आठवणीतली मंगळागौर
आठवणीतली मंगळागौर
आठवणीतली मंगळागौर
लग्नानंतरचे पहिलेच वर्ष, दिवस अजून नव्या नवलाईचे होते .अजून एकमेकांना चोरटे कटाक्ष, गालातच स्मित, आणि संधी मिळताच निसटते स्पर्श याचे होते.
श्रावणातली दुसरी मंगळागौर सासरी करायचे ठरवले. खरे तर घर छोटेसे चाळीतले होते. पण सासूबाईंना आणि मला सगळ्या गोष्टींची हौस फार आणि त्यांचे मनही मोठे होते. समोरची एक खोली वापरण्यासाठी तात्पुरती मागून घेतली. पूजेची सर्व तयारी केली, मंगळागौरीला लागणारी पत्री, फुले ,चौरंग, पूजनाचे सर्व सामान तयारी केली .वाळू आणून शंकराची पिंड तयार केली. स्वयंपाकाला देखील एक बाई सांगितल्या. किमान पंचवीस माणसांचे जेवण त्यांनी तयार केले, समोरची खोली जेवणाला व नंतर मंगळागौरीचे खेळ खेळायला होईल असा विचार केला व आमच्या खोलीत गौरीपूजनाची तयारी केली.
मंगळागौर पूजनासाठी लागणाऱ्या पाच जणी आधीच आमंत्रित करून ठेवल्या होत्या पण_____?
आणि हा पणच मोठा उभा राहिला त्यादिवशी उजाडल्यापासून पावसाने संततधार लावून धरली .
नुसते धोपटायला सुरुवात केली, त्यातून तो मुं
बईतला पाऊस मग काय विचारता! तास दीड तासात रस्त्यावर पाणी. नाले भरून वाहू लागले. ट्राफिक धीमी झाली आणि लोकल बंद पडल्या.
आता करायचे काय त्यातून स्वयंपाकाच्या मावशींनी सकाळी लवकर येऊन स्वयंपाक तयार करून ठेवला होता .बारा वाजले, एक वाजला , तरी कोणाचाच पत्ता नाही नंतर सासुबाई बोलल्या आता तुम्ही दोघे मिळून मंगळागौरीचे पूजन करा. तिला तुमच्या दोघांच्या हातूनच पूजा पाहिजे असेल,म्हणून कोणी आले नाही.
मग सासूबाईंच्या आज्ञेने आम्ही दोघांनी मिळून मंगळागौर पूजन केले .
मी एक उखाणा पण घेतला,
आई वडील प्रेमळ सासू-सासरे हौशी
रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या पूजना दिवशी
मग सासूबाईंच्या आज्ञेनेच आम्ही दोघांनी एक फुगडी पण खेळली.
नैवेद्य दाखवून आरती केली व घरोघरी चाळीमध्ये प्रसादाचे ताट वाढून दिले, नंतर अशा धो धो पावसात पण उरलेले अन्न एका बेघर वस्तीत नेऊन दिले.
अशी माझी पहिलीवहिली मंगळागौर व तो पहिला श्रावण कायमचा आठवणीत राहिला आहे
सौ ज्योती गोसावी/दुसंगे
कशिश पार्क ठाणे