स्त्री शक्तीचा जागर आहे !
स्त्री शक्तीचा जागर आहे !
आदिशक्ती तू वाग्विलासनी
उघड तुझे नेत्र
बघ तरी कुठे दिसते का
स्त्रीशक्तीचे क्षेत्र ..
मनोभावे पूजा मांडून
आज भरली घागर आहे
महिला दिनी तरी एक दिवस
स्त्रीशक्तीचा जागर आहे ....!
स्त्रीयांसाठीच आहे
जागा इथे राखीव
तरीही तिचे जीवन
बनले आहे आखीव
राजकारणातही स्त्रियांच्या नावे
पुरुषांचाच वावर आहे
महिला दिनी तरी एक दिवस
स्त्रीशक्तीचा जागर आहे ....!
उन्हातान्हात राबराबुन
थकून भागून येते घरी
ऊन ऊन दोन घास
घरंच्यासाठी करते खरी
उरलं सुरलं तिच्या वाट्याला
रोजचीच शिळी भाकर आहे
महिला दिनी तरी एक दिवस
स्त्रीशक्तीचा जागर आहे ....!
लाज बाळगा रे वासनांध नराधमांनो
अशा कशा भावना थिजून गेल्या
कित्येक निर्भयाच्या मूक किंकाळय़ा
मनामनाला चिरून गेल्या
तुमच्या मनात स्त्रियांसाठी
सांगा कुठे आदर आहे
महिला दिनी तरी एक दिवस
स्त्रीशक्तीचा जागर आहे ....!
मुलगा म्हणे दीप वंशाचा
उजळणार आहे घराला
मुलगी आहे जीव अंशाचा
तरी घोट तिच्या नरडीला
मुलीच्या जन्मासाठी पुन्हा एकदा
तिच्याच माथी खापर आहे
महिला दिनी तरी एक दिवस
स्त्रीशक्तीचा जागर आहे ....!
