आसं मज बाळाची भाग तिसरा
आसं मज बाळाची भाग तिसरा
मागील भागावरून पुढे..
वैभव पाण्याचा ग्लास घेऊन बेडरूममध्ये आला.
हे घे पाणी
अनघानी स्वतःहून समोरच्या प्लेटमधील काहीच खाल्लं नव्हतं. तिला कसं बसं समजावत वैभवनी तिला भरवण्यास सुरुवात केली. खाताखाता अनघानी विचारलं
"वैभव किती दिवस चालतील या टेस्ट?" अनघाने विचारलं.
"हे आत्ताच कसं कळेल उद्या सोनोग्राफी करून त्याचा रिपोर्ट आल्यावर डॉक्टर सांगतील पुढे काय करायचं ते. चल फार विचार करू नकोस. जेवून घे नऊ वाजले."
"कसा विचार करू नको वैभव आयुष्यातील किती सुंदर वळणावर मी उभी होते कोणीतरी दुष्टपणाने मला खोल दरीत फेकून दिलं असं वाटतंय मला वैभव."अचानक अनघाचा चेहरा घाबराघुबरा झाला. तिला अशी भेदरलेली बघून वैभवला अचानक तिला काय झालं कळेना.
"वैभव जर मी आईच होऊ शकले नाही तर..?"
वैभव बोलला "असले काहीतरी वेडेवाकडे विचार मनात आणू नकोस. असं काहीही होणार नाही."
रडण्याचा उमाळा न आवरून अनघा उशीत तोंड खुपसून रडू लागली वैभवने शांतपणे तिच्या पाठीवरून हात फिरवला.
"अनघा आता जेवून घे."वैभव म्हणाला बर्याच वेळाने अनघा शांत झाली. अंगातलं त्राण निघून गेल्यासारखी ती उठून बसली. लहान मुलाला जसं भरवावं तसं वैभव तिला भरवू लागला. सगळीकडे शांतता पसरलेली होती ती सहन होत नव्हती वैभवला. कधी ही जीवघेणी रात्र संपते असं त्याला झालं होतं. अनघा निट जेवली ही त्याच्यासाठी समाधानाची गोष्ट होती. तो हळूच थोपटत तिला म्हणाला,
"झोप आता शांत. उद्या बघू."
आजची सकाळ अनघासाठी खूपच वेगळी होती अंगात त्राण निघून गेल्यासारखी तिला वाटत होतं. सगळं अंग आंबून गेल्यासारखं वाटत होतं. तिच्या चेहरा एखाद्या मोठ्या आजारातून उठला सारखा दिसत होता. वैभवनं चहा केला आणि तिला उठवलं. तिला चहा घ्यायला लावला. आपण ऑफिसमध्ये गेल्यावर अनघा काय करेल हा प्रश्न वैभवला सतावू लागला. वैभवनी आज घरीच थांबायचं ठरवून तसं फोन करून ऑफिसमध्ये कळवलं की तो आज येऊ शकत नाही. वैभव च्या कानाशी सतत गुण-गुण करणारी अनघा परवापासून वाचा गेल्यासारखी बसून होती. वैभवला खरं तर घरातलं हे सगळं वातावरण असंह्य झालं होतं पण त्याचाही त्याला इलाज नव्हता. आज संध्याकाळी सोनोग्राफी केल्यावर उद्या त्याचा रिपोर्ट येईल त्यावर सगळ ठरणारं होतं.
वैभवनी टी.व्ही.लावला उगीचच रिमोटनी चॅनल बदलत कार्यक्रम बघत होता. तसंही कुठं काही कार्यक्रम चालू असता तरी त्यामध्ये काय चाललंय हे त्याला कळलंच नसतं. कारण तो त्या मनस्थितीतच नव्हता. मालिकांवरून वैभव अनघाला नेहमी खूप चिडवत असे. त्यावर त्या दोघांची वादावादी पण व्हायची. तेव्हा वैभवला हसू यायचं पण आज ते आठवून सुद्धा त्याला हसू आलं नाही. त्याने कंटाळून टीव्ही बंद केला.
कधीतरी सोफ्यावर बसल्याबसल्या त्याला झोप लागली.
***
काल अनघाची सोनोग्राफी करून झाली होती. रिपोर्ट आज मिळणार होता. कालची अख्खी रात्र जीवघेण्या विचारांच्या सावल्या घेऊन आली आहे असं अनघाला वाटलं होतं. त्या सावल्यांच्या अंधारानी आपण घुसमटून जाऊ अशी भीती तिला वाटू लागली होती. या सगळ्यानी उगाच डोकं खूप दुखत होतं. ती रडत रडत म्हणाली
"वैभव खूप डोकं दुखतं आहे."
";फार विचार करू नकोस त्यामुळे तुलाच त्रास होईल. वैभव म्हणाला.
"खूप विचार करायचा नाही असं ठरवते मी पण जमतच नाही. या सगळ्या तपासण्या आपाल्याला कुठे घेऊन जाणार आहेत कळत नाही. या तपासणीनंतर आपल्याला होकारार्थी उत्तर मिळणार आहे का? या सगळ्याचा विचार करून मनाला खूप वेदना होतात."
वैभवनं तिचा हात हातात घेऊन तो हळूच थोपटला. इतका वेळ अशीच सचिंत बसलेली अनघा वैभवच्या मायेच्या स्पर्शान स्वतःला सावरू शकली नाही आणि ढसाढसा रडू लागली. तिचं रडण थांबेपर्यंत तो तिच्या केसातुन हात फिरवत होता. तो शांत होता.
"वैभव डॉ. असं का बोलले असतील. ज्यांना वर्षानुवर्षे तपासण्या करूनही मूल होत नसेल त्या बायका कसं करत असतील. हा जीवघेणा वेळ कसा सहन करत असतील. मी तर दोनच दिवसात इतकी निराश झाले. तुला माहिती आहे आईच्या शेजारी भागवत म्हणून राहतात त्यांच्या सुनेला बारा वर्षांनंतर बाळ झालं.
तिनी ही बारा वर्ष कशी काढली असतील. तेव्हा मी तिला बघायची न तेव्हा ती इतरांशी हसून बोलायची.पण जेव्हा एकटी बसलेली असायची तेव्हा खुप उदास दिसायची. तिची ती वेदना आज मला कळतेय. जेव्हा तिला मी बघायचे तेव्हा मी कॉलेज मध्ये होते.तिचं दु:ख किती तीव्र होतं ते तेव्हा नाही कळलं.अनघा भावनाविवश होवून बोलली आणि डोळे मिटून आपले हात डोळ्यावर गच्च दाबून धरले.
-------------------------------------------------------------
क्रमशः पुढे काय झालं? पुढील भागात वाचा.
'आसं मज बाळाची' भाग तिसरा.
लेखिका.. मीनाक्षी वैद्य.
