भिंत
भिंत
गोष्ट ही बाराव्या शतकातली
सातशे वर्षांपूर्वी घडलेली
आपेगावच्या कुलकर्ण्यांची
होती चार लेकुरे गोजिरी
थोरला भाऊ निवृत्ती
मग ज्ञानेश्वर आणि सोपान
बहिण चौथी होती सान
नाव तिचे मुक्ताई
संन्याशाची पोरे म्हणुनी
जरी गाव त्यांना हिणवी
चारी भावंडे मात्र होती
चार भांडारे ज्ञानाची
आपल्या ज्ञानाची प्रचिती
त्यांनी वेळोवेळी दिली
नारायणरुपी या नरांची
ख्याती मग सर्वत्र पसरली
झाले एकदा काय पहा
चित्त सावध करून ऐका
चांगदेव ऋषींनी धाडला
कागद कोरा ज्ञानदेवांना
जरी दिसती चिरंजीव ज्ञानदेव
तरी ज्ञानाचे होते ते तीर्थरूप
मग काय म्हणावे पत्रात
हे न उमगले चांगदेवास
गुरू न केल्याने राहिला
चांगदेव चौदाशे वर्षे कोरा
याचाच जणू प्रत्यय आला
म्हणून कागद कोरा धाडला
करून वाहन वाघाचे अन्
हाती घेऊन चाबूक सर्पाचे
केले मग प्रस्थान चांगदेवे
प्रयोजून दर्शन ज्ञानोबांचे
चारी भावंडे त्या वेळी
बसली होती माझ्या शिरी
चार अनमोल रत्नांचा
मुकुटच जणू मी होते ल्याली !
आला जेव्हा सांगावा
शिष्याकडून चांगदेवांचा
नम्रपणे म्हणाले ज्ञानदेव मला
चल जाऊ आपण दर्शनाला
दगड मातीचा देह माझा
मला न चालणे ठाऊक
ज्ञानोबाच्या वाणीने पण
पडू लागले पाऊल
गेले घेऊन मी चौघांना
दर्शन द्याया चांगदेवा
लोक करू लागले अचंबा
पाहून चालताना मला
संत कृपेची सांगा आता
वर्णू अजून काय कथा
जन्मच सफल झाला माझा
भिंत म्हणून जरी मिळाली काया !!
