Pratibha Tarabadkar

Drama

3  

Pratibha Tarabadkar

Drama

अधांतर भाग २

अधांतर भाग २

5 mins
149


अनन्या जागी झाली ती बेलच्या कर्कश्श आवाजाने.प्रथम तिला कळेचना की ती जागी आहे का स्वप्नात? हळूहळू ती उठून बसली.कचरेवाला बेल वाजवून निघून गेला होता.घरात निःशब्द शांतता होती.तिचे लक्ष टीपॉयवर ठेवलेल्या चिठ्ठीकडे गेले.मकरंदची चिठ्ठी!तो घर सोडून जात असल्याची दुष्ट वार्ता देणारा कागदाचा कपटा!त्या कागदाच्या कपट्याने तिचं सारं आयुष्यच उद्ध्वस्त झालं होतं.काही क्षण ती स्तब्ध बसून राहिली.आणि मग सोफ्याला रेटा देत हळूहळू उठून बसली.रात्रभर फरशीवर पडून राहिल्याने सारं अंग ठसठसत होते.तेव्हढ्यात मोबाईल वाजला.तिच्या ऑफिसमधील रुपा खन्नाघा होता.'हॅलो'अनन्याच्या आवाजात कंप होता.

'अरे तू आ रही है ना ऑफिसमें?आज न्यू प्रोजेक्ट के बारेमें डिस्कशन है तो बॉसने तुम्हे रिमाईंड करनेके लिए फोन करने को कहा था ',रुपाच्या या प्रश्नावर अनन्याला हुंदका फुटला.इतके दिवस कोंडलेल्या भावनांचा जणू स्फोट झाला होता.तिला कोणाच्या तरी मानसिक आधाराची नितांत गरज वाटत होती.अनन्याचे असे हमसून हमसून रडणे रुपाला अनपेक्षित होते.ती जरा गडबडली पण अनन्याच्या आयुष्यात काही तरी गंभीर घडले आहे हे रुपाने जाणले आणि तिने अनन्याला तिचा पत्ता ताबडतोब मोबाईल वर पाठवायला सांगितला.अनन्या ऑफिसमध्ये एकटी असे.जास्त कुणाशी बोलणं नाही,कुणात मिसळणं नाही त्यामुळे तिचं काय बिनसलं आहे त्याचा अंदाज रुपाला येईना.बॉसला काही तरी कारण सांगून रुपा अनन्याच्या घरी निघाली.

 'काय झालंय अनन्या? Anything serious?'अनन्याच्या पाठीवरुन हात फिरवत रुपाने विचारले.अनन्याला भडभडून आले.ती रुपाच्या गळ्यात पडून रडत रडत मकरंदच्या आणि तिच्या live in relationship बद्दल सांगू लागली.तशी रुपाचा पारा चढला 'स्साला xxx'तिने मकरंदला कचकचीत शिवी हाणली.

'अनन्या,तू माझ्या बरोबर चल ',रुपा म्हणाली.'तुझ्याबरोबर कुठे?'अनन्याने आश्चर्याने विचारले.'वर्किंग वुमेन्स हॉस्टेल मध्ये! मी तिथेच राहते.तुझ्यासाठी मी तिथे नक्की जागा मिळवून देईन.'

'आणि या सामानाचे काय करु?'अनन्याने घरातील वस्तूंवर नजर फिरविली.सोफा,टी.व्ही.,डबल बेड,भांडी... मकरंद बरोबर खरेदी केलेल्या साऱ्या वस्तू... किती स्वप्नं पाहिली होती आपण आपल्या भावी आयुष्याविषयी आणि मकरंद मात्र निष्ठूरपणे सोडून गेला एका वर्षाच्या आत!या वस्तूंमध्ये आणि माझ्यात काही फरक वाटला नाही त्याला?आपण त्याच्या लेखी या वस्तूंपैकी एक होतो का?इतका निष्ठूर होता मकरंद?

'ए हॅलो, कुठे लक्ष आहे तुझं?'रुपाने अनन्याच्या डोळ्यासमोर टिचक्या वाजवल्या तशी विचारात हरवलेली अनन्या भानावर आली.'मी आमच्या वर्किंग वुमेन्स हॉस्टेलच्या मॅडमशी बोलले तर एक कॉट व्हेकंट आहे.तू आताच माझ्या बरोबर चल.'अनन्याने मुकाट्याने मान हलवली आणि ती बॅगेत कपडे भरु लागली.तिच्या आयुष्याने अजून एक वळण घेतले होते.भविष्याच्या उदरात आणखी काय काय दडले होते कुणास ठाऊक!

 अनन्या हळूहळू वर्किंग वुमेन्स हॉस्टेल मध्ये रुळायला लागली.कधी न अनुभवलेलं आयुष्य होतं ते! वेगवेगळ्या शिफ्टस् मध्ये काम करणाऱ्या स्त्रियांमुळे हॉस्टेल कायम गजबजलेले असे.सारं स्त्रियांचच राज्य! त्यामुळे सगळ्यांच्याच वागण्यात मोकळेपणा होता.नवनवीन ओळखी होत होत्या,ऑफिसपासून हॉस्टेल जवळ असल्याने प्रवासाची दगदग नव्हती शिवाय सोबतीला रुपा होतीच त्यामुळे गप्पा गोष्टी,मेसमधील आयते जेवण यामुळे अनन्याची तब्येत सुधारली होती.मनानेही उभारी धरली.

अनन्याची रुममेट राधा नाईट शिफ्टला जात असल्याने तिची आणि अनन्याची फारशी गाठभेट होत नसे.पण अचानक लागोपाठ जोडून दोन दिवस सुट्या आल्या आणि राधा आणि अनन्याची निवांत भेट झाली.'तू कुठल्या गावची?'राधाने विचारले.'मी इथलीच आहे ',या अनन्याच्या उत्तराने राधा आश्चर्य चकित झाली.'मग आईवडिलांजवळ रहायचे सोडून तू हॉस्टेलवर का राहतेस?'

अनन्याने अथपासून इतिपर्यंत आपली जीवनकथा सांगितली.अगदी सुरक्षित, आनंदी बालपण ते मकरंद बरोबरचे सहजीवन पर्यंत!अनन्याचा आत्मविश्वास वाढला होता.इतके दिवस तिला अपराधी भावना खात होती त्यावर तिने मात केली होती.

मकरंदच्या स्वार्थी, आपमतलबी स्वभावाला अनन्यासारखी सरळ मुलगी बळी पडली हे राधाच्या लक्षात येऊन तिला फारच वाईट वाटले.आईवडील असूनही केवळ समाज काय म्हणेल या भीतीने त्यांनी मुलीशी संबंध तोडले याचे तिला वैषम्य वाटले.

'अनन्या,माझी एक मावशी स्त्री मुक्ती संघटनेचे काम करते.तिला तुझी केस सांगूया का?'

'त्याने काय होईल?'अनन्याने आश्चर्याने विचारले.

'त्या मुलाला जरब बसेल.तुझ्यासारख्या आणखी मुलींच्या आयुष्याशी खेळण्याचे त्याचे धाडस होणार नाही.'राधाने खुलासा केला.

'मग तर तुझ्या मावशीकडे हिला घेऊनच जा!',त्यांचे बोलणे ऐकत असलेली रुपा म्हणाली.'स्साला समोर भेटला ना तर त्याच्या तोंडाला काळं फासून भर चौकात चपलेने थोबाडून काढेन ',रुपा त्वेषाने म्हणाली.

तोंडाला काळं फासलेल्या मकरंदला रुपा भर चौकात चपलेने फटकावते आहे आणि जमलेली जनता आपल्या मोबाईलवर त्याचे चित्रण करुन व्हायरल करते आहे असे चित्र अनन्याच्या डोळ्यासमोर आले आणि तिला हसू फुटले.

'इतके दिवस उगीचच मी मनाचा कोंडमारा सहन करीत राहिले ', अनन्याला वाटले.

'मी आताच रत्नामावशीची अपॉईंटमेंट घेते ',राधा मोबाईल हातात घेत म्हणाली.'आणि रुपा तूसुद्धा चल आमच्या बरोबर रत्नामावशीकडे ...या रडूबाईला आधार द्यायला!'

