आठवणींची पाठवणी
आठवणींची पाठवणी
आज दोन वर्षानंतर सुशांत आपल्या महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाला होता. ज्या कॉलेजात एक विद्यार्थी म्हणून आपण शिकलो त्याच कॉलेजात सुशांत सहाय्यक प्राध्यापक म्हणून शिकवणार होता. जे शिक्षक लोक सुशांतला, "सुशांत, जरा इकडे ये" अशा एकेरी नावाने हाक मारत,तेच शिक्षक आजपासून सुशांतचे सहकारी मित्र झाले होते. पाच वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदाच या कॉलेजात प्रवेश घेतला होता, तो दिवस सुशांतला अगदी तशाच तसा दिसत होता. ज्या वर्गखोलीत त्याचा 'जीव गुंतला होता' त्या खोलीत प्रवेश करताच भूतकाळाच्या अंधकारात सुशांत हरवला गेला .
कॉलेजचा तो पहिला दिवस होता. कॉलेज मध्ये येणारे आंबटगोड अनुभव सुशांत फक्त ऐकून होता, आता नुकताच अकरावीत प्रवेश घेतल्यामुळे त्या सर्व आंबट-गोड अनुभवांचा सुशांतला अनुभवच अनुभवायचा होता. सर्व महाविद्यालय सुशांतला पूर्णपणे नवखे होतं एक-दोन जवळचे मित्र सोडले, तर कुणासोबत पण सुशांतची फारशी ओळख नव्हती. मुलांनी वेगवेगळ्या फॅशनचे कपडे घातले होते. त्या सर्वांमध्ये सुशांत अगदी वेगळा वाटायचा. कारण याचं राहणीमान अगदी खेड्यातलं होतं. पांढरा शर्ट, साधी पॅन्ट, खिशाला दोन पेन,देहयष्टीला साजेशी अशी केशरचना यामुळे सहाजिकच खेड्यातला असल्याचं कुणालाही सहज ओळखू यायचं.
पहिल्या दिवशी अशीच कॉलेजची तोंड ओळख करून घेऊन सुशांत सायंकाळी एसटी बस स्टँड वर आला. त्याच्याच वर्गातील काही मुली पण बस स्टैंड वर बसने जाण्यासाठी थांबल्या होत्या. शाळेमधील मुली कशा मनमोकळेपणाने भेटल्या ते बोलायच्या तशा कॉलेजच्या मुली बोलत नाहीत, हा फरक सुशांतला जाणवला.
"पण, जाऊ द्या आपणांस काय करायचं,त्यांच्या बोलण्यावाचून आपलं काही अडणार थोडंच आहे" असा विचार करून सुशांत तिकडे दुर्लक्ष करायचा.
थोड्याच वेळात सुशांतची एसटी बस आली .
गाडीला तुफान गर्दी होती. पाहता पाहता बस सुरू होऊन मार्गस्थ झाली. सुशांत खिडकीपाशी बसून आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत होता. तेवढ्यात त्याच्याच वर्गातील एक मुलगी जागा नसल्यामुळे एसटीत उभी असल्याचे सुशांतला दिसली. सुशांतला वाटले 'हीला जर आपण आपल्या जागेवर बसण्यास सांगितले व ती बसली नाही तर उगीच आपली पंचायत होऊन अपमान होईल'. पण त्या गर्दीत या मुलीची जागा नसल्याने होणारी परेशानी सुशांतला पाहावत नव्हती, म्हणून तो स्वतः उठून त्या मुलीला म्हणाला," एक्सक्युज मी, तुम्ही माझ्या जागेवर बसा, मी उभा राहिल."
त्या मुलीने इकडे तिकडे पाहून सुशांतला थँक्स म्हणत नाजूक स्मित केले व सुशांतच्या जागेवर बसली .
