मुके अश्रू
मुके अश्रू
दिवस मावळतीला आला होता. शेतात गेलेल्या बाया आपल्या डोक्यावर गौऱ्या भरलेलं टोपलं घेऊन पदर सावरत घराकडं परतत होत्या. कुणाच्या कडेवरचं शेंबडं लेकरू स्टॅन्ड वर येताच हॉटेलातल्या भज्यांच्या वासानं तोंडाला आलेले पाणी पीत पीत आईच्या कडेवरच हातपाय झाडत होतं. काही पुरुष डोक्यावर लाकडांची मोळी घेऊन थकल्या चेहऱ्यांन घराकडे परतत होते. तर कोणी पावशेरी पोटात रिचवून बसस्टँड जणू आपल्या आजोबानच बांधलं असे समजून आपल्याच नादात डूलत होते. दिवसभर जिल्ह्याच्या, तालुक्याच्या ठिकाणी गेलेली तीनचाकी ऑटोरिक्षा गावाकडे परतत होती. त्यातल्याच एका रिक्षात सरीता आपल्या पाच वर्षांच्या मुलासह बारा वर्षानंतर गावात परतली होती. बारा वर्षात गाव बराच बदलला होता. सरीताला काहीच आठवत नव्हते. तिला सर्व गावच नवंनवं दिसू लागलं.
एका लहानग्या पोराला विचारलं तेव्हा तिला कळलं की, बापाचं घर कर्जापायी सावकारांना बळकावून त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधला. व आपला बाप गावाच्या बाहेर असणाऱ्या एका जमीनदाराच्या शेतातच राहू लागला.
रात्रीचे आठ वाजले होते. विद्युत खांबावरचे लाईट लागले होते. कुठून तरी खमंग तर कुठून फोडणीचा वास येत होता. काही बारीक-सारीक लेकरं लाईट च्या उजेडात खेळत होती. सरीता आपल्या मुलाला घेऊन मोठ्या कसोटीने रस्त्यावर आलेले पाणी ओलांडत, रस्ता कापत आपल्या माहेराची वाट चालत होती. तिनं आता गाव मागे टाकून गावाच्या बाहेरून जाणाऱ्या रस्त्यावरून वळण घेऊन माळाकडे जाणाऱ्या रस्त्यान झपझप चालू लागली.
शहरात राहणारी सुंदर व नाजूक सरीता आज माहेरच्या ओढीनं अंधारातून वाट काढत, विचाराच्या वादळातून, पुढे पुढे चालू लागली.
'माय अण्णा आपल्याला ओळखतील का?'
'बरं ओळखलं तर घरात घेतील का?'
'त्यांच्या काळजाचा तुकडा आहे मी, घरात तर घेतीलच!' पण... पण बारा वर्षी त्यांच्या विश्वासाला तडा देऊन आपण पळून गेलो, किती किती बेईज्जती झाली असणार माय बापाची गावात?
'कशी दिसत असेल माय, अण्णा, आणि खोडकर व लाडका भाऊ 'नारू' कसा असेल?
'किती मोठा झाला असेल?'
असे कितीतरी विचार मनात खेळवत सरीता आपल्या लाडक्याला कडेवर घेऊन बाप राहत असणाऱ्या शेताकडे निघाली होती.
काही अंतरावर तिला एक झोपडी दिसली. कुडाच्या भिंतीतुन आतला दिवा दिसत होता. झोपडीच्या बाहेर चूल पेटली होती.
काहीतरी चांगलं शिजत असल्याचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. जवळच खाटेवर बीडीचा झुरका कुणीतरी ओढत असल्याचं दिसलं.
सरीताची चाहूल लागताच 'राजा' कुत्र्यांना भुंकण्यास सुरुवात केली. तसा खाटेवर उठून बसत उगाच खाकरत महादू, 'हाडं रे राजा ' म्हणून कुत्र्याला भुंकण्यापासून रोखले.
"कोण हाय? कुणाच्या शेतात जायचं हाय?" महादूने पुढे सरकून विचारलं.
"महादू अण्णा हीतच राहतात का?"
सरीतान विचारलं.
"व्हय व्हय".
काहीसा बुचकळून महादून उत्तर दिलं.
भाकरी थापत थापत हात धूत मथुरा उठून, या नव्या अनोळखी पाहुणीकडे आश्चर्याने पाहू लागली.
"मी सविता".
सरीता काहीस खोटे स्मित करत खाटेवर बसत म्हणाली. 'सरीता' नाव ऐकताच महादूने हिसक्याने मान फिरवली. त्याला 'काय बोलावं' काहीच कळना.
