Rahul Ingole

Tragedy

4  

Rahul Ingole

Tragedy

अधांतरी

अधांतरी

5 mins
455


लाॅक डाऊन मुळे अडकून पडलेल्या एका मजुराची कहाणी.

उन्हाळ्याचे दिवस. सूर्य आग ओकत होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली सुधाकर व त्याची बायको पाच वर्षाच्या मुलीसह विश्रांती घेत होते. सकाळपासून चालून-चालून सुधाकर व बायकोचे पाय सुजले होते. परंतु गावाकडच्या ओढीने त्या दोघांना कोणत्याच वेदनेचे काहीच वाटत नव्हते. वाटेने येताना कुणीतरी दीलेला बिस्कीटचा पुडा फोडून सुधाकर ची बायको एक-एक बिस्कीट मुलीला खाऊ घालत होती.

सुधाकर तीस-पस्तीस वर्षाचा तरुण. धीपाड देह, बोलके डोळे, कणखर आवाज, असा सुधाकर मात्र आज रस्त्यालगतच्या लिंबाच्या झाडाखाली अगदी मलुल चेहरा करून बसला होता. विचार करत करत तो भूतकाळातील आठवणी च्या जंगलात कधी पोहोचला हे त्याला कळालेच नाही._ __

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्याची गोष्ट. उन्हाळा तोंडावर येत होता. गावात पण काही काम लागत नव्हते, म्हणून सुधाकर गावातच पारावर बसून मित्रांसोबत फुकटच्या गप्पा मारायचा. सुधाकर ची बायको गावातच लागेल ते काम करून कसंतरी घर चालवायची. परंतु पुढे उन्हाळा चालू झाल्याने गावात काम लागणं, काम मिळणं दुरापास्त झालं. पैसा नसल्याने नवरा-बायकोत खटके उडू लागले. परंतु संसाराचा गाडा चालवण्यासाठी काम तर करावच लागणार होतं, म्हणून सुधाकरनं कामासाठी शहरात जायचे ठरवलंं.

संसारासाठी लागणारे साहित्य घेऊन सुधाकर आपल्या चार वर्षाच्या मुलगी व बायकोसह शहरात निघाला. एसटी, रेल्वे, असा प्रवास करत करत सुधाकर पुण्यात पोहोचला होता. एका जुन्या मित्राच्या ओळखीने तो बांधकामावर मजुरीचे काम करू लागला. बांधकामाच्या बाजुला पत्र्याच्या खोलीत सुधाकरचा संसार सुरळीत चालू लागला.

एक दिवस वेगळ्याच बीमारीने जिकडेतिकडे थैमान घातले. माणसामाणसात सुरक्षित अंतर ठेवण्याच्या पोलीस सूचना देऊ लागले. सर्दी, ताप, खोकला असणाऱ्या व्यक्तींना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेण्यात येऊ लागले. तसेच अशा व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींना पण उचलण्यात येऊ लागले. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंची दुकाने वगळुन ईतर दुकाने बंद होवु लागली. एसटी, रेल्वे अशा सार्वजनिक वाहतुकीच्या वाहना बरोबरच खाजगी वाहनांची पण चाके थांबली. चौकाचौकात पोलीस खडा पहारा देऊ लागले. कोणत्याही व्यक्तीस रस्त्यावर हिंडण्यास बंदी घालण्यात आली. कारण सरकारने लाॅकडाऊन ची घोषणा केली होती.!

कोरोना या महाभयंकर बिमारी पासून देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करत होते. लॉकडाऊन मुळे रोजगार पण आता बंद झाला होता. परंतु संसारात काटकसर करून सुधाकर च्या बायकोने जमवलेले थोडेफार पैसे असल्या मुळे किमान दहा-बारा दिवस गुजरान होणार होती. पाहता पाहता दहा-बारा दिवस उलटले. कोरोना नावाच्या महाभयंकर बिमारीने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच जाऊ लागली, तसे सरकार लाॅकडावुनचे नियम अधिकच कडक करू लागले. सुधाकर व त्याची बायको बांधकामावर बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या खोलीत लाॅकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळत होते. परंतु केवळ लाॅकडाऊनचे नियम पाळल्याने पोटाची भूक थोडीच भागणार होती?

