Pratibha Tarabadkar

Drama

3  

Pratibha Tarabadkar

Drama

अधांतर भाग ३

अधांतर भाग ३

4 mins
231


'आजी, मी अनन्या बोलतेय ',हे शब्द आजीने ऐकले आणि तिचा गळाच दाटून आला एकदम.'अगं बाळा कुठे आहेस तू? आम्ही किती काळजीत होतो,बाबा तुझ्या ऑफीस मध्ये जाऊन आले तेव्हा कळलं तू नोकरी बदलली आहेस म्हणून, आम्हाला रात्र रात्र झोप नाही तुझ्या विचाराने, ठिक आहेस ना?'आजीचे मन इतके भरुन आले होते की ती बोलता बोलता हुंदके देऊ लागली.आजीचा उंचावलेला स्वर बघून आई आतल्या खोलीतून बाहेर आली आणि अनन्याचा फोन म्हटल्यावर तिने आजीच्या हातून मोबाईल काढून घेतला,'अनन्या बाळा कुठे आहेस तू? आम्ही आत्ताच तुला घ्यायला येतोय.अशी कशी गं तू आम्हाला न कळवता अदृश्य झालीस?',आई बोलताना हसत होती,रडत होती... इतक्या दिवसांचे मनावरील मणामणाचे दडपण जणू दूर झाले होते.अनन्या सुखरुप आहे एव्हढ्या एकच विचाराने सर्वांना हुरुप आला होता.इकडे अनन्याचेही अश्रू अनावर झाले होते.

अनन्याचे दिवस वाऱ्याच्या गतीने पळत होते.ऑफिसमधून घरी आलं की तनयाताईच्या बाळाशी खेळताना वेळ कसा जातो कळत नव्हते.'बाळाचा पायगुण चांगला आहे 'असं सारे जण म्हणत होते.बाळाचे बारसे जवळ आले होते.आई आणि आजीची बारशाची तयारी जोरदार सुरू होती.तनया आणि अनन्या वेळ मिळेल तेव्हा शॉपिंगच्या निमित्ताने बाजारात मनसोक्त भटकत होत्या आणि घरी आल्यावर आजी आणि आईचा ओरडा खात होत्या.बाबा बारशाला बोलावण्यासाठी यादी तयार करत होते.रुपा,राधा आणि रत्नामावशीचा नंबर सर्वात प्रथम होता.तनयाच्या सासरच्या मंडळींची यादी सुरु झाली.

'मावशी,काका आणि मकरंदला बोलवायचे नाही 'तनयाने तट्कन सांगितले.बाळाला खेळवत बसलेल्या अनन्याच्या कानांवर किती दिवसांनी हे नाव पडलं.... मकरंद ....

मकरंदला ऑफिसमध्ये फोन आला, छाब्रियांचा,'अरे किती careless आहेत तुम्ही लोकं...सरळ फ्लॅट उघडा टाकून निघून गेला? सोसायटीच्या सेक्रेटरीचा फोन आला, गेले दोन दिवसापासून फ्लॅटचा दरवाजा सताड उघडा पडलाय,कुटे गेलाय तुमी लोकं? ताबडतोब इकडे या.'

मकरंद दचकला.अनन्या कुठे गेली?तो गृहीत धरून चालला होता की अनन्या शेवटचा महिना राहिल,सामानाची विल्हेवाट लावून मग जाईल पण हे तर विचित्रच घडलंय. मकरंदने टॅक्सीला हात केला.

'वा मिस्टर मकरंद,काय वागणं आहे तुमचं!'सोसायटीचा सेक्रेटरी छद्मी आवाजात म्हणाला.'एव्हढे शिकलेले तुम्ही, खुशाल सामान घरात ठेवून कुलुप न लावता निघून जाता?चोरीबिरी झाली असती म्हणजे? तुमच्या मिसेस कुठे आहेत?'मकरंद गुपचूप उभा राहिला.खुशालचेंडू मकरंदला ते सगळं सामान बघूनच कापरं भरलं.या सामानाची विल्हेवाट कशी लावायची?

रोज मकरंदचे मम्मी पप्पा दिवसभर फ्लॅट वर थांबून गि-हाईकांची वाट बघत बसायचे.जाहिरात वाचून कधी गि-हाईकं यायची,कधी नाही.मम्मीपप्पा त्यांना वस्तू दाखवून दाखवून हैराण झाले.मकरंदवर सगळा राग निघाला.

 'मी जे online shopping करणार आहे त्यांची list तुला forward केलीय, order it !'सुमोना ड्रेसिंग टेबल समोर उभी राहून लिपस्टिक लावत म्हणाली.सिगारेट ओढून ओढून काळ्या पडलेल्या ओठांवर भडक लिपस्टिक लावावी लागत असे.

'बापरे, फार expensive कपडे आहेत हे!'मकरंदने लिस्ट वर नजर टाकली.सुमोना स्थिर नजरेने त्याच्याकडे थोडा वेळ बघत राहिली आणि कुजकट हसत म्हणाली,'ब्रॅंडेड कपडे महागच असतात!'

'पण', मकरंदने विरोध करण्याचा प्रयत्न केला पण सुमोनाने आपली सॅक उचलली आणि बाय म्हणून बाहेर पडली.मकरंद हतबुद्ध होऊन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिला.मग त्याने जमिनीवर पडलेले कपडे गोळा करून बेडवर टाकले.रात्री परत ते कपडे जमिनीवर पडतील.मकरंदने सुस्कारा सोडला.सुमोना ऑफिसमधून घरी आली की एका हातात दारुचा ग्लास आणि एका हातात सिगारेट घेऊन बसे.मकरंद ऑफिसमधून घरी आला की सुमोना स्वीगी किंवा झोमॅटो वरुन डिनरसाठी ऑर्डर नोंदवण्याचे फर्मान सोडी.पार्सल आलं की उघडून त्यावर ताव मारी.मकरंद जेवला की नाही याची पर्वा करायचं तिला काय कारण होतं?तो थोडीच बच्चा होता?

'कल के लिये विंटाज बारमें एक टेबल बुक कर', सुमोनाने हुकूम सोडला.

'उद्या मी नाही येणार बारमध्ये.तुला माहिती आहे दर शनिवारी मी मम्मी पप्पांना भेटायला जातो ते!'

'आहारे मोठा श्रावणबाळ लागून गेलास की नाही, चुपचाप मी सांगते ते ऐक.My word is final in this house.तुझं ऐकून घ्यायला मी काही ती बेवकूफ अनन्या नाही, live-in मध्ये रहायचं आणि मेरा पति परमेश्वर म्हणून तुझी सेवा करायची!'सुमोना गडगडाट करत हसली.'मेरा पती मेरा परमेश्वर हा हा हा... remember, you are my partner... partner in crime hahaha '

तिचा प्रत्येक शब्द मकरंदच्या कानात शिसे ओतल्याचा भास निर्माण करत होते. मकरंदला हल्ली सुमोनाचा कंटाळा आला होता.रात्रभर सिगारेट आणि दारूत बुडायचं आणि सकाळी उठून अंघोळ करून ऑफिसला निघून जायचं.चहा नाश्ता,लंच सगळं ऑफिसमध्ये! घरात पसारे,दुर्गंधीचं साम्राज्य!आयतोबा मकरंदला सुमोनाचं वागणं फारच खुपायला लागलं होतं.

ऑफिसमध्ये लिंडा वर्गीज नावाचं नवं पाखरू जॉईन झालं आणि मकरंदची भ्रमरवृत्ती उफाळून आली.हळूहळू त्याने तिच्या भोवती आपलं जाळं पसरायला सुरुवात केली.लिंडासुद्धा प्रतिसाद देऊ लागली.आता तिच्या साठी पुढची चाल कुठली खेळावी याचा विचार करतच मकरंदने लॅच की ने सुमोनाचे दार उघडले.समोरचे दृश्य बघून त्याने डोळे विस्फारले.सुमोना टीपॉयवर ठेवलेली पांढरी पावडर हुंगत होती.'ड्रग्ज 'मकरंदने पटकन् दार लावले.

'हे काय करतेयस तू? ड्रग्स घेतेस?'मकरंद ओरडला.

'मग?'सुमोनाने प्रतिप्रश्न केला.

'नको असलं काही करुस.लोकांना जर कळलं तर ते पोलिसांना कळवतील आणि मग पोलिस आले तर?'मकरंदला विचारानेच घाम फुटला.

'लोकांना कसं कळेल?तू ्तर कळवणार नाहीस ना?'सुमोनाचा ड्रग्स मुळे झालेले विचित्र डोळे, त्यातील वेडसर झाक! मकरंदच्या पाठीतून थंड शिरशिरी दौडत गेली.

'हल्ली तू मला फार dominate करायला बघतोस,'सुमोना मकरंदच्या डोळ्यात रोखून पहात म्हणाली.'हल्ली लिंडाशी सूत जुळवायला बघतोस काय? तुला काय वाटलं,सुमोनाला तू बेवकूफ बनवशील?'धडपडत, तोल सावरत सुमोना उभी राहिली. मकरंदची गचांडी धरुन त्याला बेडरूममध्ये घेऊन गेली.बेडवरचे कपडे खाली टाकले आणि आपला लॅपटॉप उघडून थोडी खटपट करून एक व्हिडिओ मकरंदसमोर धरला. मकरंद तो व्हिडिओ पाहून सटपटला.सुमोना आणि त्यांच्या बेडरूम सीन्सचा तो व्हिडिओ होता.सुमोनाने कधी शूट केला होता कोणास ठाऊक!

'बेबी, कळलं ना माझ्या कडे काय आहे ते! जर माझ्याशी पंगा घेतला तर लगेच हा व्हिडिओ वायरल होईल याची खात्री बाळग',सुमोना एखाद्या व्हिलनसारखी गडगडाटी हसली आणि मकरंद सुन्न होऊन जागेवरच उभा राहिला.

नियतीने आपले काम चोख बजावले होते !


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama