सुई-धागा (अष्टाक्षरी)
सुई-धागा (अष्टाक्षरी)
माता रमा होती सुई,
भीमराव तिचा धागा।
झोपलेल्या समाजाला
केले शिक्षणाने जागा।।
माथी अस्पृश्य जीवन,
जाती धर्माचे ठिगळ
एकमेकांस जोडले,
सुई धाग्याने सगळं।।
होता फाटका संसार,
नाही अपेक्षा मांडली।
जाई धागा परदेशी,
सुई सासरी नांदली।।
साथ होती पदोपदी,
बहुजनाच्या उद्धारा।
ना रुसले धाग्यावर,
प्रथम राष्ट्र सुधारा।।
भीमरायाची सावली,
फार चटके भोगले।
करण्या देशात क्रांती,
सोबत दिली धाग्याले।।
या अथांग सागराला,
जोड रमाई थेंबाची।
विश्वरत्न होण्यासाठी,
स्मरण करू त्यागाची।।
ज्ञानी भिमाच्या यशाला,
जोड रमाची करणी।
सुई धाग्याची कहाणी,
ऐकून डोयाला पाणी।।