उजाडल्या नंतरचं सपन भाग 1
उजाडल्या नंतरचं सपन भाग 1
तसं पाहीलं तर स्वप्नांचं आणि माझं नातं फार जुनं आहे. म्हणजे अगदी कळायला लागलेल्या वयापासूनच मी स्वप्नं पाहत आलेलो आहे. फक्त ती स्वप्नं वयानुसार बदलंत गेली. स्वप्नांचं स्वरूप माझ्या विचारानुरूप बदलंत गेलं. म्हणजे माझं आणि माझ्या स्वप्नांचं वय सारखंच!
तसा मी लहान पणापासूनच फार जिद्दी स्वभावाचा आहे असे मला ओळखणारे सर्वजण सांगतात. लहानपणी माझ्या मित्रांसोबत काचाच्या गोळ्या खेळायचो त्यावेळी माझी पहीली अट असायची. "हारी की पुरी" म्हणजे जोपर्यंत मी तुझ्या जवळच्या सर्व गोळ्या जिंकत नाही किंवा माझ्या जवळच्या सर्व गोळ्या हारत नाही तोपर्यंत खेळत राहायचे.
मग आमचा खेळ सुरू व्हायचा केंव्हा-केंव्हा सकाळपासून दुपारपर्यंत खेळ चालायचा. तहान भुकेचंही भान राहचं नाही. मग माझी आत्या मला शोधत यायची. तिलाही मी विनंती करून थांबवायचो, केंव्हा मित्राची आईही आलेली असायची. पण आम्ही खेळ थांबवायचो नाही.
माझ्या वर्गातील ज्ञानेश्वर नावाचा माझा एक मित्र होता. खूप हूशार. त्याला आम्ही नान्या म्हनायचो. त्याची अन माझी नेहमी वर्गात पहील्या नंबर साठी चढाओढ असायची. मग माझ्या आत्यांनी एक शक्कल लढविली. मी खेळत असतांना माझी आत्या बोलवायला आली की हळूच मला सांगायची नान्या अभ्यास करत आहे. तू खेळ म्हणजे यावर्षीही त्याचाच पहिला नंबर येणार. मग मी खेळणे थांबवायचो अन् अभ्यासाला लागायचो.
दहावीत तर मी अभ्यासाचा एव्हढा ध्यास घेतला होता की, रात्री सपनातही मला अभ्यास करत असल्याचा भास व्हायचा, मग मी कधी तरी बाजेवून उठून भितीवर काहीतरी लिहायचो. माझ्या घरच्यांच्या मनात तर भिती निर्माण झाली की पोरगं राञीचं उठून कुठंतरी जाणार तर नाही ना. मग माझे काका माझ्या पॅँटच्या लूप्सला दोरी बांधून स्वताच्या कमरेला बांधून झोपू लागले.
दहावीची परिक्षा जवळ आली तशी मी अभ्यासाचा सपाटा वाढवला. सराव परिक्षा संपली होती वर्गात सर्वात चांगले मार्क आले होते. अभ्यासाठी शाळेला सुट्या लागल्या होत्या. जीव लावून आभ्यास करत होतो, पण मनात धूकधुकी कायम होती.
दहावीचं परीक्षा सेंटर ईसापूरची शाळा आलं होतं.
परिक्षेच्या दोन दिवस अगोदर मित्रांसोबत जायला निघालो. ईसापूरला रूम केली होती. घर सोडून जायची पहीलीच वेळ त्यामुळे जरा गहीवरून आलं होतं. घरच्यांच्या व शेजार्यांच्या सर्वांच्या पाया पडलो व आम्ही सर्व जण आयुष्यातील पहिली चढाई सर करण्यासाठी ईसापूरचे दिशेने रवाना झालो.
परीक्षा सुरू झाली पहीला पेपर मराठीचा.अभ्यास ब-यापैकी झाला होता म्हणून पेपर सोपा वाटला. पण सविस्तर लीहीण्याच्या भानगडीत निबंधाला वेळ कमी उरला. मग काय? कवितेची सवय होतीच दहाच ओळीचा पण पूर्ण काव्यात्मक निबंध लिहून टाकला.
हळुहळू पेपर सरत होते. गाणिताचा पेपर थोडा अवघड आला. एकही प्रश्न ओळखीचा वाटत नव्हता. का कुणास ठावूक पण अंग थरथरायला लागलं होतं. हृदयाचे ठोके वाढले होते. काहीच सुचेना. दोन ग्लास पाणी पोटात टाकलं. पाच मिनीट शांत बसलो. राठोड सरांचे शब्द आठवले. पेपर कोरा सोडू नका!
प्रत्येक प्रश्नाला मिळतीजुळती रीत वापरून सोडवले. एकदोन प्रमेय पाठ केलेले होते ते लिहून काढले. सर्व प्रश्न सोडवले. इंग्लीशचा पेपरही जरा अवघड गेला अश्या रितीने सगळे पेपर संपले अन गाशा गुंडाळून घरी आलो. पण गणिताचा पेपर अवघड गेला होता. ते मनातून काहीकेल्या जात नव्हते. कशातंच मन लागत नव्हतं. गणितात फेल झाल्याचे स्वप्न पडायचे अन झोपेतून घाबरुन उठायचो. मी खूप स्वप्न पाहीलीत त्या दृष्टीने दहावीत चांगल्या मार्कानं पास होणं आवश्यक होतं. मला मोलमजूरी करत आयुष्य काढायचं नव्हतं. दिवस कटत होते रिझल्ट ची वाट पाहत होतो.
21 जून रिझल्ट चा दिवस उजाडला. आमच्या शाळेचा रिझल्ट पहीले पुसदला वासंतराव नाईक शाळेत बोर्डावर लागत होता व संध्याकाळी मस्के सर गॅझेट घेवून येत होते. त्यावेळी गावातल्या विद्यार्थ्यांना पाहायला मिळत होता. संध्याकाळ झाली तशी रिझल्टची वाट पाहणे सुरू झाले. मनात वेगवेगळ्या विचारांची कालवाकालव सुरू झाली.
फेल झाल्यावर नेमकं काय करायचं याचा विचार करत होतो. मस्के सरची चातकासारखी वाट पाहणं सुरू होतं. एक दोन वेळा फाट्यावर जावून आलो. पुसदवून येणार्या प्रत्येकाला रिझल्टबाबत विचारत होतो. पण त्यांना त्याच्याशी काही घेणंदेणं नव्हतं. त्यावेळी आजच्यासारखे मुबलक फोन अथवा मोबाईल नव्हते. आता मस्के सरची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.
संध्याकाळी साडेसहा वाजता मस्के सर रिझल्ट घेवून आल्याचं कळालं. तसा सरांच्या वाड्याकडे धावलो, पण रीझल्ट पाहण्यासाठी भरपूर गर्दी होती. गर्दीत घुसण्याचा प्रयत्न केला पण घुसता आलं नाही. कुणीतरी सांगत होतं गणितात पंधरा जण फेल झालेले आहेत म्हणून, माझ्या पायाखालची जमीन सरकली की काय असं मला वाटत होतं. मी गपकन खालीच बसलो. त्या फेल होणार्या पंधरात आपला नंबर आहे हे गृहीत धरून घरी नीघालो. घरी बौध्द वाड्यातील लोकांची भरपूर गर्दी जमलेली दिसली. आता आपली काही खैर नाही, असा विचार करून खाली मान घालून घरी गेलो. घरी येताच संदीप भाऊनं डायरेक्ट उचलूनच घेतलं व आत्यांनी तोंडात पेढा टाकला. काय झालं कळत नव्हतं. मग आत्यानं सांगितलं की मी पूर्ण शाळेतून पहीला आलो आहे. फक्त एक टक्क्याने सेंटर मधून पहीला येण्याचा मान हुकला. संदीप भाऊ पुसदहून अगोदरच माझा रिझल्ट पाहून आला होता. बौध्द वाड्यातील सर्व लोकांच्या चेह-यावर आनंद दिसत होता. घरच्यांच्या आनंदाला पारावार नव्हता तरीही डोळ्यात पाणी आलं होतं. आत्याच्या पायाला हात लावताच तिने मला कवटाळलं. मला मी घेतलेल्या मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.
नंतर मला राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती पूरस्कार मिळाला. त्या पाच हजार रूपयाच्या किमतीच्या चेक ची सर आज पाच लाखालाही येत नाही!
माझी बरीच सपनं ही उजाडल्यानंतर मी जागतेपणी पाहीलेली आहेत. काही झालं तरी माझं सपन मला शांत बसू देणार नाही. आयुष्यातील एक "चढाव" मी पार केला आहे. बाकीची लढाई अजून बाकीच आहे.
(.....क्रमश)
