प्रथम नमन करुं गणनाथा
प्रथम नमन करुं गणनाथा
प्रथम नमन करुं गणनाथा । उमाशंकराचिया सुता ।
चरणावरी ठेवूनि माथा । साष्टांगीं आंता दंडवत ॥१॥
दुसरी वंदूं सारजा । जे चतुराननाची आत्मजा ।
वाक् सिध्दी पाविजे सहजा । तिच्या चरणवोजा दंडवत ॥२॥
आता वंदू देवब्राह्मण । ज्याचेनि पुण्यपावन ।
प्रसन्न होऊनि श्रोतेजन । त्यां माझें नमन दंडवत ॥३॥
आता वंदू साधू सज्जन । रात्रंदिवस हरिचे ध्यान ।
विठ्ठल नाम उच्चारिती जन । त्यां माझे नमन दंडवत ॥४॥
आतां नमूं रंगभूमिका । किर्तनीं उभे होती लोकां ।
टाळ मृदंग श्रोते देखा । त्यां माझें दंडवत ॥५॥
ऎसें नमन करोनि सकळां । हरिकथा बोले बोबड्या बोला ।
अज्ञान म्हणोनि आपल्या बाळा । चालवी सकळा नामा म्हणे ॥६॥