घरात जळणाऱ्या मिणमिणत्या दिव्या कडे एकटक पहात महादू भूतकाळाच्या अंधाऱ्या जंगलात कधी पोहोचला,
हे त्याला कळालेच नाही.
तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. सरिताचा जन्म झाला होता तेव्हा किती आनंदात होता महादू!
सर्व गावभर त्यांना साखर वाटली होती. पाणीदार डोळे, कोमल कांति, कोणालाही भुरळ पडावी अशी गोंडस, सरिता सर्वांच्या हृदयात घर करून बसली होती. दिवसभर काम करून आल्यावर आपल्या चिमुकलीचे गोंडस रूप पाहताच शीणभाग भाग पळून जाई.
महादू एक अंगापिंडाने भरदार होता. त्याचे बलदंड बाहू पाहून डोंगर ही मागे सरकत असे. गावात लागेल ते काम करून महादू कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. गावातच कधी शेतमजुरी तर कधी हमाली करून महादूने दोन एकर जमीन खरेदी केली होती. काही दिवसांनी त्याला एक मुलगा पण झाला. महादूच्या कुटुंबात आता सुख लोळण घेऊ लागलं.
गावात असलेल्या जुन्या घराच्या जागी त्याने चार पत्राच घर बांधलं होतं.
रोज आपल्या शेतात जाऊन काम करायचं आणि संध्याकाळी घरी येऊन चिमुकल्यासोबत वेळ घालवायचा, असा महादुचा दिनक्रम चालू होता.
दिवसामागून दिवस जात होते, तशी सरिता पण आता दहावी पास झाली होती. तिने आता वयाची सोळा वर्षे पार केली होती. लहानपणापासून सुंदर असणारी सरिता तारुण्यात पदार्पण करताच अधिकच सुंदर दिसू लागली. तिच्या पाणीदार डोळ्याकडे पाहता कोणासही दिवसा तारे चमकत असल्याचा भास होत असे.
सरीताच स्मितहास्य तरुणाच्या काळजावर जणु वारच करत होतं.
पण महादूचा कडक स्वभाव सर्व गावाला माहित होता. म्हणून कोणीच सरीताला आपल्या प्रेम जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत नसे.
तसा महादुला पण सरिताच्या सौंदर्याचा व बुद्धिमत्तेचा गर्व होता. कधी कुठले पाहुणे महादू कडे सरिताला मागणी घालायला आले की महादू आपल्या मोठेपणात म्हणायचा "पाव्हन, माझी पोरगी साहेबीन व्हणार हाय,तिच्या लग्नाचा विचार अजून तरी केला नाही."
दहावीच्या पुढील शिक्षणासाठी महादुन सरिताचं नाव तालुक्याला असणाऱ्या कॉलेजात दाखल केलं.
महादुला सरिता वर पूर्ण विश्वास होता.
" हे बघ सरिता, कॉलेजातली कारटे खूप बेकार असतात." कुणाच्या बोलन्यावर भाळून जाऊ नये".महादू सरीताला सांगत असे.
" अण्णा, मला मोठी साहेबीन व्हायचं हाय, हे तर तुम्हाला ठाव हाय, मग मी असं वावगं काम नाही करणार!" सरिता मोठ्या विश्वासानं म्हणायची.
आता महादूच्या घरी पाहुण्यांची ये-जा चालू झाली होती. आता सरिता पण नुकतीच बारावीच्या वर्गात शिकत होती.सरिताच्या सुंदर रूपावर सर्व कॉलेज भाळलं होतं.
सरिताशिवाय कॉलेज जणू भकास वाटायचं.
'मानवी मनाचा ठाव कुणीच घेऊ शकत नाही' या वाक्याप्रमाणे सरीताच मन नकळत नितीनच्या प्रेमात अडकलं होतं.सरिता व नितीन एकमेकांवर खूप प्रेम करत. आपल्या बापाला आपण दिलेलं वचन विसरल्यागत सरिता व नितीन हातात हात घालून दिवसभर कॉलेजबाहेरील झाडखाली बसत.
असेच एक दिवस झाडाखाली बसले असता नितीनन विचारलं,' काय ग सरिता दिवसेंदिवस तू उदास दिसतेस, काही चुकलं का माझ?"
"नाही रे नितीन, तुझ्या कडून काही चूक नाही झाली," सरिता नीतीनच्याखांद्यावर डोकं ठेवून म्हणाली.
" मग झालं तरी काय"? नितीनने विचारलं.
