Jyoti gosavi

Classics

4.1  

Jyoti gosavi

Classics

आत्मपरीक्षण

आत्मपरीक्षण

4 mins
246


 प्रिय आशा! 


हो आशाच! ज्योती नव्हे, कारण तू आधी आईवडिलांची आशा होतीस, नंतर दीपक रावांची ज्योती झालीस, पण तुला स्वतःला" आशा" या नावाने कोणी संबोधले तर फार आवडते. 

आज तुला पत्र लिहित आहे, कारण तुझे अंतरंग, तुझी नस आणि नस, तुझी वेदना, तुझा आनंद, सारं काही मी जाणते .

अग मी आणि तू दोन नाहीतच! म्हणजेच आपण आशा ज्योती. 

म्हणून आज तूच तुला पत्र लिही. 


तुझा स्वभाव लहानपणापासून स्वाभिमानी, सत्यवादी, तोंडावर स्पष्ट बोलणारा, सत्याच्या पाठी अट्टाहास करणारा ,त्यामुळे आयुष्यात अनेक ठिकाणी तुझ्या अंगी कलागुण असून देखील तुला वाव मिळाला नाही. कारण तुला तोंड पुंजे पणा येत नाही ,कोणाची खोटी खोटी स्तुती करता येत नाही, उगाचच कोणापुढे गोंडा घोळता येत नाही .

ठीक आहे त्यामुळे वाईट काय झालं? तू तुझा मार्ग धरून आज पर्यंत मार्गक्रमणा केलीस ना? आणि जगाचे टक्केटोणपे खाऊन बऱ्याच गोष्टी शिकल्यास, बऱ्याच माहीत झाल्या. 

"मोडेन पण वाकणार नाही" हा तुझा बाणा! त्यामुळे सतत कित्येक ठिकाणी तुझा अधिकार असताना देखील, तुला डावलले गेले. "तुझा अपमान झाला" अपमानाचे तेही घोट तू प्यालेस . 

असो! आई-वडिलांची तिसरी मुलगी, मुलाची आशा होती, म्हणून तुझं नाव आशा ठेवलं. पण त्यांनी तुला वाढवले मात्र मुलासारखाच लाडाकोडात! आर्थिक सुबत्ता नसली तरी त्यांच्याकडे जे काही शक्य होतं तितकं सारं त्यांनी केलं. आणि तू देखील तशीच वागलीस .


तुझ्या लग्नाचा एकही पैसा खर्च, तू आई-वडिलांना येऊ दिला नाहीस. 

पाच वर्षे आधी नोकरी केली आणि साठवलेल्या पैशातून तू तुझे स्वतःचे लग्न मुंबईसारख्या ठिकाणी करून दाखवले. तेव्हा गावातल्या लोकांना तुझे खूप कौतुक वाटले. .आई-वडिलांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून त्यानुसार त्यांना जमेल तसे देत गेलीस. 

सासरी देखील काही नव्हतच, शून्यातून तू तुझं जग निर्माण केलं. 

एकत्र कुटुंबात चाळीमध्ये, पती सोडून पाच माणसा समवेत दिवसही काढलेस. 


"माझ्या आयुष्यातले सोनेरी दिवस वाया गेले" म्हणून कधीकधी खंतही करतेस. ठीक आहे! त्यानंतर तू स्वतःला बरंच काही मिळवले. 

पण लग्नानंतर पहिल्या सात आठ वर्षांमध्ये, पतीच्या नोकरीत काही विघ्न आले. दोन वर्ष तो घरी होता, तेव्हाही तू डगमगली नाहीस. 

अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, तू पहिले घर खरेदी केलेस, म्हणजे तुला असं वाटत होतं की आता नाही तर परत कधी घर होणार नाही. 

आता मुलेबाळे लहान आहेत, तोच एखादं घर होऊन जाईल. आणि कोणी कडूनही आर्थिक मदत नसताना, तू स्वतःच्या हिमतीवर वीस वर्षापूर्वी सात लाखाचे घर देऊन दाखवले ,जेव्हा तुझ्या खात्यात 70000 देखील नव्हते .

नंतर सगळे व्यवस्थित झाले, त्यांची नोकरी व्यवस्थित झाली, अगदी ठाण्यासारख्या ठिकाणी आणि आताच्या घडीला तुझी 3/3 घरे झालेली आहेत.

पण त्या काळात ठाम उभी राहिलीस म्हणून आज हे दिवस दिसतात.


नोकरीच्या सुरुवातीच्या काळात, तू अनेक हालअपेष्टा सहन केल्यास. "दाभोळ "जे कधी आयुष्यात पाहिले नव्हते. "मोखाडा" संपूर्णपणे आदिवासी भाग. 

