Jyoti gosavi

Classics

3  

Jyoti gosavi

Classics

आठवणीतली होळी

आठवणीतली होळी

5 mins
257


होळी आणि पुरणाची पोळी यांचे घट्ट नाते आहे. आमच्या घाटावरती तर प्रत्येक सणाला पूरणा वरणाचा स्वयंपाक आणि कटाची आमटी म्हणजे परब्रम्ह .

अगदी आता पण आपण शहरांमध्ये होळी आणि गौरीच्या सणाला पुरणच असते. 

तुम्ही कोणाच्या तोंडून ऐकले आहे का? की होळीला श्रीखंड आणलं, वडीला बासुंदी केली नाही. होळी म्हणजे पुरणपोळी..


होळी रे होळी

 पुरणाची पोळी

 साहेबाच्या -- मध्ये

 बंदुकीची गोळी 

असं ते ब्रीद वाक्य होतं. 


लहानपणी आमच्या गावात संपूर्ण गावाची मिळून एक सार्वजनिक होळी पेटायची, आणि त्यामध्ये लाकडं किंवा वाटेल त्या गोष्टी न टाकता ,गावातील प्रत्येक घरातून पाच पाच गवऱ्या मागून न्यायचे. 

आता नव्या पिढीला गवऱ्या हा शब्द पण माहित नसेल, गवऱ्या म्हणजे शेण्या. गवऱ्यांचा संदर्भ जनाबाईंच्या "विठ्ठल विठ्ठल" बोलणाऱ्या गवऱ्यांमुळे कदाचित लोकांना थोडाफार माहीत असेल. 

भाकरी सारख्या गोल गोल थापून वाळवलेल्या, किंवा घराच्या भिंतीला लावलेल्या शेण्या. 


त्यात पण गवऱ्या आणि शेण्या यामध्ये फरक आहे. गवऱ्या म्हणजे गोवऱ्या म्हणजे गाईचे शेण गोळा करून त्यात व्यवस्थित थोडासा थोडेसे वाळलेले गवत पालापाचोळा घालून, मळून ,गोल गोल आकार थापून भिंतीवर दगडांवर लावलेल्या त्या गोवऱ्या. आणि शेण्या म्हणजे शेतामध्ये आपोआप पडलेले शेण वाळवून आहे तसेच आकारांमध्ये राहते .ते चुलीसाठी पेटवण म्हणून वापरले जाते त्या शेण्या. 

त्या पण गाईच्या शेणा पासून बनवलेल्या असतील तर उत्तमच. आपले प्रत्येक सणवारा मागे काहीतरी कारण मींमासा आणि शास्त्र विज्ञान धरूनच आहेत. 

गाईच्या शेणापासून बनवलेली राख अंगाला लावली तर , उन्हाळा बाधत नाही ,असे म्हणतात. 


शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठीच रंग खेळण्याची देखील पद्धत असावी. 

मग रीतीरीवाजाप्रमाणे गावचा पाटील ,सरपंच, आणि गाव गावातील ब्राह्मण मिळून होळीची पूजा करतात, आणि तिला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जाई, 

नारळ वाहण्याची पद्धत कोकणात आहे. घाटावर एकच नारळ टाकला जातो. प्रत्येक जण आणून होळीमध्ये नारळ टाकत नाही .पुरणाचा नैवेद्य मात्र प्रत्येक जण टाकतात. आमच्या लहानपणी एक पैसा होळीमध्ये आम्ही टाकायचो. त्यानंतर अक्षरशः तोंडावर हात घेऊन  ठो हो बोंबलणे ही पद्धत आहे. 

ते मात्र फक्त पुरुषांनीच करायचं बरं! महिला किंवा मुली नाही. पण मी मात्र लहानपणापासून बंडखोरच! मी आपल्या वर्ग मित्रांच्या टोळक्यामध्ये सामील होऊन, सोबत एखादी मैत्रीण घेऊन, 

 ठो! ठो! बोंब मारत गल्लीमध्ये धावत असायची. त्यावरून ओरडा देखील खायची. 

पोरगी असून बोंब मारते म्हणजे काय? तू काही बोंबलायचं नाही. का बर ही पद्धत केली असावी? 

स्त्री जातीला आयुष्यभरच काही ना काही कारणाने बोंबाच माराव्या लागत होत्या, त्याकाळात. म्हणून अजून वेगळं काही बोंबलायला नको! असं तर नसेल? 

दुसऱ्या दिवशीची धुळवड देखील घाटावर वेगळीच असते. अक्षरशः पुरुष मंडळी दारू पिऊन चिखल मातीमध्ये लोळतात आणि लोळवितात . काही जुनी खुन्नस असेल ती एकमेकाला शिव्या देऊन आपली भडास बाहेर काढतात. 

होळीच्या पाचव्या दिवशी जेव्हा रंगपंचमी असते. तेव्हा मात्र खराखुरा रंग खेळला जातो. त्यात पण पुरुष मंडळी आणि बच्चे कंपनी, बायका मात्र किचनमध्ये.

दुसऱ्या दिवशी मटणाचे जेवण असते, म्हणून त्या आपल्या रांधा वाढा उष्टीकाढा" मध्येच असायच्या. 


पुढे नोकरीच्या निमित्ताने कोकणात गेले आणि तिथे वेगळीच होळी पाहिली . कोकणात सुद्धा चिपळूण मधले रीती रिवाज बोलीभाषा थोडीशी वेगळी, रत्नागिरी कडची थोडी वेगळी आणि मालवण मध्ये थोडी वेगळी, असे आहे कोकणात होळी हा खूप मोठा सण असतो. 

