साद
साद
दिवस मावळत आला होता. शेतात दिवसभर राबून माणसं गावाकडे परतत होती. आखाड्यावर राधी व दिप्या आपल्या मायबापाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते.
सकाळपासून अरुणा व तुकाराम रव्याला शोधत होते. तरीपण रव्या सापडला नव्हता. राधी व दिप्या आखाड्यावर रात्रीच्या टायमाला भितात, म्हणून अरुणाबायी दिवेलागणीच्या टायमाला परतली.
त्यावेळी राधी व दिप्या चुलीसमोर भाताला शिजवत बसले होते. मायची चाहूल लागताच राधी धावत अंगणात आली.
"माय गावला का वं दादा?" राधी मोठ्या उत्सुकतेने म्हणाली.
"नाही गं बाई, कुठं गेले पोरगं देव जाणे?" जवळच असलेल्या खाटेवर बसत अरूणाबाई म्हणाल्या.
आपली माय थकून आली म्हणून दिप्यानं माठातलं पाणी आणलं.
"तुम्ही काही खाल्लं का नाही रं, पोरांनू..." अरूणाबाई दिप्याला जवळ घेत म्हणाल्या.
"रातची दीड भाकर खालती. सकाळी धा वाजता. मया अरधी न दिप्यानं यक." चुलीचा जाळ पुढे सरकवत राधी म्हणाली.
आपल्या लेकरांनी रात्रीच्या शिळ्या भाकरीवर दिस काढला, म्हणून अरूणाबाईच्या पापण्या ओलावल्या.
"माय, तू दादाच्या चींतेनं रडतेस न वं?" आईच्या डोळ्यातील अश्रूकडे पाहात दिप्या म्हणाला.
"नाही रे माझ्या राजा, दादा तर येईल की आता तुझ्या बा संग!" उसने अवसान घेऊन हसत अरूणाबाई त्याची समजूत काढत होत्या.
काल दुपारी मालक व त्याचे काही मित्र शेतात आले होते मालक मोठ्या विनोदी स्वभावाचा. कुणाची पण निंदा करण्याची त्याला सवय. रव्या हा तुकारामचा मोठा मुलगा. तसा तो शीघ्रकोपी. मालकाने केलेली मजाक रव्याला सहन नाही झाली, म्हणून तो मालकाला आडवातिडवा बोलला होता म्हणून तुकाराम रागावल्यामुळे रव्या कालपासून रुसून कुठेतरी गेला होता. त्यालाच सकाळपासून अरूणाबाई व तुकाराम शोधत होते.
राधी व दिप्याला भात व वांग्याचं भरीत खाऊ घालून अरूणाबाई नवर्याची वाट पाहत होत्या.
"माय, बा कवा येईल वं..." दिप्यानं विचारलं.
"हे बघा पोरांनो, येईल आता. दादा दमादमा चालतो ना, म्हणून उशीर लागला लागला असेल?" कुशीत बिलगून झोपलेल्या दिप्याची अरूणाबाई समजूत काढत होत्या.
"पण दादा गावला असंल न वं" राधेने शंकेच्या सुरात म्हटलं.
"कुणास ठाऊक बाई सकाळपासून बिना अन्नपाण्याचा तूहा बाप फिरायलाय. रव्याला कळू नये का..." अरूणाबाई विचार करत होत्या.
आता रात्रीचे दहा वाजत होते. राधी, दिप्या आणि अरूणाबाई आता तुकारामची वाट पाहत होते. विहिरीजवळ येताच तुकारामने मोटर लावली. सकाळपासून लांब दोर बांधलेले बैल तुकाराम येताच उठले, तसा त्यांच्या गळ्यातील घुंगरमाळांचा आवाज ऐकून दिप्या व राधी आनंदाने खाटेवर उठून बसले.
"माय बा आला वाटतंय." दिप्या म्हणाला.
"वय रं दिप्या बा आला, पर दादाचा आवाज येईना बघ." राधी म्हणाली.
"अरे रुसून गेला म्हणून तुमच्या बानं त्याला चांगलं झापलं असंल, मग काय बोलणार रव्या. चालत असंल मागं मागं तुह्या बाच्या." अरूणाबाई धीर देत म्हणाल्या. तुकारामनं बैलांना बांधले व त्यांना चारा टाकून हाैदावर हात पाय धुण्यास गेला. दिप्या व राधी खाटेवरच पालथी मांडी घालून बापाकडे आतुरतेने पाहत होते. अरुणाची नजर पण रव्याला शोधत होती. आपली चाहूल लागावी, आपणच आलो आहोत हे दाखवण्यासाठी, तुकाराम उगाच खोटा खोटा खाकरला.
"बा, दादा नाही आला?" राधीनं विचारलं.
राधीला काय उत्तर द्यावं, हेच तुकारामांना कळेना.
“बा, सांग ना दादा कुठंय..." दिप्या बापाच्या हाताला हलवत म्हणाला.
"गेला मसणात!" तुकारामच्या रागाचा जणू बांधच फुटला होता. डोक्याला गुंडाळलेला रुमाल काढत तो दिप्यावर खेकसला. बापाचा अवतार पाहून दिप्या व राधी काहीच न बोलता एका खाटेवर झोपी गेले.
"आत्ता? असं काय म्हणता, आणि या लेकरावर का म्हणून ओरडायचे? विचारलं म्हंजे काय गुन्हा केला व्हय?" अरूणाबाई तावातावानं म्हणत होत्या.
"अगं सकाळपासून सगळा शिवार तुडवला, पण कोठंच दिसलं नाही ते बलूतं रव्या..." तुकाराम जवळच पडलेला गोणपाट घेऊन उशाला बूट घेत अंग टाकत म्हणाला.
"अहो, तुमच्या अशा बोलण्यानंच पोरगं रुसून गेलंय. थोडं माणसावानी बोलत जा कि, जवा पाहिलं तव्हा नुसते धावून बोलता.”
अरूणाबाई तुकारामला सांगत होत्या.
"तुपला लाड हाय ह्यो सगळा, म्हणूनच ते कार्ट असं नाटक करायलंय..." तुकाराम असं बोलत होता की, जणू अरुणबाईच्या बोलण्यानेच रव्या रुसून गेला होता.
"आत्ता! आवं तुम्हीच त्यावर रागावले की?" अरुणाबाई तुकारामला म्हणत होत्या.
"बरं काही गीळायला दे, पहाटपासून उपाशी हाय मी. ते दलिंदर बसलं असंल कोठं लपून बापाची मजा पाहत.” तुकाराम उठून बसत म्हणाला.
भाताचं पातेलं अाणत अरूणाबाई म्हणू लागल्या, "आवं, आपण लेकरासाठी राणवा धरला, ते तर आपली कमाई हाय. पहा ते दिप्या कसं रडत रडत झोपी गेलंय. तुमच्या खेकसल्यानं." आपल्या बोलण्यानं दिप्याला रडू आलं, हे तुकारामला माहित होतं. त्यामुळे तुकारामचं मन दुखावलं होतं. पण दिवसभर पाहून रव्या न सापडल्यामुळे तुकारामला खूपच टेन्शन आलं होतं. म्हणून आपण काय बोलतो याचं त्याला भान राहिलं नव्हतं.
"अगं, मालकाला सवयच हाय कोणाची पण मजाक करायची, पण रव्याला ती सहन होऊ नये का? कशाला बोलावं मालकाला उलटंसुलटं?" कोरडा भात खात खात तुकाराम म्हणाला.
"त्या मालकाला माहित आहे की, रव्याला राग सहन होत नाही, कशाला करावं मालकानं मजाक? अन् त्यात तुमचं असं राकेसावाणी खेकसणं! कुठं असंल लेकरू देव जाणे?" अरूणाबाई पसारा आवरत म्हणाल्या.
'कुठे असंल लेकरू देव जाणे' हे अरूणाबाईचे शब्द ऐकताच तुकारामचा घास जागीच थांबला. त्याने हात धुतला. आता दोघे पण बाहेर अंगणात विचार करत बसले होते.
"कुठं गेलं असंल पोरगं?" तुकारामनं चिंतीत होऊन अरुणाबाईला विचारलं.
"असंल, जाऊद्या लपलं असंल कुठं येईल उद्याच्याला. कुठं जाणार हाय!" अरूणाबाई देत म्हणाल्या.
परंतु अरुणाबाईच्या मनात देखील विचारांचे वादळ उठले होते. ती आता रव्याचा चेहरा पाहण्यासाठी आतुर झाली होती.
खरंच रव्या असंल ना जिवंत?, का रागाच्या भरात काही कमी-जास्त केलं असेल जीवाचं?, नाही त्यो असा नाही करणार येईल उद्याच्याला. पण यायचं असतं तर आजच आला असता. अशा अनेक विचारांनी अरुणाबाईचे मन रव्याला साद घालत होते.
जमिनीवर गोणपाटाच्या तुकड्यावर गोधडी टाकून बिडी फुंकत तुकाराम पण अनेक विचारांना वाट मोकळी करून देत होता.
आपण उगाच बोललो रव्याला. स्वतःच्या बोलण्याचा तुकारामला पश्चाताप होऊ लागला.
काही झालं तरी आता कोणत्याच लेकराला टाकून बोलायचं नाही.
पण... पण टाकून नाही बोललं रागावून नाही बोललं तर लेकरं उलटसुलट बोलायला शिकतील. खरंच रव्या कुठे असंल? 24 तास झाले काय खाल्लं असंल? रात्रीला कुठं झोपला असंल?
येरवी लघवीला उठायचा तरीसुद्धा भितीमुळे मला उठवायचा, मग रात्री एकटा झोपला तरी कसा असंल? का कुणास ठाऊक रागाच्या भरात विहिरीत उडी तर नसेल मारली? हा विचार तुकारामला स्वस्थ बसू देत नव्हता.
तो उठला तशा अरूणाबाई म्हणाल्या, "काय झालं कामून उठले? रव्या आला की काय?"
"नाही लाईन गेलती, मोटर लावून येतो,” तुकाराम म्हणाला. खरंतर तुकारामला रव्या पाहून यायचा होता विहिरीकडून.
"अवं लाईन गेलीच कुठं, मी जागीच आहे की!" अरुणाबाई उठुन बसत म्हणाल्या.
"तू झोपली नाहीस?" तुकाराम काहीसा अडखळत बोलला.
"रव्याच्या काळजीनं झोपच आली नाही, जरासा डोळा लागला की 'माय मी आलो बघ' असा आवाज घुमतोय. कसा असंल, कुठं असंल कुणास ठावुक?" अरूणाबाई म्हणाल्या.
"बस, जाऊन येतो विहिरीकडून." तुकाराम बुट घालत, हातात काठी घेत म्हणाला.
"थांबा, मी पण येते." अरूणाबाई चपला पायात सरकवत म्हणाल्या. आता दोघांना पण 'रव्याने विहिरीत उडी मारली' असा समज झाला, पण एकमेकांना ठाऊक नव्हते. दोघेपण विहिरीजवळ आले "मोटर चालू हाय की!" अरूणाबाई म्हणाल्या. "व्हय" विहिरीत बॅटरी दाबत तुकाराम म्हणाला. रव्या..... कुठं हायीस रं येना माझ्या राजा.. आता सहन नाही होत नाही रं....." अरूणाबाई पदरात तोंड खुपसून रडत म्हणाल्या.
"अगं, रडू नको येईल उद्याच्याला रव्या. काय येडा आहे की काय त्यो, त्याला माहित नाही काय त्याच्यासाठी मायबाप आखाड्यावर राबायलेत म्हणून. चल." अरुणाबाईला शांत करत तुकाराम व अरूणाबाई आखाड्यावर आले.
आता तुकारामचे पण डोळे भरून आले होते. पण आपण रडलो तर अरूणा खूपच धीर सोडील म्हणून तुकारामने रूमालाने डोळे पुसत गोणपाटावर अंग टाकले.
रात्रीचे तीन वाजले होते. तुकाराम बीडीचे झुरके मारत होता. नीरव शांतता पसरली होती. कुठंतरी दूरवर कुत्रे भुंकत होते. कॅनाॅलवर चालू असणाऱ्या मोटरींनी सुर धरला होता. कुठंतरी किरकिरी आवाज करत होती.
राधी व दिप्या गाढ झोपले होते. आणि आखाड्याच्या जवळच असलेल्या हळदीत रव्या लपला होता. हळदीला पाणी सोडल्यामुळे रव्याच्या अंगाखाली पाणी आले होते. म्हणून तो उठून बसला.
आखाड्यावर एका खाटेवर दिप्या व राधी झोपले होते. तर दुसऱ्या खाटेवर अरूणाबाई कूस बदलत होत्या. खाली गोणपाटावर तुकाराम बीडीचे झुरक्यावर झुरके मारत होता.
'आपण आता जर बापाकडं गेलो तर बाप आपल्याला झोडपणार' हे निश्चित होते, म्हणून रव्या दुसऱ्या सरीत सरकला होता.
अंधार असल्यामुळे किती वाजले हेही त्याला कळत नव्हते. म्हणून तो सरीतच बसून विचार करू लागला. काल मालकाला उलट सुलट बोलल्यामुळे बाप रागावला होता, म्हणून हळदीत रव्या लपून बसला होता.