बेंगलोर ,ऊरण, असे पाच वर्षात चार ठिकाणी बदल्या झाल्या. 

तेव्हा तुझ्या बरोबरच्या अनेक मुली ज्या शहरात राहत होत्या. 

त्या तिकडची सरकारी नोकरी सोडून, आपापल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आल्या. आणि कुठेतरी, कोणाच्यातरी, ओळखी पाळखीने कार्पोरेशनमध्ये किंवा चांगल्या ठिकाणी लागून गेल्या. 

तुला मात्र हाल काढावे लागले. कारण तुझी कुठे ओळख नव्हती ,कुठे वशिला नव्हता. 

पण तेव्हादेखील रडत खडत, धडपडत, का होईना तू आपला मार्ग सोडला नाहीस. म्हणून आज तुला चांगले दिवस दिसले .

आज तू सरकार दरबारी अधिकारपदावर आहेस . "मेट्रन" या पदावर आहेस, पण हे पद तू तुझ्या स्व कष्टावर आणि जिद्दीने मिळवले आहेस. 

त्यासाठी एक वर्ष बेंगलोरला पुढचा पोस्ट ग्रॅज्युएशन चा कोर्स मोठ्या जिद्दीने तु केलास. 

तेव्हादेखील तो सोडून पळून जावेसे वाटत होते. परंतु वडिलांनी सांगितलेल्या एका वाक्यावर तू टिकून राहिलीस. "नापास झालीस तरी चालेल, पण पळून येऊ नकोस" आणि त्या जिद्दीवर तू प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आणि त्यामुळेच आज तू मेट्रन या पदावर आहेस. 

तुझ्या आयुष्यात तू यशस्वी आहेस, आणि परमेश्वर कृपेने ज्या ज्या इच्छा करतेस त्या पूर्ण होतात. तुझा जन्मच मुळी गुढीपाडव्याचा, वडिलांचे एक ब्रीद वाक्य होते. "गुढीपाडव्याची आहेस, कधीच काही कमी पडणार नाही" त्याप्रमाणे पडले नाही. म्हणजे कष्ट करून त्या गोष्टी साध्य केल्यास. तुझे आई-वडिलांवर प्रचंड प्रेम होते, आजही आहे. 

इतक्या वर्षानंतर आजही त्यांच्यासाठी डोळ्यातून घळाघळा गंगा जमुना वाहतात. 

तुझ्या स्वभावात अत्यंत हळवेपणा आहे. 

वरून लोकांना तू कडक, रागीट, कठोर वाटतेस. 

पण तू त्या फणसासारखी आहेस. वरून काटेरी पण आतून रसाळ गोड. 

जे लोक एकदा तुझ्या जवळ येतात, ते तुला चांगले ओळखतात. तुझे अंतरंग ओळखतात, ते कधी पुन्हा लांब जात नाहीत. 

लोकांसाठी परोपकार करण्याची, मदत करण्याची तुझी वृत्ती आहे. 

 एखादा कितीही वाईट वागला तरी, त्याच्या वेळेला तू उभी राहतेस, अर्थात वेळ आल्यावर त्या व्यक्तीला सुनावून देखील दाखवतेस, पण धावून मदत देखील करतेस. 

 तुझ्या घरातले म्हणतात तुझा स्वभाव "पागळा" आहे. 

आहे खरा! असू देत" नेकी कर और दरिया में डाल"


 आणि तुझा कन्हैया आहे ना तुझ्यासोबत! तू जे जे करतेस ते त्याच्याच प्रेरणेने, तो पाहतो आहे ना सारं? आणि देतो मग तुला नेहमी झुकतं माप! 

कसं बरं वाटलं नाही ऐकून, कशा मनात अगदी गुदगुल्या झाल्या. 

मला दिसते आहे, तू मनातल्यामनात खुदुखुदू हसते आहेस. 

कारण कृष्ण म्हणजे तुझा एकदमच वीक पॉईंट, 

छान अशीच रहा .

तुझा स्वभाव बदलण्याची तुला गरज नाही. 

तू आहेस तशीच मला प्रिय आहेस. 

अशीच राहा, ठाम राहा, खंबीर रहा, आणि सर्वांची नाती जोडत पुढे जा .

आता आयुष्याची तिसरी इनिंग सुरू होईल ती देखील यशस्वीपणे खेळ,म्हणजे तू खेळशिलच मला खात्री आहे. पण उगाच आपलं सांगितलं, 

परत भेटूया कधीतरी, असंच पत्रातून 


गुड बाय डियर आशु



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics