आता कळतंय मला
आता कळतंय मला


रविवारचा दिवस होता.. सरिता आईशी फोनवर बोलत होती.. कारण तिची तब्येत नीट नव्हती काल.. “आई काळजी घे गं.. थंड पाण्यात हात नको घालू.. कामवाल्या मावशींकडूनच स्वयंपाक करून घे आज.. औषधं घे!”असे खूप सारे सल्ले देऊन सरिताने फोन ठेवला.. तेवढ्यात सरिताची मुलगी नीरजा उठली... ती म्हणाली.. “आई काल रात्री तरी आजीशी बोलली तू, किती सारखं सारखं फोन करून गप्पा मारते.. आजकाल कधी बघेल तेव्हा आजीशी बोलत असते तू. आधी तर इतकं नाही बोलायची!”
“हो गं बेटा.. आजकाल आजीची खूप आठवण येते.. आवर पटकन आणि नाश्त्याला ये!” असं म्हणत सरिता स्वयंपाकघरात गेली..
तिच्या डोक्यात आपल्या मुलीचे किती आजीशी गप्पा मारते आजकाल हेच वाक्य घुमत होतं.. खरंच आजकाल किती कॉल करते मी आईला.. नीरजा खरं तर बोलत होती.. आधी तीन-चार दिवसातून एकदा कॉल करायची पण आता दिवसातून कमीत कमी एक वेळा तरी कॉल होतोच होतो.. आधी संसाराची, मुलांची जबाबदारी यामध्ये खूप व्यस्त असायची.. आतापण असते.. पण मनात कुठेतरी एक बदल झाला आहे..
सहा महिन्यापूर्वी जेव्हा मुलगा नितीन शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेला तेव्हापासून मला जे अनुभव आले त्याने मला पूर्णपणे बदलवून टाकलंय.. आता कळतंय आईचं मन काय असतं.. आता जेव्हा केव्हा नितीनचा कॉल येतो तेव्हा किती आनंद होतो म्हणून सांगू.. एकदिवस कॉल नाही आला तर किती बेचैन होते मी.. मनात नाही नाही ते विचार यायला लागतात.. सारखं मी त्याचाच तर विचार करत असते.. तो आता उठला असेल.. नाश्ता करत असेल.. आता कॉलेजमध्ये असेल.. जेव्हा मी या सगळ्या मनःस्थितीतुन जात होती तेव्हा मला माझ्या आईची ही जास्त आठवण येऊ लागली.. तीपण तर माझ्या कॉलची अशीच वाट बघत असेल.. तिलापण तर माझ्याशी बोलल्यावर चांगलं वाटत असेल.. पण मी मात्र इकडे संसारात इतकी व्यस्त झाले की ती तिकडे एकटी राहत असूनही तिच्या मनाचा कधी विचारच केला नाही..
आज जेव्हा नितीन मला कॉल करून विचारतो की कधी उठली, जेवायला काय बनवलं.. walking ला जाते ना रोज, गोड जास्त खाऊ नको, शुगर वाढेल.. कोणतं नवीन पुस्तक घेतलं का वाचायला, तेव्हा खूप आनंद होतो की माझा मुलगा माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत किती लक्ष घालतो.. मी का नाही केलं असं.. मी पण तर आईला कॉल करून या सगळ्या गोष्टी विचारू शकले असते.. पण म्हणतात ना स्वतःवर वेळ येत नाही तोपर्यंत कळत नाही..
बाबांचा रागीट स्वभाव असूनही आईने घर कसं हसतं खेळतं ठेवलेलं.. आता जेव्हा स्वतःवर वेळ आलीय तेव्हा आईची प्रत्येक गोष्ट कळते आहे.. किती छान नातेसंबंधही टिकवून ठेवलं आहेत तिने.. काही नाती जेव्हा आईने स्वतःहून तोडली होती तेव्हा खरंतर मला ती गोष्ट आवडली नव्हती.. पण आता जेव्हा मी स्वार्थी, नकारात्मक नात्यांना दूर केलंय माझ्यापासून तेव्हा कळतंय मला की स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी काही नात्यांना लांब ठेवणेच फायदेशीर असतं..
आता थोड्या दिवसाने नीरजा पण लग्न करून सासरी जाईल.. नितीन पण शिक्षण पूर्ण करून त्याचा संसार चालू करेल.. जेव्हा ही दोन्ही मुले स्वतःच्या विश्वात मग्न होतील तेव्हा माहित नाही आईच्या अजून कोण कोणत्या गोष्टी आठवतील.. तिच्या भावना अजून चांगल्या पद्धतीने समजतील मला.. खरंतर दुःखाची गोष्ट ही आहे की आई-वडिलांचं मन कळायला खूप वेळ लागतो. पण गेलेला वेळ परत येत नाही.. त्यामुळे जितके दिवस राहिलेत त्यामध्ये परत अशी चूक नाही करायची आहे मला.. खरंच मुलगी म्हणते ते खरं आहे, आजकाल मला आईची खूप आठवण येते.. तिच्या भावनांना, तिच्या शब्दांना खूप काही समजून घेतलंय मी.. बघू आता येणारा काळ अजून कशा कशाची जाणीव करून देतो..
या विचारात असतानाच नीरजाची हाक कानावर पडते.. “आई आवरलं माझं, नाश्ता दे ना.. “
पाण्याने भरलेले डोळे पुसतच सरिता नाश्ता घेऊन बाहेर जाते..