पोरगा बापाला सांभाळत नाही
पोरगा बापाला सांभाळत नाही
जन्मदात्या बापाला विसरून
पोरगा रमला प्रपंचात
सुखी पाहून पोराला
बाप दिमाखात फिरू लागला
पण पोरगा बापाचे उपकार विसरून
पैशाला प्रिय झाला
बापाला खायला हल्ली वेळेवर मिळत नाही
बापाची अवस्था पाहून
मन पोराचे जळत नाही
पोरगा बापाला सांभाळत नाही
बापाने पोराला खेळवले खांद्यावर
दिनरात एक करून
शाळा शिकविली, साहेबही बनवलं
पोरगं म्हणतंय,
बापाने माह्यासाठी काय केलं?
आसऱ्यासाठी बाप फिरतोय दारोदारी
बापाला स्वतःच्या घरात प्रवेश द्यायला
पोराचे मन बापाकडे वळत नाही
पोरगा बापाला सांभाळत नाही
बाप होता, म्हणून पोरगा आहे
बापाने भोगलेलं दुःख
पोराच्या हिश्श्याला जाऊ नये म्हणून
बापानं
रखरखतं ऊन,
कडाक्याची थंडी,
मुसळधार पाऊस
भूकंप अन् वादळे
यांना पोटात गिळून
सुख पोराच्या ओंजळीत टाकले
पोराला बापाचे महत्त्व कळत नाही
पोरगा बापाला सांभाळत नाही
बापाला राहायला घर नाही
तो कुठे झोपतो
तो काय खातो
तो जिवंत आहे की मृत
याचाही पोरगा शोध घेत नाही
बापासाठी पोराचे रक्त सळसळत नाही
पोरगा बापाला सांभाळत नाही
खडकाळ प्रवासानंतरही
बापाच्या मनात
पोराविषयी आसक्ती आहे
बाप आहे तो
पोराला कुणी बोललेलं
आजही त्याला खपत नाही
कर्त्यव्याच दळण
पोरगा काही दळत नाही
पोरगा बापाला सांभाळत नाही