काही काळ प्रवास केल्यानंतर सुशांतचा स्टॉप आला. कंडक्टरने बेल देऊन गाडी थांबवली. तसा सुशांत एसटीतून उतरला. पाठोपाठ ती मुलगी पण उतरली.
डबलबेल देताच एसटी वेगाने निघून गेली.
सुशांतचे गाव फाट्यापासून जवळपास पाच किलोमीटर आत होते. दिवसभर माणसांची येजा असल्यामुळे फाटा ते गाव अशी ऑटोची येजा चालू असे, पण सायंकाळी पाचच्या पुढे प्रवासी मिळत नसल्यामुळे ऑटोवाले आपला ऑटो घेऊन लवकरच गावाकडे परतत असत.
आता संध्याकाळचे पाच वाजत वाजत आले होते. आकाशात ढगांची गडबड चालू होती. फाट्यावर सुशांत व 'तिच्या' शिवाय कोणीच नव्हते.
"तुम्ही गावात नवीन आहात वाटतं "?
सुशांतने हलके स्मित करत तिला बोलतं करण्याचा प्रयत्न केला।
" होय, मी मीनाक्षी, रामराव पाटील यांची भाची, तिकडे आमच्या गावी दहावीच्या पुढील शिक्षणाची सोय नाही ना, त्यामुळे मामाच्या गावी शिकायला आले."
मीनाक्षीने ओढनी ठीक करत हसत मुखाने सांगुंन टाकलं.
"मी सुशांत, या गावात राहतो". सुशांत म्हणाला.
तेवढ्यात राजेश म्हणजे मीनाक्षीच्या मामाच्या मुलाची मोटरसायकल आली.
"अरे, सुशांत धन्यवाद यार! कदाचित तू नसता तर मीनाक्षीला भीती वाटली असती".
राजेश गाडी उभी करत म्हणाला.
" अरे राजेश, धन्यवाद कसला ?मीनाक्षी व मी आता क्लासमेट आहोत". सुशांत राजेश च्या खांद्यावर थाप मारत म्हणाला.
"अच्छा ,म्हणजे तुमची ओळख झाली तर !बर ठीक आहे भेटू उद्या"
मीनाक्षी गाडीवर बसल्यानंतर गाडी सुरू करत राजेश म्हणाला.
गाडीवर बसलेल्या मीनाक्षीने हळूच हात वर करून 'बाय' केला.
सुशांतने पण हात वर करत 'बाय' केला.
दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाण्यासाठी सुशांत फाट्यावर येऊन थांबला होता. एसटी आल्यावर कॉलेजात पोहोचला.
काही वेळाने मीनाक्षी पण दुसऱ्या बसने कॉलेजला पोहोचली. सुशांत व मीनाक्षी ची संगत व लगत वाढतच जाऊ लागली.
सायंकाळी एसटी बसने सोबतजाणे,फाट्यावर पाच दहा मिनिटे गप्पा मारत थांबणे, तसेच सकाळी पण सोबत जाणे येणे, अशा अनेक प्रकारांच्या माध्यमातून त्यांचा प्रेमांकुर अंकुरित होऊ लागला.
कॉलेजमध्ये मीनाक्षी आली नाही की शिक्षकासह सर्व विद्यार्थी सुशांतला विचारात व सुशांत आला नाही की मीनाक्षीला.
कॉलेजमध्ये आल्याबरोबर एकमेकांना स्मित केल्याशिवाय सुशांत व मीनाक्षीच्या दिवसाची सुरुवातच होत नसे. दोघांना पण आता एकमेकांशिवाय जगणे असह्य होऊ लागले. परंतु त्यांचे एकमेकांवर असलेले प्रेम दोघांपैकी कुणीच व्यक्त करत नव्हते.
मीनाक्षीला वाटायचे सुशांतने बोलावं, सुशांतला वाटायचे मीनाक्षीने बोलावं.