" चूक माझी झाली, माझ्या अण्णांनी मला इथे शिकून मोठं होण्यासाठी पाठवलं होतं, पण मी तर भलतंच काहीतरी करून बसले. सरिता काहीशा रडविल्या स्वरात म्हणाली.
"अगं पण प्रेम करणं म्हणजे काही गुन्हा थोडाच आहे ?तुझ्या भविष्यात मी अडसर येत असेल तर आजपासून आपण भेटणे बंद करू." नितीन शांतपणे म्हणत होता.
"नाही नितीन, तू माझ्याशिवाय राहू शकतो की नाही हे मला माहीत नाही, पण मी मात्र तुझ्याशिवाय जिवंत राहू शकत नाही.
सरिता काहीशी द्विधा मनस्थितीत असल्यागत बोलू लागली.
महादुला पूर्ण विश्वास होता की मी आणलेल स्थळ सरिताला नक्कीच मान्य असेल म्हणून त्यांना काल सरिताला तिची सोयरीक पक्की झाल्याची खुशखबर दिली होती. तशी सरिता बावरली नंतर लगेच सावरली.
"० हे बघ सरिता, नारायणरावांचा मुलगा सुंदर आहे, तसेच शेजारच्या गावात असल्यामुळे ख्यालीखुशाली नेहमीच येत राहील. मला माहित आहे, सरिता तू माझ्या शब्दाच्या बाहेर थोडीच आहेस? म्हणून मी तुला न विचारताच हे लग्न सुद्धा पक्क केलंय" महादू काहीस उसनं स्मित आणत सरिताला सांगू लागला.
"अण्णा, पण माझं .....सरिता चे बोलणे मध्येच तोडून महादू म्हणाला," सरिता मी तुला जन्मल्यापासुन ओळखतो तुला हे लग्न मान्य आहे हे तुझ हसूच सांगतय "
सरिताला काही सुचेनासं झालं.
"अण्णाला वाटत आहे ,हे लग्न मान्य आहे पण... पण त्यांना कुणी सांगावं की मी नितीनच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे म्हणून! ज्या मुलासोबत लग्न होत आहे त्या मुलाला मी अजून ठीक पाहिलं पण नाही, त्याच्याशी जन्माची गाठ बांधावी तरी कशी?"
असे कितीतरी विचार सरीताच्या मनात गर्दी करत होते.
सरिता ही नितीन शिवाय जगूच शकत नव्हती म्हणून तीने ही गोष्ट नितीनला सांगण्याचा विचार केला.
दुसऱ्या दिवशी कॉलेजात नितीन आल्यावर सरिताने त्याला लग्न ठरल्याची बातमी सांगून टाकली.
नितीनला तर धक्काच बसला.
कोणत्याही परिस्थितीत नितीन पासून सरिता वेगळी राहू शकत नव्हती.
'मी नितीन वर प्रेम करते व त्याच्या शिवाय जगू शकत नाही ,हे शब्द महादुला सांगण्याची कल्पना देखील सरिता करू शकत नव्हती.
म्हणून तिने ही गोष्ट तशी मनात दाबून ठेवली. मुलीची सोयरीक झाल्यामुळे सरिता सोडून सर्व कुटुंब आनंदात होतं. घरात लगीनघाई सुरू होती. सर्वत्र खरेदी चालू झाली. आपल्या एकुलत्या एक मुलीच लग्न मोठ्या धुमधडाक्यात साजर करायचं म्हणून महादू पैशाची जुळवाजुळव करू लागला.
लग्नाची घटिका जवळ येऊ लागली, तशी सरिताच्या मनाची घालमेल सुद्धा वाढू लागली.
'काय करावे' तिला सुचत नव्हते.
तिच्या चेहऱ्यावरच हसू जणू चोरीला गेलं होतं. चेहरा सर्व निस्तेज झाला होता. लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले होते. पाहुण्यांनी सर्व घर गजबजल होतं. घरात नव्या कपड्यानी गर्दी केली होती. सरीता मात्र मनात जळत होती. महादू नाराजीचं कारण विचारताच मुके आसवं गिळत उगीच तात्पुरत स्मित करायची.
सरिता व नितीन यांनीं आता पळून जाण्याचा विचार केला होता. आपल्या लग्नासाठी एवढा खर्च जो वडिलांनी केला त्याच जणू तिला भानच नव्हतं.
तिला फक्त आता डोळ्यासमोर नितीनच दिसू लागला. ठरल्याप्रमाणे लग्नाच्या पूर्वसंध्येला सर्वजण हळदीच्या कार्यक्रमात व्यस्त असताना सरिताने घरातून पलायन केले.
