आईची माया कथिलाची
आईची माया कथिलाची
"आईची माया कथीलाची तर, बापाची माया लोखंडाची"
असा एक वाक्प्रचार आहे.
त्याचा अर्थ असा आईची माया ताबडतोब पाघळते , मुलाने कितीही गुन्हे केले असले, तरी जेव्हा तो शरण येतो, माफी मागतो, तेव्हा आईची माया तुरंत पाघळते.
"व्यंकटेश स्तोत्रात" म्हटलेले आहे.
"पुत्राचे सहस्त्र अपराध
माता काय मानी तयाचा खेद
तेवी तू कृपाळू गोविंद,
मायबाप मजलागी"
म्हणजे पुत्राने अनंता अपराध केले असले तरी, माय ते पोटात घालते. बऱ्याच वेळा मुलांच्या अपराधा वरती पांघरूण घालते.
पण त्याचादेखील अतिरेक झाला तर?
एक पारंपारिक वाचलेली गोष्ट आहे. एक मुलगा लहानपणापासून चोऱ्या करत असतो.
प्रथम घरातल्या घरात छोट्या चोऱ्या, मग वडिलांच्या खिशातील पैसे, पण आई त्याला सुधारणा सुधारणा करण्याऐवजी त्याच्या चूकां वरती पांघरुण घालत राहते.
मग तो हळूहळू नातेवाईकांच्या घरात काही तरी कारणाने गेला असता, येताना एखादी वस्तू घेऊन येत असतो.
आई, ती वस्तू" त्यांची त्यांना परत दे" असे सांगण्याऐवजी, ठेवून घेत राहते. नंतर तो भुरट्या चोऱ्या करू लागतो, आणि हळूहळू तो चांगलाच दरोडेखोर होतो.
त्या दरोड्या मध्ये त्याच्या हातून खून देखील होतात. आणि शेवटी तो एकदा पकडला जातो. तेव्हा त्याला फाशीची सजा होते.
त्याची शेवटची इच्छा विचारली असता, तो आईला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो, आणि जेव्हा आई त्याला भेटायला जाते तेव्हा, तो तिच्या नाकाचा कडकडून चावा घेतो आणि तुकडा काढतो.
तिच्या नाकाला जोरात चावतो, आणि सांगतो की, "ही आता तुला, कायमची आठवण राहील. "तेव्हाच लहानपणी मला चार फटके देऊन सुधारले असतेस,तर आज मी असा दरोडेखोर झालो नसतो. आणि आज मला फासावर जावे लागले नसते.
म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर ते चुकच होय.
तरीपण जर मुलाला काही झाले तर, आईचा जीव जास्त कळवळतो ही गोष्ट त्रिकालबाधित सत्य आहे.
मुलाला रागाने उपाशी ठेवले तर ,आईदेखील उपाशी राहते.
मुलाला काही लागलं तर, आपल्या पदर फाडून पटकन त्याच्यावरती पट्टी बांधणारी आईच असते.
एक लेक(मुलगी) एकदा दिल्या घरी नांदत नाही, आणि सासरचे लोक त्रास देतात म्हणून पुन्हा माहेरी येते. तेव्हा वडील सांगतात "एकदा दिली तिकडेच मेली" सासरच्या घरातून आता चार खांद्यावरच बाहेर पडायचं. असं पळून घरी यायचं नाही, तुला इथे ठेवून घेणार नाही.
मग ती खानदानाची इज्जत? आमचं नाक कापशील! वगैरे वगैरे.
पण आई मात्र मुलीला पाठिंबा देते. तिच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी वाचा फोडण्याचा प्रयत्न करते.
असंच अजून एक उदाहरण आहे आमचंच,
1966 किंवा 1967 सालचा चा भूकंप,
मी लहान, पाळण्यामध्ये, पाच सहा महिन्याची असेन. दुसरी बहीण पाच वर्षाची, आणि एकाएकी कडकडाट होत, संपूर्ण भूभाग हलू लागला .
वडिलांना समजले की भूकंप आहे.
ते शिलाई मशीन वर कपडे शिवता शिवता बाहेर पळाले.
मोठी बहीण नऊ वर्षाची, तीदेखील त्यांच्या मागे बाहेर पळाली.
पण आई मात्र एकटी बाहेर पडली नाही,
तिने पाळण्यातल्या मला उचलून घेतले, तसेच मधली बहिण झोपली होती, ती पाच वर्षाची होती, ती उठत नव्हती ,तिला तसेच एका हाताला धरून फरफटत ओढत आई बाहेर निघाली. रस्त्यात निघताना तिच्या डोक्याला दरवाजा लागला, तेव्हा ती जागी झाली आणि रडायला लागली, पण आईने आमच्या दोघींनाही सोडले नाही.
दोन्ही मुलींना घेऊनच घराच्या बाहेर पडली.
येथे वडीलांचे आमच्या वरती प्रेम नव्हते किंवा त्यांनी काही केले नाही असे नाही.
ते देखील भरपूर प्रेमळ होते, एरवी कित्येक गोष्टी आम्ही आईच्या ऐवजी वडिलांशी शेअर करीत असू.
परंतु ही नैसर्गिक वृत्ती असते. त्यामुळे
" आईची माया कथीलाची बापाची माया लोखंडाची"
ही म्हण मला पटली.