घरात होते नव्हते धान्य, डाळी, आता संपल्या होत्या. आपण अगोदर गावी गेलो असतो तर बरे झाले असते,असे सुधाकर ला वाटू लागले. परंतु त्याला थोडेच माहीत होते की, लाॅकडाऊन मुळे घरातच बसून जीवन जगावं लागेल म्हणून! सुधाकर ची लहानशी मुलगी भुकेने व्याकूळ होऊन जेव्हा रडायची, तेव्हा पहाडासारखा सुधाकर अश्रू ढाळण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हता. त्याला आपल्या शरीरसौष्ठवाचा धिक्कार वाटू लागला.

गावातील लोक कमीत कमी उसनवारी तरी करतील, गावात एका भाकरीच्या सौद्यावर कुण्या जमीनदाराच्या घरी पाणी भरून लेकराची भूक तरी भागवता येईल, असे अनेक विचार सुधाकरला ना झोपू देत होते ना जागु देत होते. परंतु गावी जाण्यासाठी कोणतेच वाहन नसल्यामुळे सुधाकर हतबल व्हायचा. परंतु आता त्याला पाऊल उचलावंच लागणार होतं. कारण त्याच्याकडे गावी जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.

दिवसभर सर्वत्र पोलिस असल्यामुळे सुधाकरने रात्रीच्या वेळी पुण्याहून गावी पायी जाण्याचे ठरवले. पुण्याहून गावी जाताना बसमध्ये बसून बसून सुद्धा पाय सुजतात अशा लांब पल्ल्याच्या मार्गाने सुधाकरने पायी जाण्याचे निश्चित केले होते. 'पुण्याहून गावाकडे पायी' अशी कल्पनाही सुधाकरने कधी केली नसेल, परंतु त्याला आज हीच कल्पना प्रत्यक्षात उतरवायची होती.

रात्रीची वेळ. सर्वत्र शांतता पसरली होती. कुठे किरकिरी तर कुठे लांब कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. सुधाकर व त्याची बायको अशा भयान अंधारात संसाराचं ओझं घेऊन गावाच्या ओढीने चालत निघाले होते. कधी रस्त्याने तर कधी शेतात शेताने चालत हे जोडपं अंतर कापत होतं. कधी चेक पोस्टवर चौकशी करण्यासाठी पोलीस थांबवत तेंव्हा सुधाकर अक्षरश: अश्रूंना वाट मोकळी करून देत असायचा. चेक पोस्टवर सुधाकरच्या लहान मुलीला पाहून गस्तीवर असलेल्या पोलीसातील माणूस रुपी देवच जणू एखादा बिस्कीटचा पुडा देऊन सुधाकर ला मदत करू लागला. कुठे एखाद्या गावात माणुसकी जिवंत असलेल्या भला माणूस भाकर भाजी देऊन सुधाकर ची भुक भागवायचा, तर कुठं मानवातील दानव पाणी मागायला गेलेल्या सुधाकरला झिडकारायचा. अशा या प्रवासात सुधाकर ला समाजात असणाऱ्या मानवांचं तसेच दानवांच खूप जवळून दर्शन झालं. चालून चालून थकलेल्या सुधाकर व त्याची बायको कधी आडरानात तर कधी शहराच्या बाहेर मुक्काम करत. असे करत करत सुधाकर व त्याची बायको संसाराचं ओझं घेऊन या लिंबाच्या झाडा पर्यंत पोहोचले होते.

