STORYMIRROR

Meenakshi Vaidya

Others

3  

Meenakshi Vaidya

Others

आसं मज बाळाची - भाग 7

आसं मज बाळाची - भाग 7

3 mins
123

वैभव सकाळी ऑफीसला जाण्याची तयारी करत असतांनाच त्याच्या आईचा फोन आला. तयारी करता-करता फोन स्पीकरवर ठेवून तो बोलू लागला.

 

"हं आई बोलं."

​ 

"काय बोलणार? बोलायला काही बाकी ठेवलस?

 

"असं का म्हणतेस आई? मला कळलं नाही." वैभवनी गोंधळून विचारलं.

 

"कसं कळणार. काल आपल्या बाबांशी बोललास. आई तुझी कोणीच नाही. हो नं?

 

"अग असं का म्हणतेस? रात्र खूप झाली होती म्हणून बाबांना सांगितलं तुला आज सविस्तर फोन करणार होतो. बाबांनी तुला सांगितलं असेल नं?"

 

"हो सांगितलं. किती खर्च येणार आहे या उपचारांना ?

अजून माहित नाही. ही शस्त्रक्रिया करायची ठरवली की ते सांगतील. बीजांड देऊ शकेल अशी स्त्री पण शोधायची आहे."

 

"वेड लागलाय तुला. त्या डॉ.चं काय ऐकतोस. डॉ. काय वाट्टेल ते सांगतात. म्हणून सगळंच त्यांचं ऐकायचं नसतं."

 

"आई अग डॉ. कशाला वाट्टेल ते सांगतील. मला कळत नाही तू असं का बोलते आहेस?"

 

"मी काही चुकीचं बोलत नाही. कशाला एवढा खर्च करायचा? तुला झेपणार आहे का? तुझी बायको नोकरी करत नाही तुझ्यावर किती बोझा पडेल याचा विचार केला का?' 

 

"माझी बायको! अग ती तुझी सून आहे. अनघा नाव आहे तिचं."

 

"असेल. तिच्या माहेरी तिच्या एका मावशील मुलाबाळच नाही तर दुसरीला किती वर्षांनी झालं. हे तुला माहिती आहे तरी एवढा पैसा खर्च करतोय. तिची पत्रिका बघितली असती न तर हे सगळं आधीच कळलं असतं. पण तू कुठे माझं ऐकतोस?" 

 

वैभवला काय बोलावंच सुचत नव्हतं. फोनमधून त्याला त्याच्या बाबांचा चढलेला आवाज ऐकायला आला,

 

"मालती तू काय बोलतेस ते कळतंय का? ठेव फोन त्यांच्या आयुष्याचे त्यांना निर्णय घेऊ दे. आपलं तोंड जरा गप्प ठेव. तुला तुझ्या मुलाला आणि सुनेला आशीर्वाद देता येत नसतील तर शाप तरी देऊ नको."

 

"तुम्ही आपली बडबड थांबवा. वैभव बाबांचं ऐकू नकोस."आईचा चिडका स्वर ऐकू आला. तेवढ्यात अनघा तिथे आलेली त्याच्या लक्षात आलं त्यानी फोन कट केला. 

 

त्याला फार वाईट वाटलं कारण अनघाचा चेहरा रडवेला झाला होता. आईचा परत-परत फोन येत होता पण वैभवनी घेतला नाही.

तो अनाघाजवळ आला. ती हातानी चेहरा लपवून हुंदके देत होती. वैभव हळूच तिच्याजवळ बसला. तिला म्हणाला,

 

"अनघा तू आईचं बोलणं मनावर घेऊ नको. तिचे विचार कसे आहेत तुंला माहिती आहे नं? आपण सगळे उपचार करायचे आहेत. आपल्या आयुष्यातील हा महत्वाचा निर्णय आपणच घ्यायचा आहे. आणि तो आपण घेतला आहे त्यामुळे बाकी लोक काय म्हणतात याकडे आपण लक्षं द्यायचं नाही. अगदी माझी आई असली तरी. कळलं."

 

वैभवला वाटलं आपण उगीच फोन स्पीकरवर ठेवला. फोन स्पीकरवर असल्यामुळेच आईचं बोलणं अनघाला कळलं. पण आपल्याला तरी कुठे माहिती होतं आई असं काही बोलेल. त्याक्षणी वैभवाला आपल्या आईचा प्रचंड राग आला. 

 

किती प्रयत्नांनी अनघा आता सकारात्मक्तेनी या उपचारांकडे बघतेय. आईच्या या कुचकट बोलण्यानी सगळ्यावर बोळा फिरवला. आता अनघानी जर आपलं पाउल मागे घेतलं तर कसं होईल. वैभवचं डोकं काम करेनासं झालं.

 

तो हळूच उठला आणि ऑफीसाला जाण्याची तयारी करू लागला. वैभव ऑफीसला जायची तयारी करतोय हे कळल्यावर अनघा चटकन उठली आणि खोलीबाहेर पडली. तिला जाताना पाठमोर बघितलं तसं वैभवचा जीव कासावीस झाला. लंचटाईम मध्ये आईशी जरा कडक भाषेतच बोलायला हवं हे वैभवच्या लक्षात आलं. तयार होऊन वैभव खोलीबाहेर पडला.

***

  

त्याला अनघा टेबलावर नाश्त्याची मांडा-मांड करतांना दिसली. तिची चाल हळू झाली होती. चेहराही उतरलेला होता. टेबलावर त्याचा डबा भरून ठेवलेला दिसला. त्याला उगीचच अपराधी वाटू लागलं. अनघाला मुल होत नाही हा तिचा एवढा मोठा अपराध आहे का? 

 

वैभव नी मनाशी पक्कं ठरवलं की अनघावर आईच्या बोलण्याचा परीणाम होऊ द्यायचा नाही. आईलाही चांगली समज द्यायची.

वैभव डबा घेऊन ऑफीसमध्ये निघाला पण आज त्यांची चाल पण मंदावली होती.अनघाकडे एकदा बघून बाय म्हणत वैभव घराबाहेर पडला.

(क्रमशः)


Rate this content
Log in