सैनिकाचा संदेश
सैनिकाचा संदेश
नका सांगू तिला कोणी इथे युद्धात आहे मी
जरा सांगा तिला आता तिच्या प्रेमात आहे मी
कशी गोळी मला गेली इथे स्पर्शून कानाला
तरी आता तिच्यासाठी किती हर्षात आहे मी
दिली मी आहुती आहे जरी माझ्याच प्रेमाची
लढाई देश प्रेमाची लढाया जात आहे मी
कसा मी पूर पाहू तो तुझ्या नेत्रात अश्रूंचा
तुझ्या वाहून जाणाऱ्या मुक्या थेंबात आहे मी
कसे सांगू तुला राणी इथे वर्षाव गोळ्यांचा
खुनी सैतान शत्रूंच्या उभा दारात आहे मी
जरी पेटून गेलो मी सखी आगीत ज्वालांनी
पहा तू आरशामध्ये तुझ्या डोळ्यात आहे मी
तिला सांगा जरी गेली मला भेदून गोळीही
तुला हसवून जाणाऱ्या तुझ्या स्वप्नात आहे मी
