प्रेमकैदी
प्रेमकैदी
विसरून या जगाला, प्रेमात जी बुडाली
तो काळ वेगळा अन्, ती माणसे निराळी
सार्या दुजा क्षणांचे, तुजला किती उमाळे
अन् माझिया क्षणांच्या, वाट्यांस का उधारी
तो मद्यपी सुखी रे, त्याचाच कैफ त्याला
मी जहर प्राशिले पण, मजला तरी हुशारी
मी श्वास घेतले जे, ते ही तुझेच होते
मग दुःख कोणते हे, सलते उरी दुधारी
या गूढ बंधनांचे, तोडून पाश सारे
बंदिस्त प्रेमकैदी, झाले कुठे फरारी
हात सुटले परंतु, झालो कुठे निराळे
ये सोबती सये तू, घेऊ पुन्हा भरारी

