साथ
साथ
गर्जणार्या सागराला वादळांची साथ आहे
चातकाला पावसाच्या कल्पनांची साथ आहे
रान आहे पेटलेले अंग माझे पोळलेले
चालतांना तापलेल्या कोळश्यांची साथ आहे
काळरात्री सोबतीला सावलीही आज नाही
सूर्य नाही चंद्र नाही काजव्यांची साथ आहे
कंठ आहे दाटलेला जीवनाला गात आहे
वादकांची ना सुरांची हुंदक्यांची साथ आहे
बाभळीच्या सावलीने झाकलेले विश्व माझे
ना फुलांची ना फळांची कंटकांची साथ आहे
