प्रेम करायचं राहूनच गेलं
प्रेम करायचं राहूनच गेलं


बालपणही गेलं आणि तरुणपण ही गेलं
पण कधी व्यक्त होता आलंच नाही ,
आपल्याच प्रिय व्यक्तीवर प्रेम करायचं राहूनच गेलं
कारण मनाची आणि हृदयाची सांगड कधी जुळलीच नाही II
समोर होती तू परंतु शब्दांचा ठेवा सापडलाच नाही
कारण नक्की प्रेम म्हणजे काय हे कळलंच नाही ,
एकांतात असतांना आठवण व्हायची तुझी वारंवार
परंतु मनाला कधी भेटीसाठी समजावलेच नाही II
विरहाचा खेळ खेळत राहिलो
पण प्रीतीचे दोन शब्द ओठांवर येऊ दिलेच नाही ,
मनाचे कोरे पान कायम कोरेच राहिले
पेनातली शाई सपंली तरी पण लिहायचे राहूनच गेले II
स्वप्नात तू कायम भेटत राहिली
परंतु मिलनाची दरवाजे मात्र कायम बंदच राहिले ,
चांदण्या रात्री आकाशातील चमकणारे तारे कायम पाहिले
पण हळुवार बोचऱ्या वाऱ्यावर एकमेकांना स्पर्श करायचे राहूनच गेले II
बंधनातील नात्याची गाठ सोडवता आली नाही
परंतु आपल्यातील नात्याला नावंही कधी देता आले नाही ,
आवडीचे गाणे गाताना चेहऱ्यावर विरहाचे भावही दिसले
पण डोळ्यांतील आसवांना रुमालानी टिपताही आले नाही II
अधूनमधून नजरेला नजर भिडवत राहिलो
परंतु नजरेतले भाव कधी हृदयातून बाहेर आलेच नाही ,
कायम हासऱ्या चेहऱ्याची छटा मनांत घर करून राहिली
परंतु कधीही अश्रूंना मोकळी वाट करून देता आली नाही II
तुझ्या आठवणीने रात्रीचा स्वप्नांत सजवला एक गाव
परंतु भासते नेहमी विरह सागरात हरवलेली एक नाव ,
आयुष्याच्या प्रवासात अनेक चेहऱ्यांना सामोरे गेलो
परंतु एकही चेहरा कायमचा ओळखू शकलोच नाही II
अजूनही आणतो अंगावर शहारे तो नदीकाठचा थंड वारा
निळ्याभोर आकाशात उत्तरेला दिसतो रुसलेला शुक्र तारा ,
निरपेक्ष प्रेम हे काय असते कधी समजलेच नाही
स्वतःसाठी कधी तर तुझ्यासाठी जगायचं जमलंच नाही II
हृदयाच्या स्पदंनाची साथ कधी सहज सुटली नाही
मात्र तुझ्या सौंदर्याच कौतुक करायचं राहूनच गेलं ,
बंधनाचा उंबराही कधी ओलांडता आला नाही
परंतु एकमेकांवरचं प्रेम एकमेकांना सांगायचं राहूनच गेलं II