.….."अहो कुठून थंडगार पाणी तरी आणा". बायकोचे शब्द कानावर पडताच सुधाकर भूतकाळातील विचार चक्रातून बाहेर आला. सुधाकरने जवळच असलेल्या एका विहिरीतून थंडगार पाणी आणलं. पाणी पिऊन सुधाकर व त्याची बायको पुन्हा आपल्या मार्गाने मार्गस्थ झाली. सुधाकर डोक्यावर पोत्यात बांधलेलं सामानाचं गाठोडं घेऊन पुढं चालत होता. त्याच्या पाठीमागं त्याची बायको काखेत मुलगी व हातात एक कपड्याची थैली घेऊन चालत होती. पुण्याहून जवळपास 700 ते 800 किलोमीटर अंतर कापत हे जोडपं इथपर्यंत आलं होतं. गाव वीस-पंचवीस किलोमीटर लांब होतं. गाव जसं जवळ येत होतं, तशी या जोडप्याच्या पायांची गती पण वाढत होती.

'आता लवकरच आपण घरी जाणार, आपले गाववाले भावकीतली आपलं मोठ्या आनंदाने स्वागत करतील, कुणी आपलं औक्षण तर कुणी "मृत्यूच्या दाढेतून वापस आला रं बाबा "असं म्हणत जवळ घेतील, असे अनेक विचार डोक्यात खेळवत सुधाकर वाट चालत होता. सूर्य मावळतीला जात होता. त्याच्या गावाच्या बाजूच्या गावाला वळसा घालून सुधाकर त्याच्या गावाच्या दिशेने निघाला होता. दिवेलागणीची वेळ होत होती. गाव पुन्हा दहा-बारा किलोमीटर लांब होतं. एका मोकळ्या शेतात रात्री मुक्काम करून उद्या सकाळीच गावात प्रवेश करावा, असा मनसुबा बांधून सुधाकर व त्याच्या बायकोने कुणीतरी दिलेली भाकर खाऊन त्या रानात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्या संसाराचं ओझं डोक्यावर घेऊन सुधाकर व त्याची बायको गावाच्या दिशेने निघाले.

सूर्य वर येऊ लागला. पांदीतून जाताना परसाकडं आलेली काही मंडळी सुधाकरला पाहून लांबूनच पळायची. कुणी तर परसाकडं येताना आणलेल्या तांब्या तसाच कुठेतरी भिरकावून देत गावाकडं पळत सुटायचा. त्यांना पाहून असं वाटायचं की, त्यांनी काही कोणता विचित्र प्राणी बघितला व त्याची जणू खबरबात सर्वात अगोदर गावात देण्यासाठी पळत आहेत. सुधाकरला काहीच कळत नव्हते, की काय होत आहे. त्याचे लहानपणीचे वर्गमित्र त्याला पाहून वाट वाकडी करून दुरून जाऊ लागले. गावात प्रवेश करतात सर्व बायका सुधाकर व त्याच्या बायकोकडे पहात नाकाला पदर लावत त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू लागल्या. ज्या म्हाताऱ्या सुधाकरचं लग्न झाल्यावरही प्रेमाने त्याला जवळ घेत कुरवाळत, त्यापण सुधाकर कडे तिरक्या नजरेने पाहत निघून जात. घरी पोहोचल्यावर सुधाकरला तर येथे न येता शेतात राहण्याचा सल्ला देण्यात आला. "पुण्याहून सुधाकर बिमारी घेऊन आला". अशी बातमी गावात पसरत सरपंचाच्या कानावर येऊन धडकली. पोलीस पाटील, सरपंच यांनी सुधाकर ला येऊन थेट शेतात राहण्याची, कुणाच्याही संपर्कात न येण्याची जणू ताकीदच दिली.

नाईलाजाने भुकेने व्याकूळ मुलीला घेऊन सुधाकर व त्याची बायको डोक्यावरचे ओझे घरात न टेकवताच शेताकडे निघाले. डोंबाऱ्याच्या खेळातील दोरीवरून चालत जावं आणि अर्ध्यापर्यंत येताच दोरी तुटावी, आणि अधांतरी लटकत राहावं, अशी सुधाकर ची अवस्था झाली होती. भुकेने व्याकूळ होऊन आईच्या कडेवर 'भाकर मिळेल' या पोकळ आशेने बसलेल्या आपल्या मुलीकडे पाहून आपण अधांतरी लटकल्याचा जणू सुधाकर अनुभवच घेत होता.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy