आसं मज बाळाची भाग आठवामागील
आसं मज बाळाची भाग आठवामागील
आसं मज बाळाची भाग आठवा
मागील भागावरून पुढे...
वैभव बाईक वरून ऑफीसमध्ये निघाला पण त्याच्या डोक्यात मघाचेच विचार चालू होते आणि अनघाचा गलीतगात्र चेहरा वैभवाच्या डोळ्यासमोर आला.
हे आईचं विचित्र वागणं बोलणं थांबवायलाच हवं.विचारात असतानाच तो टेबलाजवळ आला. तिथे एकच प्लेट बघून त्याच्या लक्षात आलं. आता हिला आपल्याबरोबर नाश्ता करायला लावला नाही तर ही दिवसभर काहीच खाणार नाही. म्हणून तो तिला म्हणाला,
"अनघा तू पण ये नां."खुर्चीवर बसता-बसता वैभव अनघाला म्हणाला.
"हं" एवढाच हुंकार देऊन तीपण त्याच्याबरोबर नाश्ता करायला बसली. तिची सगळी हालचाल मुकाटपणेच चालू होती. डोळ्याच्या कोप-यातून वैभव तिच्याकडे बघत होता आणि नाश्ता करत होता. खरतर आईच्या बोलण्यामुळे त्याच्या तोंडाची चवच गेली होती. नाश्ता कारायची सुद्धा त्याला इच्छा नव्हती. पण जर त्याने खाल्लं नसतं तर तीनही खाल्लं नसतं म्हणून तो जबरदस्ती उपम्याचा घास तोंडात घेत होता.
दुपारी अनघाला फोन करून जेवलीस का विचारायला हवं नाहीतर अशीच संध्याकाळपर्यंत बसून राहील.नाश्ता संपवून तो बसला होता. कारण अनघाचं खाणं खूपच हळू चाललं होतं. "अनघा अगं अजून काहीच खाल्लं नाहीस तू. मला निघायचं आहे ऑफीसाला.
"तू जा ऑफीसला. मी खाते हळू-हळू." तिचा आवाज एकदम निर्विकार होता. तो मनाशीच चरकला. अनघा कितीही चिडली तरी अशी निर्विकारपणे उत्तर देत नाही. आज आईच्या बोलण्यानी सगळा घोटाळा केलाय.बाळासाठी आसुसलेल्या एका स्त्रीचा आईनी अपमान केलेला होता. अनघा कसं सहन करू शकेल हे. ऑफीसाला जावं की नाही हाच विचार तो करत होता. पण काल सुट्टी झाली आज जावं लागेल.
जरा अनिछ्चेनीच वैभव खुर्चीवरून उठला. त्याला निघावच लागणार होतं कारण आधीच त्याला अर्धा तास उशीर झाला होता.डबा घेऊन अनघाच्या डोक्यावर हलकच थोपटत तो घरातून बाहेर पडला. बाईकपर्यंत येता-येता त्याला प्रकर्षानी वाटलं की आपण ताईला फोन करावा. सगळं सांगावं आणि तिला जमलं तर घरी ये अनाघाजवळ असं सांगावं.ताईची अनघा लाडकी होती ती नाही म्हणणार नाही याची त्याला खात्री होती. पण क्षणात ती खात्री नाहीशी झाली. त्याच्या मनात आलं आई अशी वागेल असं कुठे वाटलं होतं आपल्याला.
एका मोठा उसासा त्याच्या तोंडून बाहेर पडला. वैभव गाडी चालवत होता. आपल्याच विचारात ऑफीसच्या दिशेनी निघाला.ऑफीसमधे पोचताच जयंतनी विचारलं.
"कारे वैभव आज एवढा उशीरा? घरी ठीक आहे न? तुझा चेहारा इतका का उतरला आहें?"
त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता वैभव आपल्या जागेवर जाऊन बसला. जयंत त्याच्या टेबलापाशी आला. हळूच विचारलं "उपचारात काही अडचण आली का? "वैभव चुपच होता. "अरे बोल काहीतरी. तू काही बोलल्याशिवाय मला कसं कळेल?"
"जयंत माझी आई या उपचाराच्या विरोधात आहे. कारण हा उपचार करायला खूप खर्च येणार आहे." वैभवच्या डोळ्यातून घळ-घळ पाणी वाहू लागलं जे त्यांनी अनघा समोर असताना महत्प्रयासानी रोखून ठेवलं होतं. जयंत त्याच्या पाठीवरून हळूच हात फिरवू लागला.
"अंदाजे किती खर्च येणार आहे?"
"अजून कळलं नाही. हे उपचार करायचे आहेत हे त्यांना नक्की सांगीतल्यावर ते अंदाज देतील. पण मध्येच आईनी सगळा घोळ घालून ठेवला. अरे आत्ता कुठे अनघा जरा धीट झाली होती. आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न."
"हे बघ असा निराश नको होऊ. अनघा कोणाचं ऐकेल?" जयंत नी विचारलं.
"सुजाताईचं ऐकेल ती." वैभव म्हणाला.
"मग झाल तर आत्ता सुजाताईला फोन लाव." जयंत म्हणाला.
"हो मी ठरवलंच होतं सुजाताईला फोन करायचा. लगेच करतो."
वैभवनी चटकन डोळे पुसले. आणि सुजाताईला फोन लावला. त्याच्या या कृतीकडे बघून जयंताच्या चेह-यावर स्मितहास्य आलं. सुजाताईनी फोन उचलताच वैभव बोलला,
"सुजाताई...आज आईचा सकाळी फोन आला होता आणि..."त्यानी सकाळची सगळी हकीकत ताईला सांगितली.
यावर ताई म्हणाली, "वैभव तुला आपल्या आईचा विचित्र स्वभाव माहिती आहे नं? तू तिच्याकडे दुर्लक्ष कर. बाबा आपल्याकडून आहेत नं मग कशाला घाबरतो?
"हो पण ताई आत्ताच अनघा जरा धीट झाली होती."
" तू काळजी करू नको." ताई म्हणाली.
"ताई अग आज सकाळी तिनी नाश्तापण व्यवस्थित केला नाही. मी घरी नाही तर जेवेल की नाही कुणास ठाऊक? मी फोन करणार आहे तिला जेवायच्या वेळेस. मला हो जेवते म्हणेल किंवा जेवली असही सांगेल पण प्रत्यक्षात माहित नाही काय करेल."बोलता-बोलता वैभवचा आवाज रडवेला झाला होता.
ताई समोर रडू यायला नको म्हणून चटकन वैभव नी फोन ठेवला. त्याचा रडवेला चेहरा बघून जयंत त्याच्याजवळ आला. जयंतनी हळूच वैभवच्या पाठीवर थोपटलं. न राहवून वैभव जयंतच्या हातावर डोकं ठेऊन रडू लागला.
--------------------------------------------------------------------------
क्रमशः पुढे काय झालं? वाचा पुढील भागात.

