पहाडी माणूस : सात रस्त्यांचा
पहाडी माणूस : सात रस्त्यांचा
राजाराम भापकर एक नाव
त्यांना ओळखते सारे गुंडेगाव
केला डोंगर फोडून घाटरस्ता
सात नव्या रस्त्यांनी जोडले गाव
जावे तालुक्याला वळसा घालून
पायी चाळीस किमी तुडवायचे
अर्ज खरडले किती ह्या रस्त्याला
अशी योजनाच नाही सांगायचे
जिद्द रस्त्याची घेईनाच माघार
गोळा केले समंजस गावकरी
रस्ता करू मेहनतीने तयार
केली सूचना जाऊन घरोघरी
गुरूजींचे शब्द ठरले प्रेरक
करू उद्याच कामास सुरूवात
राबणार नाही फुकट कोणी
कुणी श्रमदान करू इच्छितात
नाही केला विचारही वेतनाचा
केले चिंतन दिली सोडून चिंता
जरी असूनही पेशाने शिक्षक
जणू दिसे ध्यानीमनी घाटरस्ता
राजमार्ग भापकर गुरूजींचा
एक आरोळीच जनतेने दिली
तेहत्तीस वर्षे खर्ची घातलेली
दोन आसवे गुरूजींनी पुसली
