वाटणी
वाटणी
दुपारची वेळ. उन्हाळ्याचे दिवस. पाच महिन्याचे रोहिणीचे बाळ जिवाच्या आकांताने रडत होते. रोहिणी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु बाळ शांत होत नव्हते. जन्मल्यापासून इतके जोरात व जिवाच्या आकांताने बाळ कधीच रडले नव्हते. बाजूच्या खोलीत झोपलेल्या नंदाबाई च्या जीवाची घालमेल होत होती. मनात असून सुद्धा त्या बाळाकडे जाऊ शकत नव्हत्या. कालच वाटणीच्या वेळी बाळाला हात सुद्धा लावायचा नाही अशी सक्त ताकीद रोहिणीने नंदाबाईला दिली होती.
किसन व नंदाबाई हे एक अडाणी जोडपे. एकच मुलगा व एकच मुलगी असे त्यांचे छोटे कुटुंब सुखी कुटुंब. आपण जरी अडाणी असलो तरी, आपल्या मुलांनी खूप शिकावे अशी कीसन व नंदाबाई ची इच्छा होती. म्हणून कीसनने गावातील एका जमीनदाराकडे सालगडी म्हणून राहणे पसंत केले. मुलगा सुभाष व मुलगी सुनीता हे दोघेही अभ्यासात हुशार.
दिवसामागून दिवस जात होते. पाहता-पाहता सुभाष व सुनीता यांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. तसेच दोघेपण चांगल्या मार्कांनी पास झाले होते. किसन व नंदाबाई दोघांना पण खूप आनंद झाला. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी मुलगा व मुलगी यांच्या पुढील शिक्षणासाठी शहरात राहणे पसंत केले. म्हणून किसन चा संसार आता शहरात थाटणार होता. पिकअप टेम्पोमध्ये सामान भरताना किसनला वाटू लागले, "आपण आता गावाला मुकणार, कदाचित सुभाषला नोकरी लागल्यावर तो शहरातच स्थायिक होईल." हे ऐकून नंदाबाई त्यांना समजावत म्हणू लागली," हे बघा आपल्या घामाचे मोती या गावाच्या मातीत झालं त्याच घामामुळे आपला सुभाष साहेब होईल. आईचे शब्द मध्ये आडवून सुभाष म्हणाला, ....आणि त्या मातीला मी कसा बरं विसरेन." तसा कीसन म्हणाला, "होय बरोबर आहे, ज्या मातीत राहून तुझ्या बापानं तुला साहेब केलं, त्या मातीला तू नाहीच विसरणार."
टेम्पोत बसून शहरात जातांना भावी सुखी जीवनाचे स्वप्न रंगवत रंगवत शहर कधी आले हे किसनला कळलेच नाही.
शहरात एका छोट्याशा खोलीत कीसनच्या कुटुंबाचं वास्तव्य होतं. दिवसभर किसन हमाली करायचा. तर नंदाबाई धुनी भांडी धुण्याचे काम करू लागल्या. आपल्या मुलांच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून किसनने सुभाष व सुनीताला अभ्यासासाठी वेगळी खोली करून दिली होती. दिवसभर काम करून आल्यामुळे किसनला लवकर झोप लागायची. सकाळी लवकर कामावर जावे लागायचे. कारण उशीर झाला तर काम मिळत नसे. सुट्टी फक्त गुरुवारी असायची. त्यामुळे रात्री उशिरा अभ्यास करून आलेल्या सुभाष व सुनीता यांना आपल्या बापाचे आठवडाभर दर्शनच होत नसे. सुट्टीच्या दिवशी सुभाष अगदी लहान मुलासारखा किसनला बिलगायचा." बा मला तुझ्या कष्टांची जाणीव आहे. मी मोठा झाल्यावर तुझ्या घामाचे मोती नक्कीच करीन" सुभाष म्हणायचा. "पण मला विसरु नको रे बर का!" सुनिता म्हणायची. "नाही विसरणार गं तुला तो!" नंदाबाई तीची समजूत काढायच्या.
