प्रिये तुला
प्रिये तुला
असे कसे सुने सुने जगायचे प्रिये तुला
दिव्या परी तमा मधे जळायचे प्रिये तुला
उन्हात पावसात वादळात कातळात मी
कशास कोरड्या जगी फुलायचे प्रिये तुला
मला असेल ठाव फक्त धून वादळातली
कशास प्रेम गीत हे म्हणायचे प्रिये तुला
लबाड हे नशीब खेळते लपाछपी किती
कशास भाग्य जाळुनी बघायचे प्रिये तुला
गुलाब साथ देत कंटकास राहतो कसा
कशास कंटकासवे रमायचे प्रिये तुला