तिनं एकटं जायला सुरुवात केली. पण गप्प बसून चालणार नव्हते. अचानक नानाला काय झाले ते शोधून काढायचे होते. अंजलीने आत्याला सगळं सांगितले. "बघ ना गं आत्त्तू, नानाला काय झालंय, कसा वागतोय, नीट बोलत पण नाही, माझं काही चुकले का? विचार ना तू नानाला."
आत्याला आधीपासूनच सगळं माहिती होते. तिनं अंजलीला जवळ घेतली आणि पाठीवर हात फिरवून म्हणाली,
"हे बघ अंजली, तुझं काही चुकले नाही आणि नानाचे पण चुकले नाही."
"अग पण काय झालंय ते सांग तरी.?"
"अगं अंजली, तू कॉलेजला जायच्या अगोदरच वर्षभर आधीपासून सगळी मुले एकत्र जात होती. तू जायला लागली तेव्हापासून नानाला तू त्याची जबाबदारी वाटते म्हणून तो तुझ्या सोबत येतोय, पण त्यामुळे त्याचे मित्र त्याला चिडवतात,
बहिणीसाठी मित्रांना सोडणार का? त्याची मस्करी करतात. म्हणून तो तुझ्याशी असं वागतोय."
अंजली काय समजायचे ते समजले, त्यानंतर मात्र तिने नानाला सोबत येण्यासाठी हट्ट धरला नाही. शेजारच्या वाडीतील मुलींशी ओळख झाली होती, ती त्यांच्यासोबत जाऊ लागली.
क्रमशः