सर्व शक्तिमान तू
सर्व शक्तिमान तू
सर्वशक्तिमान तू ठेव स्वाभिमान तू
तुझ्याविना हे जग नाही ठेव याचे भान तू
घेऊन श्वास मोकळा झेप गगनात घे
ताठ उभी राहुनी कर संचालन तू
जन्म गेला संकटात, भूतकाळही काट्यात
स्वीकार तुझे अस्तित्व घेउ नको माघार तू
कन्या, पत्नी, माय, बहीण शब्द अभिमानाचे
जननी संसाराची सृष्टी सर्जनहार तू
नारायणी बनुन, जगाची दृष्टी बदल ग
यापुढेही कर प्रयाण विश्व जिंकणार तू.
संसारात छाप तुझी निरनिराळी गावते
कार्यक्षेत्रात ही मनामनाला भाव तू
तुच्छतेचे सोंग आता ओढू नको अंगी
बदल तुझा इतिहास, त्या साठी धाव तू
ठेच जरी लागते , रक्त जरी सांडले
अश्रू गिळुन दुःखाचे कर पुढे प्रयाण तू
स्वप्नात काय ठेवले, आत्मनिश्चय ही खरा
जीवन तुझे एकटीचे, घेऊ नको उधार तू
