द्वंद्व
द्वंद्व
परवा एका फुलपाखराला विचारलं मी झोकात, “घेऊ का रे झेप आकाशात?”
तर म्हणालं, “नको. राहू दे सध्या. बळ नाही तुझ्या पंखांत.”
मग मी ही पडले विचारात, “खरंच का? एवढीही कुवत नाही माझ्यात?”
मग म्हणालं, “कुवत आहे, पण हिम्मत नाही तुझ्यात.”
दुसरं, थोडं वेडं फुलपाखरु मधे पडलं तेवढ्यात,
म्हणालं, “कुवत आणि हिम्मत दोन्ही आहे तुझ्याच मनात.”
मग मी ही म्हणाले हसत, “तसं असतं, तर बसून का राहिले असते घरात!”.
तर वेडं मला विचारतं कसं, “नक्की जायचं आहे ना तुला दूर देशात?”.
मी फक्त मान डोलावली, पण स्तब्ध झाले क्षणात.
पहिलं फुलपाखरु मधेच
कडमडलं तेवढ्यात,
“अन् पडलीस तर? त्यापेक्षा चालू दे ना जे चाललंय ते आयुष्यात!”.
मग मी ही धास्तावले, विचार आला, “खरंच की! सगळंच तर मस्त आहे आपल्या या इवल्याशा जगात!”.
त्यावर वेडं फुलपाखरु म्हणालं,
“मग का खातोय तुला हा विचार? स्वैर उडायचंय गगनात, पण मन अडकलंय पाशांत”,
“अन् पडलीसंच, तर पुन्हा सावरशील काही काळात!”.
मी स्व-मग्न झाले, “अडकलीये का मी नसत्या स्व-कृत बंधनांत? रूतलीये वाटतं मी काल्पनिक जाळ्यात..”.
थोड्या वेळानी वेडं म्हणालं, “का पडलीयेस एवढी विचारांत? लाव नं बाजी स्वत:वर बिनधास्त..”,
“घे खुशाल भरारी एका श्वासात..”