रात्रीचे दहा वाजले होते हातात कपड्यांची बॅग घेऊन सरिता तालुक्याकडे निघाली होती.
तिला कशाची भीती वाटत नव्हती, कुठून तरी दूर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकुन सरीताच्या अंगावर काटा येई. बारीक थंडगार वारा वाहू लागला.अक्राळविक्राळ दिसणाऱ्या बाभळींचा अवतार अंधारात अधिकच भयानक दिसू लागला. सरिता तालुक्याला पोहोचण्यासाठी निघाली होती.
आपल्या बापानं आपल्यासाठी नवरदेव पाहिला, आणि त्याच्याशी लग्न न करता, कवडीचीही कमाई नसणाऱ्या नितीन सोबत आपण पळून जात आहोत, याचं तिला भानच नव्हतं.
'किती खर्च केला असेल अण्णांनी?, कुठून पैसे जुळवाजुळव केली असेल?
मायचे, अण्णाचे डोळे माझं बाशिंग बांधले रूप पाहण्यासाठी आतुर झाले असतील, आपल्या लहान भाऊ मोठ्या थाटात उद्या मांडवात उभा राहील,
सर्व गाव किती भारी लग्न केलं म्हणून अचंबित होईल 'असा कुठलाही विचार करण्यासाठी सरीताच मन जणू निर्जीव होऊन गेल होत.
तीन अशाच अंधारात दोन तीन तास आड राणाने पायी प्रवास करून तालुक्याला गाठलं होतं.
ठरल्याप्रमाणे नितीन पण आला होता.
दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. आज पासून ते दोघे जण अशा नवीन प्रवासाला निघाले होते ज्याचा त्यांना ना रस्ता माहित होता ना ठिकाण.
सरिताच्या गायब होण्याची बातमी गावात सर्वत्र पोहोचली. सरिता पळून गेली असा आवाज ऐकून सर्व गाव जागं झालं. कुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी चौकशी करू लागलं ,तर कुणी नातेवाईकांच्या घरी.
महादुला काहीच सुचेनासं झालं.
महादूची बायको तर "सरे, तू काय केलंस पोरी, आता आम्हाला गावात तोंड दाखवायला जागाच नाही" असा मोठ्याने गळा काढून सर्वांचं हृदय पिळवटून टाकत होती. सावकाराकडून कर्ज काढून महादून लग्नाला लागणारे सामान खरेदी केलं होतं. महादुला काय करावे काहीच सुचनास झालं.
वराच्या घरी जेव्हा सरिता पळून गेल्याची खबर गेली तेव्हा तर काळजाला बाण लागावे असे शब्द बोलून वराकडची मंडळी महादुला बोलून गेली.
गावात पण महादुला पाहून लोक,'सायबिनीचा बाप आला रे 'असे काहीतरी बोलून टिंगल टवाळी करत.
पण महादू काहीच बोलत नसे. मुके अश्रू शांतपणे गिळत निघून जाई.
त्याच्या पायातलं जणू अवसानच निघून गेलं होतं. सावकाराच घेतलेले कर्ज तर फेडावंच लागणार होतं.
त्याची तारीख जवळ येत होती. सावकाराचं महादूच्या घराकडे येणं-जाणं वाढलं होतं.
"काय रे महादू, पोरगी पळून जायची होती तर मग कर्ज कशाला घेतलं ?"सावकार महादूच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत असे.
"तसं नाही मालक, तुमचं सर्व कर्ज देऊन टाकीन." महादु मोठ्या केविलवाण्या स्वरात म्हणायचा.
पाहता पाहता कर्जाची मुदत संपत आली होती. घर गहाण ठेवल्यामुळे कर्ज देणे झालं नाही तर ते सावकार बळकावनार हे महादुला माहीत होतं.
पण महादू काहीच करू शकत नव्हता. आणि शेवटी कर्जाची मुदत संपली आणि महादून घामाच्या थेंबातून उभं केलेलं घर सावकारांना बळकावले.
तेव्हापासून महादू गावापासून दूर असणाऱ्या या झोपडीत राहू लागला.
"अण्णा, मी सरिता. मला माफ करा अण्णा ." सरीता महादू च्या पायाशी झुकत म्हणाली.
तसा भूतकाळात हरवलेला महादू भानावर आला. त्याला आता शब्दच फुटत नव्हते. तो नुसता डोळ्यात आलेले मुके अश्रू लपविण्याचा व्यर्थ प्रयत्न करत कधी मथुराच्या गालावरून ओघळणारे अश्रू टिपत होता, तर कधी सरिताच्या डोळ्यातले आसवे पाहून मुक्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होता.

