आसं मज बाळाची' भाग दुसरा
आसं मज बाळाची' भाग दुसरा
मागील भागावरून पुढे...
वैभव हळूच उठला आणि फोन घ्यायला दुस-या खोलीत गेला. त्याची चाल अगदी गळून गेल्यासारखी दिसत होती. मेहतांचा दवाखाना नेहमीच गर्दीने गजबजलेला असायचा. त्यांच्या हाताला यश होतं. म्हणून बाळाच्या ओढीनी पेशंटला त्यांच्या दवाखान्यापर्यंत खेचून आणत असेल. त्यांच्याबद्दल वैभवला त्याच्या मित्रानी सांगीतल होतं म्हणूनच ती दोघं कालचे रिपोर्ट घेऊन त्यांच्याकडे आले होते. आपल्या नावाचा पुकारा होईपर्यंत बसल्या बसल्या तिथे आलेल्या प्रेग्नंट बायकांच्या पोटाचं अनघा निरीक्षण करत होती. प्रत्येकीच्या पोटाचा आकार वेगवेगळा होता. कोणी सोफ्यावर सहजपणे बसली होती तर कोणाला बसणं
अवघड जात होतं तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. हे सगळं आपल्या आयुष्यात घडावं असं वाटत असतानाच हा खेळ सुरू झाला होता. त्याचा शेवट काय आहे हे अनघाला माहित नव्हतं.ती अस्वस्थपणे बसली होती. वैभवही अस्वस्थच होता. अनघापेक्षा वैभव ची अवस्था काही फार वेगळी नव्हती पण त्यानी काहीही ऐकण्याची मनाची तयारी केली होती. त्याला खंबीर राहणं खुप आवश्यक होतं नाहीतर अनघा कोसळली असती. 'अनघा वैभव पांगारकर कोण आहे?' नावाचा पुकारा होतास वैभवनी अनघाला म्हटलं उठ अनघा त्यांनी आपलं नाव पुकारलं. दोघेही उठले आणि डॉक्टरांच्या केबीनमध्ये शिरले.
"नमस्का डॉक्टर मी वैभव पांगारकर आणि ही माझी बायको अनघा पांगारकर." अनघाने पण डॉक्टरांना नमस्कार केला. त्यांच्या हसर्या चेहर्याकडे बघताच अनघाच्या मनातील भीती दूर पळाली. आपल्या गोंधळलेल्या मनस्थितीत डॉक्टर नक्कीच मदत करतील याचा तिला विश्वास वाटला.
"बोला काय झालं? डॉक्टरांनी त्यांना विचारलं.
"अनघा ते रिपोर्ट्स दे." वैभव कडे लक्ष जाताच अनघानं पर्समधून रिपोर्ट काढून डॉक्टरांकडे दिले. डॉक्टरांनी रिपोर्ट शांतपणे बघून टेबलवर ठेवले. डॉक्टर काही बोलायच्या आत अनघाने विचारलं,
"डॉक्टर नेमकं काय झालं?" तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. डॉक्टर शांतपणे बोलू लागले,
"हे बघा रिपोर्टनुसार तुम्ही प्रेग्नेंट नाही पण दोन महिने झाले तुम्हाला पाळी आली नाही म्हणता."
"हो.म्हणूनच टेस्ट केली."
"तुम्ही योग्य केलत.पण या रिपोर्टनुसार तुम्ही प्रेग्नंट नाही. तर आता हे का आणि कसं घडलं हे आपण बघायला हवं त्याकरता तुमच्या काही टेस्ट करायला हव्या पहिले आपण तुमची सोनोग्राफी करू. मी तुम्हाला डॉक्टर शहा यांच्या केअर सोनोग्राफी सेंटरचा पत्ता देतो डॉक्टर शहा यांच्या नावाने लेटरही देतो. सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन तुम्ही पुन्हा या."
डॉक्टरांनी डॉ. शहांच्या नावे लेटर लिहून दिलं आणि त्यांच्या क्लिनीकचा पत्ता पण दिला. या गोष्टी घेऊन दोघही मेहतांच्या क्लिनीकच्या बाहेर पडले. आता दुस-या डॉक्टर कडे जायचं आणि सोनोग्राफी करायची म्हणजे आपण पुन्हा एक दिवस अधांतरी लटकत राहणार असं अनघाला वाटलं दोनच दिवस झाले रिपोर्ट निगेटीव्ह येऊन पण किती ताण आला आहे आपल्या मनावर. कितीही ताण घ्यायचं नाही ठरवलं तरी आपल्या आयुष्यातील हा वाईट काळात कधी संपणार हा प्रश्न तिला अस्वस्थ करू लागला.
घरात शिरताच अनघा सोफ्यावर कोसळल्या सारखी बसली.वैभवनी शांतपणे दार लावलं बूट काढले हातपाय धुऊन जेवायला काय करावं याचा विचार करू लागला. अनघा सध्या तरी भान वर येणार नाही हे वैभव च्या लक्षात आले होते रात्रीच्या जेवणाची सोय त्यालाच करावी लागणार होती. बाहेरून काही मागवलं तरी ते अनघा खाईल याची खात्री देता येत नव्हती.
अनघा जेवायला तयार होणार नाही हेही त्याला पक्कं माहिती होतं. तिला बळंबळंच भरवावं लागणार होत. वैभवनं फ्रीज उघडून बटर, कोथींबीर टोमॅटो काढले. कांदा चिरून घेतला. अंडी मस्त फेटून घेऊन छान ऑमलेट केलं.ब्रेड भाजली. एका प्लेटमध्ये ऑमलेट ब्रेड घेऊन वैभव बाहेरच्या खोलीत आला. अनघा तिथे नव्हती.
अनघा बेडरुममधे जाऊन झोपली होती. झोपली कसली. तिनी स्वत:ला पलंगावर फेकल्यासारखं टाकून दिलं होतं. डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते.तिच्या चेह-याकडे बघून त्याला भडभडून आलं.
आपल्या डोळ्यातलं पाणी अनघाला दिसू नये म्हणून वैभव पाण्याचा ग्लास आणण्याच्या निमीत्ताने स्वयंपाकघरात गेला. डोळ्यातील पाणी त्यानं हळूच पुसलं आणि आपला चेहरा नीट दिसेल याची काळजी घेत पाण्याचा ग्लास घेऊन तो बेडरुममध्ये आला.
-----------
क्रमशः पुढे काय झालं? हे वाचा पुढील भागात.
'आसं मज बाळाची' भाग दुसरा.