रडूबाई शब्द ऐकला आणि अनन्याला हसू फुटले.आज्जीपण तिला असंच म्हणायची ... रडूबाई

रत्नामावशीचे स्त्री मुक्ती संघटनेचे ऑफिस म्हणजे एक साधी खोली होती.मात्र बायकांनी तुडुंब भरलेली.त्यांच्या गराड्यात बसलेल्या एका प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या स्त्री जवळ राधा गेली.'ही अनन्या, हिच्या बद्दलच मी तुला फोनवर बोलले होते.'

'नमस्कार ',अनन्याने मावशींना नमस्कार केला.'तुझ्या केसची साधारण कल्पना दिली आहे राधाने पण तू मला सारं काही खुलासेवार सांग ',रत्नामावशी खणखणीत आवाजात म्हणाली.'इथे'अनन्याने चोरट्या नजरेने आजूबाजूला पाहिले.तिची अडचण मावशींच्या लक्षात आली आणि ती हसून म्हणाली,'तुला ती म्हण ठाऊक आहे ना,ताकाला जाऊन भांडे लपवणे तसं करू नकोस.जे काय आहे ते कुठलाही तपशील न गाळता सांग.हे ऑफिस झालेल्या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठीच आहे आणि आजूबाजूला या साऱ्या बायका दिसताहेत ना त्या सर्व अन्यायाविरुद्ध दाद मागायलाच आलेल्या आहेत.'अनन्याला धीर आला आणि ती सांगू लागली,तनयाताईच्या लग्नात मकरंदशी झालेली भेट,परस्पर आकर्षणाने तीन वर्षे एकत्र हिंडणं फिरणं अन् लग्नाचा प्रस्ताव ठेवल्यावर मकरंदचं अचानक घूमजाव करुन लिव्ह इन रिलेशनशिपची कल्पना अनन्याच्या मनात हेतूपूर्वक भरवणं आणि अनन्या आपल्या जाळ्यात फसली आहे लक्षात आल्यावर तिच्या सरळ स्वभावाचा पुरेपूर फायदा घेऊन तिचा आर्थिक, मानसिक, शारिरीक छळ करुन दुसऱ्या मुलीबरोबर निघून जाणं....

रत्नामावशी अनन्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती.अधूनमधून टिपणं काढत होती.अनन्याचं बोलणं संपलं पण आश्चर्य म्हणजे अनन्याच्या डोळ्यात पाण्याचं टिपूस ही आलं नव्हतं.एखाद्या ति-हाईताची कहाणी सांगावी तशा अलिप्तपणे ती आपल्या आयुष्याची झालेली फरपट सांगत होती.

'काय गं तुम्ही मुली! इतक्या शिकलेल्या, नोकरी करणाऱ्या पण हुरळली मेंढी ,गेली लांडग्यापाठी अशा वागता?'रत्नामावशीच्या या टिपणीवर अनन्याकडे उत्तर नव्हतं.ती खाली मान घालून बसून राहिली.तिला आता खूप हलकं हलकं वाटत होतं.मनावरलं मणामणाचं ओझं उतरल्यागत!

'बरं,तुझे कुटुंब?कोण कोण असतं घरी?'

'आई,बाबा,आजी आणि लग्न होऊन सासरी गेलेली बहिण तनया.'सगळ्यांची आठवण येऊन तरारलेले डोळ्यातील पाणी निग्रहाने मागे सारत अनन्या म्हणाली.

'त्यांनी तुझ्याशी कधी कॉन्टॅक्ट नाही ठेवला?'

अनन्याने नकारार्थी मान हलविली.रात्री एकटेपणाच्या भितीने घरी केलेला फोन आईने निष्ठूरपणे बंद केला होता, तनयाताईच्या डोहाळे जेवणाचे साधे निमंत्रणही देण्याचे सौजन्य आईबाबांनी दाखविले नव्हते त्याची आठवण येऊन अनन्याची तोंड कडू जहर झाले.

'बरं तुला तुझ्या कुटुंबातील कोणाशी बोलायला आवडेल?'

'आजीशी', एका क्षणाचाही विलंब न लावता अनन्या उत्तरली.

'मग आत्ता आजीला फोन लाव आणि स्पिकरवर टाक.'

अनन्याच्या मनात अनेक भावभावनांचा कल्लोळ झाला.थरथरत्या हाताने तिने आजीला फोन लावला.तीन चारदा रिंग वाजली आणि आजी फोनवर आली.'हॅलो' 

'आजी मी अनन्या बोलतेय '

    (क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama