रात्रीचा सूर्य
रात्रीचा सूर्य
काळा मिट्ट काळोख,
दूरवर दिसे नभात चांदणे,
मध्ये पसरलेला अव्याप्त सागर,
बस आणि खुप शांतता....
खोलवर रुजली का रुतली ती शांतता?
हळूहळू झिरपले ते शांत क्षण,
मनाच्या प्रत्येक पाकळ्या मध्ये,
आणि मलाच माझे उमगले,समजले...
असावे असे आसमंत,काळोख,शांतता,
बरी असते ती..खूप काही सांगते,
एरवी कुठे असतो तो वेळ आणि आपणही...
कधीतरी स्वतः ला स्वतः समजून घ्यावे,
निवांत बसावे,मनाशी बोलावे,
बरे असते ....
काहीतरी हरवते,काहीतरी गवसते,
कदाचित अंधारातच असते का प्रकाशाचे उत्तर?
माहीत नाही,बहुदा जगण्याने तयार झालेले कोडे..
सुटत असावे की अंधारात,उद्या येणाऱ्या दुसऱ्या दिवशी ...
वाटे खूप एकजीव होऊन जावे ,
ह्या रात्रीचाच एक भाग बनावे,
बस एक क्षण तरी थांबावे,मिसळून जावे...
काळया ह्या रंगात विरघळून जावे,
नक्की मग सापडेल का मला ते शुभ्र उत्तर...??
वाट पाहते मी अंधाऱ्या रात्री,समुद्रकिनारी...
वाट पाहते मी रात्रीच्या चांदण्या सोबत,
वाट पाहते मी त्या नव्या दिवसाची आणि नव्या सूर्याची...
