नको बाहेर जाऊस
नको बाहेर जाऊस
दारी झरतो पाऊस, मनी बरसे पाऊस.
अश्या भारलेल्या वेळी नको बाहेर जाऊस.
आज दारे खिडक्यांना जणू पडदे धारांचे.
मणी मोती गुफियले त्यात टपोर गारांचे.
जलधारा वेधिती या जणू आपुल्या गेहास.
ही न पावसाची सर, थेंब फुलांची आरास.
मस्त आळवी पाऊस, मेघ मल्हाराची धून.
कंठातील तुझ्या गीत, येई माझ्या ओठातून.
चिंब झाल्या गारव्याला होई पावसाची बाधा.
जशी रंगात नहाते धुंद गोकुळात राधा.
वीज झळके नभात कंप तुझिया देहात.
अशा घनगर्द वेळी, हात देई ग हातात.
दोघे भिजू या घरात पडे ओसंडे पाऊस.
माझ्यासाठी इथे आज तूच बरस बरस.