इकडे दिवसभर रव्याच्या मायबापांनी सारा शिवार पायाखाली घातला होता. सकाळपासून मायबाप "रव्या......." अशा हाकावर हाका मारत होते. त्यांनी दिवसभर जवळपासचे सर्व आखाडे व झाडेझुडपे फिरुन काढले होते.
रात्री माय बापाची चाललेली तंटा रव्याने पाहिली होती. रात्री दिप्या व राधीचे मलुल झालेले चेहरे आता रव्याला खरंच पाहवत नव्हते.
रात्री माय बापाने विहिरीकडे जाऊन घातलेली सादसुद्धा रव्याने ऐकली होती. म्हणून रव्याला आता आईकडे जाऊन 'माय, बघ मी आलोय' असे म्हणण्याची घाई झाली होती. आणि म्हणूनच की काय, अरूणाबाई अचानक उठल्या व तुकारामला म्हणाल्या," रव्याचा आवाज ऐकला का वं तुम्ही?" हे ऐकून तुकाराम म्हणाला, "नाही तुला भास झाला असंल.”
"नाही हो, मह्या रव्यानं मला साद घातली. 'माय मी आलो' असं मी माझ्या कानांनी ऐकलं.." अरूणाबाई व्याकूळ होऊन म्हणत होत्या.
"हे बघ, आज पुन्हा एकदा पाहून येतो येईल त्यो. आपल्या हृदयाची साद नक्कीच त्याच्या हृदयापर्यंत जायील..." तुकाराम घडी पाहत म्हणाला.
हे सर्व रव्या ऐकत व पाहात होता. पण बापापुढे जाण्याची रव्याची हिम्मत नाही झाली. घडीत सकाळचे पाच वाजले होते.
"बरं, उठ वुलसाक चहा करून दे, येतो जाऊन." तुकाराम म्हणाला. अरूणाबाईने करून दिलेला चहा घेऊन तुकाराम निघाला. दिवस निघू लागला. बाहेर अंगणात झोपलेले दिप्या व राधी डोळे चोळत उठून बसले. “माय आला का वं दादा?" राधीनं विचारलं. "येईल बाई आज, तूहा बा गेलाय आणायला." अरूणाबाई म्हणाल्या.
"तू काल पण अशीच म्हणली होती 'आज येईन म्हणून..’” दिप्या रडत म्हणाला.
आता लेकरांना काय उत्तर द्यावे, हेच अरूणाबाईला कळत नव्हते.
आता अरुणाबाईच्या अश्रूंचा बांध खरंच फुटला होता. आपला भाऊ-बहीण माय-बाप आपल्यासाठी किती व्याकूळ झाले आहेत हे आता रव्याला ही पाहणे अशक्य झाले होते.
"रव्या..... बघ रं राजा कशी वाट पाहियालो तुही आम्ही. कालपासून तुहा बाप पहाय कसा येड्यावानी तुला पाहत फिरायलाय. तुहे बहीण-भाऊ पाहाय कसे तुही वाट पाहियालेत......." अरूणाबाईचा हा हुंदका रव्याचे काळीज चिरत होता. त्याच्या हृदयापर्यंत ती मायेची साद खरोखरच पोहोचली होती, म्हणून हळदीच्या सरीतून हळूच येऊन रव्या म्हणाला, "माय बघ मी आलो..." अरूणाबाईला वाटले आपणास भास झाला, म्हणून तिने दुर्लक्ष केले.
"माय दादा खरंच आलाय आता नको रडू." असा राधीचा आवाज ऐकताच अरूणाबाई भानावर आल्या. रव्या अरूणाबाई समोर रडवेल्या चेहऱ्याने उभा होता. अरुणाबाई रव्याला जवळ घेऊन खूप रडल्या.
बारा वर्षाच्या रव्याच्या पण आता भावना दाटून आल्या होत्या. राधी व दिप्याला गळ्याशी लावून रव्या जणू त्यांना कधीच रुसुन न जाण्याचे वचन देत होता.
दिवसभर रव्याला पाहून पाहून संध्याकाळी जेव्हा तुकाराम थकून घरी आला तेव्हा मात्र रव्याला पाहून तुकारामच्या थकलेल्या चेहऱ्यावरून वोघळलेले अश्रू पाहून अश्रूंना वाट कधी मोकळी करून दिली हे रव्याला कळलेच नाही.
रव्या व तुकाराम एकमेकाकडे पाहत आणि पाहतच राहीले.
