प्रेमा तुझा रंग कसा
प्रेमा तुझा रंग कसा
मीच विचारले प्रेमाला
प्रेमा तुझा रंग कसा
एकरंग एकरूप
अंतरात विलीन जसा।।
अडीच अक्षरे प्रेमाची
करती किमया स्नेहाची
प्रेमाचे अंतरंग रंगता
खुलते रंगत जीवनाची।।
प्रेम चेतना प्रेम चैतन्य
प्रेमाविना भासे जग शून्य
प्रेमप्रीतीच्या पर्जन्याने
अवघे जीवन होते धन्य।।
वर्णू काय प्रेमाचा महिमा
उदात्त प्रेमा नसे उपमा
प्रणयी युग्मा नित्य भासतो
क्षण प्रेमाचा सुखद पौर्णिमा।।
हृदयामध्ये प्रेम उमलते
डोळ्यांमधूनी प्रेम खुलते
दोन मनाच्या जुळत्या गाठी
अधरामधुनी प्रेम बोलते।।
सागर सरीता संगमातून
लाट उसळते प्रेमाची
प्रेमाच्या अंतरंग हे संजीवन
खरी देणगी देवाची।।