मी तिथे होते तेव्हा तरी तो दहा दिवस चालत असे, पहिल्या दिवशी छोटी होळी, आणि असे करत करत हळूहळू वाढवत- वाढवत दहाव्या दिवशी चांगली दोन पुरुष उंचीची होळी. 

त्या दहा दिवसांमध्ये देव भेटीला येतात देवांची पालखी निघते आणि कोणाकोणाच्या ओसरीला पडवीला अंगणात एक दोन तास थांबून कोणा कोणाच्या घरी मुक्कामी देखील असते तो एक मला खूप सुंदर प्रकार वाटला. तुम्ही देवळात न जाता चक्क देव तुमच्या भेटीला येतो. 

ज्याच्या घरी पालखी मुक्कामी असेल, तिथे तर मोठा भंडारा असतो. अनेक लोक दर्शनाला आणि जेवायला येतात, मुंबईवरून चाकरमानी येतात, आजूबाजूच्या गावातली माणसे, नातेवाईक देखील येतात .


अजून म्हणजे शिमग्याची सोंग निघतात त्यावरूनच "रात्र थोडी पण सोंग फार" नावाची म्हण पडली असावी. 

वेगवेगळ्या देवतांचे रूप घेऊन, जसे की शंकर, कृष्ण ,राम, हनुमान, इत्यादी रूप घेऊन देव तुमच्या दारात येतात. त्यांना पैसा 2 पैसे हातामध्ये ठेवायचे. अजून एक" नकटा" नावाचा प्रकार आहे. म्हणजे दोन पुरुष मिळून जोडपे साकारतात. एक पुरुष पात्र आणि एक स्त्री पात्र करतात, त्याला नकटा हा शब्द वापरला आहे .

एकदा आमची शेजारीण नकटा आला! नकटा आला !असे म्हटल्यावर मी आपली इकडे तिकडे एखादा कोणी नकटा मनुष्य येतो आहे का म्हणून बघत होते. 

शिवाय मनात म्हटले" काय बाई तरी इथली माणसं! सरळ तोंडावर नकटा आला नकटा आला म्हणतात. त्यानंतर मी शेजारणीला विचारलं कुठे आहे नकटा? आणि मग ती मला हसायला लागली, आणि खुलासा सांगितला. आणि नकटा या शब्दाचा नवा अर्थ मला समजला. 

तिकडे पण धुळवडीच्या दिवशी रंग खेळतात. पहिल्यांदा काहीतरी वाजत गाजत आले, म्हणून मी बघायला बाहेर आले, तर चक्क एका बैलगाडी मध्ये दोन रंगाचे मोठे बॅलर भरून रंग आणि पिकावर फवारणी करणारी पिचकारी अशी वरात दिसली. 

 दिसेल त्याच्या अंगावर रंग फवारत चालली होती. माझ्या लक्षात येईपर्यंत, डोक्यापासून पायापर्यंत गुलाबी रंगाने रंगून गेले. अशी ही कोकणातली आठवणीतली होळी. 


त्यानंतर नोकरीच्या निमित्ताने काही काळ "मोखाडा "येथे आदिवासी भागात होते. तिथली प्रथा अजूनच वेगळी. 

तिकडे "भोवाडा "नावाचा प्रकार असतो. तो होळीच्या दरम्यान चार-पाच दिवस आधी चालतो. 

भोवाडा म्हणजेच भोगाडा, त्यामध्ये एक बाजार भरवला जातो. 

त्यात होळीला लागणारे सर्व सामान असते. एक प्रकारची जत्राच भरते. आदिवासी आपले पारंपारिक कपडे घालून, ढोल वाजवत नृत्य करतात. आणि या काळातच मुला-मुलींची एकमेकांशी पसंती होते, आणि पुढे लग्न होते .


त्यानंतर लग्न होऊन मुंबईत आले आणि मग मुंबईच्या वातावरणात सामावून गेले. किंवा माझ्या नसा नसात मुंबई . सामावली. आता रंगपंचमी विसरून धुळवडच लक्षात राहिली आहे. 

हो !आणि या तीस वर्षाच्या कालावधीमध्ये एक खूप खूप मोठे स्थित्यंतर घडवून आणले, 

"जो आमचा नौरोजी अंगावर रंग उडवून घेत नव्हता" वरून चाळीमध्ये मुद्दाम चांगले कपडे घालून रुबाबात फिरायचा, का तर कोणाची हिंमत नव्हती अंगावर रंग टाकायची .

 शेवटी नवीन लग्न झाल्यावर चाळीतल्या सगळ्या पोरींना, दीपक दादा वर खुन्नस काढायचा होता. त्यांनी वहिनीला म्हणजेच मला फितवले. आणि वहिनी! आधी तू रंग टाक ,मग बघ आम्ही काय करतो , फार भिजवूनच काढतो बघ! 

जसं काय तू आधी वार कर, मग आम्ही बघतो .अशी मजा! 

मी पण म्हटलं जाऊ दे, "ओरडेल तर ओरडेल" अजून काय दुसरे करणार? आणि पाठीमागून जाऊन अंगावर रंग टाकला. आणि मग सगळ्यांनी डोक्यापासून पायापर्यंत माझ्या नवऱ्याला भिजवूनच काढलं. आणि तो मला असं बघत होता की जसं काय म्हणत होता "ब्रूटस यु टू" पण आता मात्र हाच नवरोजी ,आमच्या कशिश पार्कला मोठ्या प्रमाणावर साजऱ्या होणाऱ्या होळीमध्ये रंगपंचमीमध्ये सामील होतो, रंग खेळतो, आणि माझ्याबरोबर नाच देखील करतो. 

म्हणजे एक दिवस तरी रंगारंग कार्यक्रम चांगला होतो .अशा हा आठवणीतल्या अनेक होळी आहेत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics