स्त्री सन्मान
स्त्री सन्मान


स्त्री जन्माचे सार, जाणून घेऊ खरोखर।
तिच्या गुण-कर्तृत्वाचे, करूया रे सत्कार।।धृ।।
कुणाची ती लेक-माता,
कुणाची ती मामी-आत्या।
कुणाची ती काकू-वहिनी,
कुणाची ती मैत्रिण-सजणी
असा तिच्या बहु नात्याने, फुलते रे दोन्ही घर।।१।।
तिचे रूपे लक्ष्मी-जिजाई,
कधी बनते सावित्री-रमाई।
कधी बनते अहिल्या-माई,
कधी बते येसू-ताराई।
यांच्या संस्काराने घडले, पुरूष महात्मे थोर।।२।।
कधी तिला सासुरवास,
कधी भोगतो वनवास।
चालविता संसार गाडा,
उसंत मिळे ना थोडा।
उणीव भासू देत ना कुणा, कष्ट तिच्या माथी फार।।३।।
होई कधी रुसवे-फगवे,
परि आपुल्या पदरी हसवे।
करी सर्वां माया सारी,
विश्व निर्माण तिच्या उदरी
करा सन्मान स्त्री जन्माचा, करू नका अत्याचार।।४।।