पहिला पाऊस
पहिला पाऊस
कोसळून गेलेल्या पहिल्या पावसाचे काही उत्कट थेंब,
परसदारी तुझी वाट पहाणा-या माझ्या कायेवर ओघळू लागले की
तुझं अस्तित्वही जाणवायला लागतं;
केशसंभाराच्या आभाळातील लालिम सिंदूरी भांगापासून
पावलातल्या मासोळीपर्यंत.
अन् माझे हात चाचपडू लागतात,
अंगांगावर पसरलेल्या...
फक्त तुझ्याच जाणिवा....
विलग होऊ लागतात धागे मनाच्या कुपीत मुश्किलीने दडवलेल्या
पहिल्या पावसाच्या गोड गुपितांचे
डोळ्यांच्या पाणावत जाणा-या कडांपासून......
अन् विरहाचा खारट पाऊस मात्र बरसत रहातो डोळ्यांतून माझ्या तनमनावर......
तुला आठवतो का रे तो आपण जगलेला;
पहिला उच्छृंखल पाऊस अन् ती ओलेती भेट ?...
जिने आपल्याला समर्पणाचा खरा अर्थ शिकवला....
तुझ्या विलंबाने आलेला रूसवा-फुगवा....,
त्या सरीने क्षणार्धात...
विरघळवला रे.......
खट्याळ शलाकेच्या आवाजाला घाबरून...., .....
नकळत मी तुला मिठीच मारली...
अन् मग उरलो एकमेकांच्या कुशीत घट्ट बिलगून दोघे आपण......
असं वाटलं, .....
आकाशीच्या सा-या शलाका;
त्या घट्ट मिठीत एकवटल्या आहेत
ओल्या केसातील मदनबाणाच्या गंधात मिलनाचा मधूर रंग मिसळला;
अन् तो पहिला पाऊस तनामनाच्या धरतीला मोहरवून गेला.
येईल का रे ?.......
पुन्हा एकदा तुला घेऊन;.....
तोच तो ......
पहिला..... पाऊस??......
