ती कविता..
ती कविता..


आज एका कवितेला काही वर्षे पूर्ण झाली
कवितेच्या ओळींनी पंचविशी गाठली
विरलेल्या पिवळट कागदावर शब्दांची पुसटशी वळणे
लांबसडक वेणीवर जसे फुलांचे माळणे
तिच्यासोबत मीही वयस्क झाले
कोपऱ्यातल्या तारखेने थोडी अस्वस्थ झाले
काळानुरूप जगण्याचे अर्थ आता बदलले
कविता मात्र तटस्थ, तिचे आधीच ठरलेले
तिच्याबरोबर मग मीच लहान व्हायचे ठरवले
शब्दांबरोबर अलगद तरंगावेसे वाटले
सहजच कवितेला समजून घ्यावे म्हटले
वयानुरूपच सारे अर्थ लावून टाकले
वयस्क झाली तरीही तिचे वय वाढले नव्हते
बालपण तिने अगदी अचूक जपले होते
मला मात्र मग कसेसेच वाटले
आपणच का बरं लहानपण हरवले?
तिचे ते निरागस मन चोरावेसे वाटले
आपणहून तिच्या प्रवाहात वाहू पाहिले
मी मात्र खूप बदलले होते
कवितेची ती मी आता अनोळखी होते
आजच्या मला शोधायचे तेव्हा मी ठरवले
हळूहळू का होईना परत लिहू लागले
चुकून एकदा मग एक काव्य स्फुरले
शब्दांच्या वळणांवर भाळले अन् पुन्हा प्रेमात पडले