आत्मनाद...
आत्मनाद...


क्षणात सुचले काही, ओठावर आले काही
आठवणींच्या पाचोळ्यातून, मनात फुलले काही
पुसटशा त्या चारच ओळी, अस्पष्ट गणिते काळाची
वेलीवरल्या दवासारखे, अलगद टिपले काही
मनीच्या त्या छुप्या कोशी दडविलेले काही
पाण्यापरी उन्मत्तपणे, उचंबळून आले काही
जुन्या खिळखिळ्या दुर्बल माला, निसटून आल्या हाती
अबोल, नि:शब्द असे काहीसे, सांगून गेल्या कानी
शब्दातीत, अगतिक, नि:श्चल, मनास भिडले काही
पापण्यांच्या कोंदणांतून, अनाहूत वदले काही
जुने–पुराणे फोल ध्यास, उन्मळून पडले काही
नवी प्रचिती, नवीच नीती, मांडून गेले दारी
कोमल, नाजूक परी ज्वलंत, बहरून आले काही
शब्दामधुनी ओघळले अन्, पानावर जडले काही