रंग
रंग
तर्हे तर्हेचे रंग लागुनी अवघे मलिन झाले ।।
पांडुरंगाचा रंग लाभता जीवन सुखात न्हाले ।।धृ।।
अहंपणाचा रंग नेहमी माथ्यावर चढून बसतो ।
मी केल्याचा गर्व माणसा अंतर्यामी ठसतो ।।
शक्ती नाही अमुची, अंतरी वसतो ईश्वर कळले ।।१।।
मायेचा बाजार भोवती, मोहाचा रंग न्यारा ।
कवडी दमडी पैसा अडका जीवास लागे प्यारा ।।
परलोकाच्या मार्गी लागता काही न संगे आले ।।२।।
क्रोधाचा तर रंग भयंकर नाश जीवाचा करतो ।
क्षण क्रोधाचा आयुष्याचा सदैव अंतिम ठरतो ।।
ओळखले हे ज्यांनी त्यांचे जीवन रसमय झाले ।।३।।