ओवीबद्ध चरित्र :संत चिंतामणी
ओवीबद्ध चरित्र :संत चिंतामणी
मोरया गोसावी थेऊरासी | गणेश देई दृष्टांतासी |
तुझ्या वंशी जन्मासी | येतो पुत्र म्हणोनिया ||१ ||
वचन हे चिंतामणीचे | भाग्य थोर गोसावींचे |
'चिंतामणी' नांव पुत्राचे | ठेविती मोरया गोसावी ||२ ||
हैबतखान चाकणचा | नैवेद्य मद्य मांसाचा |
होई प्रसाद दूध फळाचा | चमत्कार करी चिंतामणी ||३ ||
एक निपुत्रिक ब्राह्मण | तळेगावातून येऊन |
आम्रफल त्यासी देऊन | पुत्र देती चिंतामणी ||४||
गवंजेकर नामे भक्त | गणेश दर्शनासी जात |
यवन अधिकारी डांबत | तुरुंगात तयासी ||५||
चिंतामणी सुटका करिती | भक्तासी दर्शन देती |
गुप्तपणे कार्य साधती | अचंबित होती यवन ||६||
चिंतामणीभक्ताचे गलबत | वादळी सापडत |
भक्त धांवा करित | चिंतामणी महाराजांचा ||७||
पंगतीत असती चिंतामणी | अदृश्य होती झणी |
गलबतात न शिरे पाणी | वाचती प्राण भक्ताचे ||८||
पंगतीत येऊन बसले | अंग पाण्याने भिजले |
भक्तांनी तयांसी पाहिले | चमत्कार चिंतामणींचा ||९||
श्रीविष्णू शिवशंकर | धरिती वेष फकीर |
भिक्षापात्र घेऊन कर || पातले मोरया समाधी दिनी ||१०||
चिंतामणी त्यांना ओळखून | भिक्षा देण्या जाती धांवून |
ब्राह्मणांआधी फकिरांसी भोजन | दिले म्हणून विप्र कोपती ||११||
अनगडशहा बाबा | भिक्षा मागी घेऊन तुंबा |
सर्वांसी वाटे अचंबा | धान्य भरूनी न भरे तुंबा ||१२||
चिंतामणी जाणती | गजानन म्हणून दुर्वा टाकती |
तुंबा धान्याने भरती | गर्वहरण होई बाबाचे ||१३||
दरिद्री विप्र येई चिंचवडास | चिंतामणी देती प्रसादास |
मूठभर डाळ उपरण्यास | प्रसाद घेऊन बांधी तो ||१४ ||
निराश होवोनी परतत | वाटेत एक नदी दिसत |
डाळ पाण्यात सोडत | जाई स्वगृहासी तो ||१५||
झटके तो उपरणे | पडती डाळीचे पाच दाणे |
त्याचे होई सोने | जाई दारिद्र्य विप्राचे ||१६||
तुकोबा येता चिंचवडास | भोजनी बसविती विठ्ठलास |
वदती चिंतामणींस | आवहन करा गणेशाचे ||१७||
तेव्हा घडे आक्रीत | सोंड येई कपाळात |
गणेशरूप प्राप्त होत | चिंतामणी महाराजांना ||१८||
' देव' वदती तुकाराम | तेंचि होतसे कुलनाम |
असे चिंचवड ग्राम | तीर्थक्षेत्र पवित्र ||१९||
पौष वद्य चतुर्थीला | सोडोनी उपवासाला |
जाती निजधामाला | चिंतामणी महाराज ||२० ||
ऐसी तयांची कथा | वाचावी भक्त हो सर्वथा |
वैभव ठेवितो माथा | सद्गुरूंच्या चरणासी ||२१||
