स्वयंप्रकाशी तू तारा
स्वयंप्रकाशी तू तारा
समोर एक आरसा असावा
बघून आपल्याकडे त्याने हसावं
पिकलेल्या हशाने लपवावे आसवं
आणि मग प्रतिमेच्या प्रेमात पडावं
विचारावे तिच्या मनीचे गुज
आणि बघून तिचा मूड
जाणून घ्यावे तिच्याकडून
तिच्या लाघवीपणाचे गूढ
आपलीच ती प्रतिमा !
तिचा लाघवीपणाही आपलाच !
मग घेऊन तिच्या अंतरंगाचा ठाव
हिंडून बघावा आपल्या मनाचा गाव
गावात असतील अनेक गोष्टी
अमर्याद आठवणींची टुमदार घरे
कुठे गमती-जमतीची झाडे
तर कुठे रुसाव्या-फुगव्यांची कुरणे
ठोठावून बघावे एखादे दार
सुख-दुःखाच्या अनेक क्षणांना
मग पुन्हा येईल उधाण
बघावे की होऊन त्यांच्यात रममाण !
जुळता आपले या गावाशी सूत
लपवलेल्या आसवांचं
लगेच उकलेल सारे गूढ
अन् जीवनाला सापडेल नवा सूर
हिंडून होईल जेव्हा मनाचा गाव सारा
आसवांनी केला असेल पोबारा
आणि मग आरसाच सांगेल आपल्याला
तू तर आहेस स्वयंप्रकाशित तारा !!
