निवडणूक राज्य कारभार
निवडणूक राज्य कारभार
लोकशाही शिकलो शाळेत, पाच वर्षात एक निवडणूक आणि जनकौलावर उभा राहिल नेता
स्वातंत्र्याचा आम्हाला अभिमान मोठा अधिकाराच्या दिमाखाने बोट शाईचे मिरवले
आणि हवे ते नेते निवडले.
खोट्या त्यांच्या आश्वासनाला नाहक बळी मतदार पडले
महिना होत आलाय तरी नेत्यांचा सावळा गोंधळ चाललाय
खुर्चीसाठी काय पण ! प्रत्येक नेत्यास हव्यास खुर्चीचा.
संगीत खुर्ची खेळ चाललाय एका पक्षातून दुसऱ्यात.
लाज शरम सगळी सोडलीय,सभेतली भाषणे विसरून गेले
युती काही जमेना आघाडी उभी राहिना
अमुल्य मत दिले कुणाला? आणि खुर्ची मान कोणाला?
तुझं माझं पटेना खुर्चीची हाव काही सुटेना.
अवकाळीच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला
हतातोंडाशी आलेलं पीक पाण्यात बुडून गेले
कोणीही नेता आला नाही त्याच्या मदतीला
नाही पडलीय कुणालाच पर्वा ओल्या दुष्काळाची,महागाईची आणि सामान्य जनतेची.
एका रात्रीत रंकाचे राव झालात पैशाचा केला चुराडा, पण आलाय कोठून एवढा सारा?
अरे,तुमच्यामुळे घोळ झालाय सारे दंग राजकीय शतरंजात
नाही त्यांना सोयर सूतक माय बाप मतदारांचे
पक्षयुती जमेना म्हणून, राष्ट्रपती राजवट लागली महाराष्ट्रात.
दया करा रे पोशिंद्यावर अतिवृष्टीने धान्याचे
झाले तीन तेरा आणि नेत्यांच्या धुमाकुळाने सरकारची मदत त्यांना मिळेना.
निवडणुकी अगोदर मतदार असे तुम्हा मायबाप
खोटी आश्वासने देऊनी भूलवी तुम्ही त्यांना
लोकतंत्र, लोकसत्ता बसवता सगळी धाब्यावर
सत्ता हाती येता विसरून जातात मतदारास.
शिवबाच्या महाराष्ट्रातले तुम्ही नाव घेता त्यांचे घडी घडी!
अरे चारित्र्य राजाचे जाणुनी अनुकरण करा त्यांचे थोडेतरी
जाणता राजा उगीच नाही म्हणत त्यांना
लोक कल्याणास झटले ते अहर्निश!
आणि लाज नाही वाटत तुम्हाला लोकांच्या पैशावर तुम्ही ऐश मौज करता?
लक्षात घ्या मतदारास समजू नका कच्चा
तुम्हा सर्वांस फेकुनी त्यांच्यातला एक होईल खुर्चीचा नेता.