हळूहळू दिवस निघून जात होते. कीसन व नंदाबाई मुलांच्या शिक्षणासाठी अतोनात कष्ट करत होते. आणि दोघा मुलांनी पण बारावीच्या परीक्षेत भरघोस यश मिळवले. किसन व नंदाबाई च्या आनंदाला पुन्हा एकदा आकाश ठेंगणे झाले होते. सुनिता तशीच सुंदर मुलगी. कोणीही पाहता सहजच डोळ्यात भरावी. तशीच सुशील देखील. आता ती उपवर झाली होती. त्यामुळे भरपूर पाहुण्यांचे येणे-जाणे चालू झाले होते. परंतु आपल्या मुलीचे लग्न गावातच करावे अशी किसन व नंदा बाईंची मनोमन इच्छा होती, तसेच मुलांचे शिक्षण देखील बारावीपर्यंत झाले होते, म्हणून किसनचे कुटुंब पुन्हा एकदा गावात आले होते. मोठ्या थाटात सुनीताचे लग्न झाले. सुनिता सासरी गेली. किसन गावातच लागेल ते काम करत होता. आणि याच काळात सुभाषची पोलिस पदावर निवड झाली. किसन व नंदाबाई यांना खूपच आनंद झाला होता. आज किसन व नंदाच्या कष्टाचे चीज झाले होते. आपण आतापर्यंत सोसलेल्या यातना आता सुखात बदलणार आणि आता फक्त सुभाषच्या लेकरांना खेळवायचं व जेव्हा मरण येईल तेव्हा सुखानं मरायचं, असे अनेक विचार करून किसन व नंदाबायी आनंदाने राहू लागले.
सुभाष मोठ्या थाटात गावातून खाकी वर्दीवर ड्युटीवर जाऊ लागला. कालपर्यंत जे किसनला 'कामावर राहतो का' असे विचारायचे तेच आज सुभाषला नमस्कार करू लागले. पारावर बसलेली म्हातारी मंडळी डोळेभरून सुभाषचे कौतुक पहात होती. येणारा जाणारा प्रत्येक जण सुभाषला पाहून डोळ्याचं पारणं फेडून घ्यायचा. कारण सुभाषच्या धष्ट पुष्ट शरीरावर खाकीवर्दी अधिकच शोभून दिसू लागली. वयात आलेल्या पोरी त्याच्याकडे पाहून एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजायच्या. जणू त्या त्याला आपल्या डोळ्यात बंदीस्त करू पाहत होत्या. सुभाष चे मित्र व इतर तरुण मुलांचे टोळके त्याला पाहून स्वत:चाच तिरस्कार करत होते.
आता किसन व नंदाबाई एका वेगळ्याच दुनियेत राहू लागले. वर्दीतला सुभाष पाहून एकमेकाकडे पाहून नाजूक हसायचे जनु ते एकमेकांना नजरेने सांगू पहात होते, "बघा आपला एवढासा सुभाष आपल्या दोघा पेक्षाही मोठा झाला आहे.
आता नंदाबाई व किसन चे डोळे नातवांना पाहण्यासाठी आतुरले होते. लवकरच सुभाष चे लग्न झाले पाहता-पाहता तीन-चार महिने उलटले. रोहिणी ही सुभाषची पत्नी. दिसण्यास सुंदर. तेवढीच गर्विष्ठ. आणि वडिलांच्या श्रीमंतीचा यथार्थ गर्व असणारी मोठ्या घरची मुलगी. लहानपणापासून सुखात वाढलेली. कुठलेही दुःख न पाहिलेली मुलगी. उलट सुभाष हा जन्माच्या अगोदर पासूनच गरिबीत वाढलेला एका हमालाचा मुलगा. त्याला मायबापाच्या कष्टाची जाणीव चांगल्याप्रकारे होती.
दिवसामागून दिवस जात होते आता घरात कुण्या एका नव्या पाहुण्यांची आवश्यकता भासू लागली. त्या नवीन पाहुण्याला पाहण्यासाठी किसन व नंदाचे डोळे आतुरले होते. आणि काही दिवसातच रोहिणीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सर्वांना आनंद झाला. मोठ्या हर्षाने त्या चिमुकल्या बाळाचा नामकरण सोहळा झाला. आणि नंदा व किसन यांचे नातवाला पाहण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
दिवसभर रोहिणी घरातील सर्व कामे करायची, व विनय हा सुभाष चा चिमुकला आपल्या आजीच्या कुशीत दिलखुलास खेळायचा. त्याला आईची आठवण देखील येत नव्हती. पाहता पाहता बाळ पाच महिन्याचे झाले. बाळाच्या बोबड्या बोलाने व रांगनयाने किसनचे सर्व अंगण फुलून गेले होते. काही दिवसांनी मात्र रोहिणी आपल्या संसारात खूपच गुंतून गेली. तिला बाळ, सुभाष व ती स्वतः यांच्या व्यतिरिक्त इतरांचे ओझे वाटू लागले. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणावरून घरात कुरबुरी वाढत गेल्या. किसन व नंदाच्या ज्या डोळ्यांनी नातवाचे कौतुक बघायचे त्या डोळ्यात सुनबाईचा बोलाने अश्रू ओघळू लागले, ज्या कानांनी नातवाचे बोबडे बोल ऐकायचे ते कान रोहिणीच्या टाकून बोलल्याने बधीर झाले होते. त्यामुळे किसन व नंदाबाई ने सुभाष पासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. परंतु श्रीमंतीची हाव असणाऱ्या रोहिणीने मात्र 'सर्व मालाची वाटणी झालीच पाहिजे' असा पवित्रा घेतल्यामुळे वाटणीसाठी पंचमंडळी बोलवावी लागली.
' पण वाटणी करणार तरी कशाची?, एकच मुलगा तोच या संपत्तीचा वारसदार आणि तोच या माय बापाचा आधार, मग वाटणी का?' असा प्रत्येक जण विचार करू लागला.
परंतु रोहिणीच्या हट्टीपणा मुळे केवळ एका पत्र्याच्या खोलीत किसन व नंदाची सोय करून त्यांना स्वयंपाकाचे तेवढे भांडे देण्यात आले.
वाटणी तर झाली ते केवळ सामानाची.! सर्व सामान जरी रोहिणीने हडपले असले तरीसुद्धा किसन व नंदाच्या मनात असणारे बाळा वरचे व मुलावरचे प्रेम ती वाटून नाही घेऊ शकली.
म्हणूनच की काय रोहिणी कितीही प्रयत्न करून बाळाला शांत करू शकत नव्हती. शेजारच्या खोलीतच नंदाबाई त्या बाळाच्या रडण्याने व्याकूळ होत होत्या. पण 'वाटणी' झाल्यामुळे त्या जाऊ शकला नाही. बाळ खूपच रडते, शांत होत नाही, असा निरोप भेटल्यामुळे सुभाष सुद्धा ड्यूटीवरुन घरी आला होता. त्या दोघांनी बाळाला दवाखान्यात नेले. परंतु बाळाला ना कुठला ताप होता ना कुठली सर्दी!
त्याला तर रोजच्या स्पर्श पेक्षा वेगळ्या स्पर्शाची जाणीव होत असावी. "हे बाळ घरी कुणाकडे असतं?" डॉक्टरांनी डोळ्यावरचा चष्मा काढत विचारलं. कालपर्यंत आईकडे राहायचं, आज पासून आमच्याकडे." सुभाष ने सांगितलं.
"म्हणजे?"डॉक्टरांनी आश्चर्यचकित होऊन विचारलं.
होय साहेब, काल वाटणी झाली. आईवडील वेगळे राहतात व आम्ही वेगळे. सुभाषने स्पष्टीकरण देत डॉक्टरांना सांगितलं.
डॉक्टर एक लांब श्वास घेत म्हणाले, "हे बघा मिस्टर सुभाष, जगामध्ये कोणत्याही गोष्टीची वाटणी होऊ शकते, पण या मनात असणाऱ्या प्रेमाची वाटणी कुणीच करू शकत नाही, अगदी ईश्वर सुद्धा!
सुभाष व रोहिणी बाळाकडे पहात डॉक्टर चे बोलणे लक्ष पूर्वक ऐकत होते.
"तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला याच साठी जन्म दिला होता का की, तुम्ही त्यांना त्यांच्या अवलादीच्या प्रेमापासून वंचित ठेवावं?"
डॉक्टर बेभान होऊन बोलत होते. "मिस्टर सुभाष मला माफ करा, तुमच्या आईच्या हाताचा स्पर्श झाल्याशिवाय हे बाळ शांत बसणार नाही." डॉक्टर हात जोडत म्हणाले. "डॉक्टर बरोबर आहे तुमचं या जगात प्रेमाची वाटणी कुणीच करू शकत नाही, हे आता माझ्या लक्षात आलं आहे." सुभाष बोलत होता.
तेवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून व्याकूळ झालेल्या नंदाबाई न राहून दवाखान्यात आल्या. नंदाबाई च्या कुशीत बाळ जाताच हसू लागलं.तेव्हा रोहिणीला देखील कळून चुकते की, या जगात प्रेमाची 'वाटणी' कोणीच करू शकत नाही, होय, कुणीच नाही अगदी ईश्वर सुद्धा.!
Please give opinion.

