स्वप्ने : अशी, तशी
स्वप्ने : अशी, तशी
धगधगत्या मनीच्या चुलीवर स्वादिष्ट पक्वान्ने शिजतात,
खमंग-खरमरीत भाजून निघतात अन् विरून जातात.
मिट्ट काळोखाच्या आधारे काही बेधडक स्वप्ने प्रवेश करू इच्छितात,
रात्रीच्या गर्भात रूजू पाहतात, सकाळच्या किरणांनिशी चालती होतात.
छिन्नविछिन्न विस्कटलेल्या विचारांवर आकांक्षेची पालवी फुटते,
पांगळ्या, अक्षम मनाच्या ओझ्याखाली दडपली जाते.
तेवत ठेवलेल्या आवेशांवर पुन्हा एकदा ठिणगी पडते,
कुरवाळलेल्या वस्तुस्थितीच्या बचावात्मक राड्याखाली विझून जाते.
रेंगाळलेल्या रखरखीत दुपारी अचानक पावसाची सर येते,
उदासीन आत्म्याला झुलवून गंधाळलेल्या भूतकाळात न्हाऊन टाकते.
गोठलेल्या मानसिकतेला डावलून मग, काही निरागस स्वप्ने पाझरतात,
इशितेचे रंग उधळून, तिलस्मी तेजासवे उजळून निघतात.
पुन्हा उद्याची नवी स्वप्ने घेऊन नवी रात्र अवतरते,
अल्पशी ताकद, भरपूर आशा, अन् थोडे धाडस देऊन प्रकाशात परावर्तित होते.