एके दिवशी सुशांत एकटाच वर्गात बसला असता मीनाक्षी आली. काहीशी उदासच होती. आज तिला सुशांतला 'आय लव यू' म्हणायचं होतं सुशांतच्या मनात पण प्रेमाचा लावारस उफाळून येत होता.
मीनाक्षी समोरच्या बेंचवर बसली होती.
" मीनाक्षी कशी आहेस" सुशांत उसने स्मित करत म्हणाला. "ठीक आहे मी, तू कसा आहेस"? मीनाक्षीने खाली मान घालूनच उत्तर दिले.
ते एकमेकांच्या आंधळ्या प्रेमात एवढे डुंबून गेले होते की त्यांची नजरेला नजर सुद्धा भिडत नव्हती.
'मीनाक्षी, तुझ्याशिवाय मला दुसरे काहीच सुचत नाही' हे वाक्य बोलण्यासाठी सुशांतची जीभ वळवळत होती पण मन धाडस करत नव्हतं.
" मीनाक्षी ,असं कोणतं नातं आपल्यात आहे ,ज्यामुळे आपण एकमेकाकडे आकर्षित होत आहोत, तेच मला कळत नाही," सुशांत म्हणाला .
"सुशांत एनीटाईम माझ्या मनात पण तुझाच विचार असतो, कदाचित यालाच प्रेम............" आलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत मीनाक्षी म्हणाली.
" होय मीनाक्षी, यालाच प्रेम म्हणत असावेत". सुशांतने मीनाक्षीचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला.
मीनाक्षी आता सुशांतच्या मिठीत होती, तिला सर्व जगाचा विसर पडला होता. सुशांतच्या प्रेमात मीनाक्षी आता आकंठ बुडाली होती.
सुशांत पण मीनाक्षीच्या प्रेमात बेधुंद झाला होता. जीवनातलं त्यांचं हे पहिलं प्रेम होतं, ज्यात स्वार्थाचा लवलेश पण नव्हता . केवळ आणि केवळ निखळ प्रेम मीनाक्षी व सुशांत मध्ये होतं .
कधी त्यांच्या प्रेमाला वासेनेचा तर स्पर्श देखील झाला नव्हता.
एकमेकांच्या मिठीत स्थिरावलेला मीनाक्षी व सुशांत देह पाहून त्यांच्या गावातल्या काही अगाऊ मुलांनी ही गोष्ट मीनाक्षीच्या मामा पर्यंत पोहोचवली. त्या दिवसापासून मीनाक्षीच्या मामाने तिला कायमची तिच्या आई-वडिलांकडे नेऊन घातले होते.
तसेच सुशांतला देखील जीवन्त रहायचे असेल तर मीनाक्षी ला विसरून जाण्याची जणु ताकीदच दिली होती.
परंतु मीनाक्षीचं प्रेम तर सुशांतच्या नसानसात भरलं होतं. तिला विसरून सुशांत जगुच शकत नव्हता.
पण त्याला आता मीनाक्षी ला विसरावच लागणार होतं. शेवटी सुशांतने शहराचा रस्ता धरला.
पाच वर्षे बाहेर राहून मीनाक्षीच्या आठवणीला उरात बाळगत उच्चशिक्षण पूर्ण केले. व नंतर तो शिकलेल्या महाविद्यालयात आज प्राध्यापक म्हणून रुजू झाला होता.
" सर, प्राचार्य साहेबांनी तुम्हाला ऑफिसमध्ये बोलावलं," सेवकाचा आवाज ऐकताच सुशांत भूतकाळातून बाहेर आला.
त्याच्या मनात मीनाक्षीच्या प्रेमाच्या पाऊलखुणा जशास तशा होत्या.
ज्या ठिकाणी त्यांच्या प्रेमाचा उदय झाला त्याच ठिकाणी त्याच्या प्रेमाचा अस्त झाला होता.
त्याच ठिकाणी आता सुशांतला मीनाक्षीच्या आठवणींची पाठवणी करत नव्या जीवनाची सुरुवात करायची होती.
