तेव्हा तुझी आठवण येते
तेव्हा तुझी आठवण येते
मी रानोमाळ भटकते
दऱ्या डोंगरातून फिरते
पायवाटेवर भरगच्च बहरलेली
रानफुले खांदयांशी लगडतात
उंच उंच गवताचे पाते
गालावर टिचकी मारते
तेव्हा तुझी आठवण येते
वाऱ्याची अल्लड झुळूक
कपाळावरील बटांना
अलगद उडवते
नाजुक रंगीत फुलपाखरू
खांदयावर हात ठेवते
अलगद हृदय उलगडते
तेव्हा तुझी आठवण येते
क्षितिजापाशी सूर्य
पाऊलखुणा सोडतो
अंधारतो काळोख अन्
झोंबतो गार वारा
अंगावर येतो शहारा
तेव्हा तुझी आठवण येते

