आसं मज बाळाची भाग चवथा
आसं मज बाळाची भाग चवथा
मागील भागावरून पुढे...
वैभवनी उत्तरादाखल फक्त हं असा हुंकार दिला.कारण इथे अनघाला वैभवन काही बोलावं हे अपेक्षितच नव्हतं. अनघाला फक्त ही गोष्ट त्याला सांगायची होती. वैभव हे जाणून होता म्हणून डोळे मिटून बसला होता.आज दहा वर्षं झाली वैभव अनघाला ओळखत होता. तिच्या स्वभावानुसार आपण कधी उत्तर द्यायचं कधी फक्त हुंकारच द्यायचा हे तो जाणून होता. म्हणूनच आत्ता तो काही बोलला नाही. तसाही खूप दु:खाच्या प्रसंगात कोणालाच चर्चा आवडत नाही तर स्पर्शातून, चेह-यावरून, डोळ्यातून सांत्वना हवी असते.
दु:ख झेलणाराच बोलत असतो. त्यालाच बोलू द्यावं.आपण फक्त श्रोत्याची भूमिका करावी. बोलणारा भडभडून बोलतो आणि तणावमुक्त होतो. हे त्यानी कुठंतरी वाचलं होतं. ते आज त्याला आठवलं. म्हणून तो संयम बाळगून अनघाशी वागत होता.
या सगळ्या धामधुमीत सकाळचा चहा राहिला होता वैभव चहा करण्यासाठी आत गेला चहा करायला खरं तर खूप वेळ लागत नाही पण आज चहा करता करता त्याची मधेच कुठेतरी तंद्री लागत होती इतका जरी तो हळवा नसला तरी काही प्रमाणात होता तो खरं तर तिला सावरताना थकला होता उद्या रिपोर्ट मध्ये काय येईल ही विचित्र धडधड त्याच्या मनात चालू होती.
त्या आवाजाने वैभव दचकून भानावर आला आणि चहावर झाकण ठेवताच वैभवच्या डोक्यात विचारांची गाडी पुन्हा सुरू झाली. लगेच वैभवच्या लक्षात आलं आपण ठाम राहायला हवं डोळ्यातलं पाणी पुसून वैभवनी सगळा चेहेरा पाण्याने धुतला आणि काहीच घडलं नाही अशा अविर्भावात चहा आणि बिस्कीटे घेऊन आला आणि अनघाजवळ गेला.
"मॅडम गरम गरम चहा हाजीर है."असं त्यानी नाटकी सुरात म्हटलं. अनघाने डोळे उघडले वैभवचा एकूण अविर्भाव बघून तिला हसू आलं. ती उठून म्हणाली
"बडे अच्छे वेटर बनके आये हो?"त्यांचं नाटकी हेल काढून बोलण्याची पद्धत बघून तीही हसत-हसत बोलली. वैभव म्हणाला,
"तू हसलीस खूप छान वाटलं. तू चार दिवसानंतर हसतेस अनघा. घे चहा बिस्कीट आणि केक." अनघालाही ते जाणवलं एवढ्यात आपण हसायलाच विसरून गेलो. असं करून नाही चालणार वैभवला किती त्रास होत असेल माझ्या अशा वागण्याचा.
मी स्वतःला सावरायला हवं. मी शारीरीक त्रास सहन करतेय पण वैभवपण मनातून दु:खी असेलच आणि वरून आपल्याला त्रास होवू नाही म्हणून आपल्यालाही सांभाळतोय. आजपासून हे थांबवायचं. आपण शांतपणे सगळ्या तपासण्यांना सामोरं जायचं. तिनी रोजच्यासारखी सहजपणे चहा-बिस्कीट घेतली. वैभवकडे बघून छानसं हसली.वैभावलाही बरं वाटलं.
चहा झाल्यावर ती नेहमीसारखी स्वयंपाक घरात गेली. ते बघितल्यावर वैभवला जरा हायसं वाटलं.
"मी आज ऑफिसला गेलो तर चालेल ना?" वैभवनी विचारलं. स्वयंपाक करता-करता अनघा उत्तरली,
"जा तू ऑफिसला मी घरी स्वतःला त्रास करून घेणार नाही. ऑफिसमधून येतायेताच सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन ये.
"हो तसंच करतो तू तयार राहा मी घरी आल्यावर आपण डॉक्टरांकडे जाऊ."वैभव म्हणाला.
"मी आठवण करू का दुपारी तुला?" असं अनघानी विचारताच वैभव म्हणाला.
";नको मी आणीन आठवणीनी." तो ऑफीसला जाण्याची तयारी करू लागला.
अनघानी रमत-गमत आपली आवडती गाणी ऐकत स्वयंपाक केला. वैभव तयार होता-होता अनाघानी त्याचा डबापण रोजच्यासारखा तयार केला. डबा तयार असल्याचं बघताच वैभव निवांत झाला. आज आपण ऑफीसला गेलं तरी चालणार आहे. कालपेक्षा आज अनघा खूप सावरली होती.वैभवला मनातून खूप बरं वाटलं. आज तो ऑफीसमध्ये निट काम करू शकेल. आपल्याच विचारात त्यांनी डबा घेतला.अनघाला टाटा केलं आणि तो खाली उतरला.
पार्किंगमध्ये लावलेली बाईक काढली, डोक्यावर हेल्मेट घातलं आणि बाईक चालू केली. तेव्हाच अचानक वैभवाच्या चेहे-यावर हसू आलं. त्याच्या ऑफीसमधला कलीग जयंत नक्की विचारेल "काय आहे आज? गडी एकदम खुश दिसतोय?" जयंत शब्दांच्या पलीकडे जाऊन वैभवला ओळखतो. मित्र असावा तर असा. वैभव हसत गाडीवर बसला आणि ऑफीसच्या दिशेनी निर्धास्तपणे निघाला.
क्रमश: पुढे काय होतं? पुढच्या भागात वाचा.
:आसं मज बाळाची' भाग चवथा.
